'मंगला गोडबोले' यांचे नाव घेताच 'झुळूक', 'पुन्हा झुळूक', 'सहवास हा सुखाचा', 'आडवळण' , 'गुंडाबळी' आणि 'ब्रह्मवाक्य' असे त्यांचे एकाहून एक सरस विनोदी कथासंग्रह वाचकांना चटकन आठवतात. मंगला गोडबोले यांना आजपर्यंत महाराष्ट्र शासनाचे पाच पुरस्कार मिळाले आहेत. २००४ साली त्यांच्या 'ब्रह्मवाक्य' या पुस्तकाला मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार मिळाला आहे. स्त्रियांना विनोद कळत नाहीत अथवा त्यांना विनोद करता येत नाही या समजाला सडेतोड उत्तर देण्याचे काम त्यांनी लीलया केले आहे. मराठी साहित्याच्या क्षेत्रात मंगला गोडबोले केवळ विनोदी साहित्यलेखनापर्यंतच सीमित नसून त्यांनी विनोदी कथासंग्रहाबरोबर गंभीर लेखनही केले आहे. त्यांची एकूण जवळजवळ ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात 'आरंभ', 'सोबत' , 'कोपरा', 'पोटाचा प्रश्न' हे कथासंग्रह, 'गोंदण' ही कादंबरी याशिवाय 'वयात येताना', 'दत्तक घेण्यापूर्वी ' या पुस्तकांचाही समावेश आहे.
मंगलाताई, तुमचा लेखनप्रवास कसा सुरू झाला?
मला लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती. अगदी अभ्यासाच्या पुस्तकात वाचनाची पुस्तके दडवून मी ती वाचन केले आहे. मला कोणतीही भाषा चटकन समजायची. अनेक विचार डोक्यात यायचे आणि ते मी लिहून ठेवायचे. पण याचा अर्थ म्हणजे मी मोठी लेखिका होईन असे मला त्यावेळी तरी वाटले नव्हते. पुढे अशी काही परिस्थिती निर्माण झाली की त्यामुळे मी लेखनाकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. लग्नानंतर माझ्या मिस्टरांची लहान गावी बदली व्हायची त्यामुळे मुलांचे लहानपण आणि इतर सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे मला योग्य नोकरीची संधी मिळाली नाही. ही साधारण १९७०-७१ सालची गोष्ट असेल. त्यावेळी आपण लिहू शकतो, आपल्याला त्यात आनंद मिळतो म्हणून मी त्याकडे अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम नावाजलेल्या माझा लेख मासिकात छापून आला तो म्हणजे ७३ साली 'स्त्री ' मासिकात! पण त्यावेळी माझी लेखनाची ताकद काय किंवा आपण नक्की काय करू शकतो याची मला जाणीव नव्हती. लहान मुलाच्या हाती खेळणं पडावं आणि त्याने त्याच्याशी मनमुरादपणे खेळावं असे काहीसे माझे झाले होते.
काही विशिष्ट कारणामुळे आपण विनोदी लेखनाकडे वळलात का?
तुमचा विश्वास बसणार नाही पण अगदी खरं सांगायचं तर मला अजिबात विनोदी लिहायला आवडत नाही पण विनोद वाचायला आवडतो. विनोदी लेखन काही प्रमाणात माझ्यावर लादलं गेले आहे. १९६५च्या आसपास लेखन करणारे अनेक पुरूष लेखक लठ्ठ, मठ्ठ, निर्बुद्ध अशा बायकांची वर्णन असणारे विनोदी लेख लिहीत. कित्येकदा त्या लेखातील स्त्रीला नाव सुद्धा नसायचे.... कधी काळी मी त्या लेखांना हसून दाद दिली असली तरी पुढे पुढे स्त्रीचा विनोदासाठी असा सतत वापर करणे मला खटकायला लागले. सगळ्या स्त्रिया अशा पुरुषांना त्रासदायकच असतात का?आपण जर लेखन केले तर कदाचित याची दुसरी बाजू समर्थपणे उभी करू शकू असे मला वाटले. थोडेफार विनोदी लेखन करणे ही माध्यमाची गरज होती. मी लिहायचे त्या ६४ पानाच्या 'स्त्री' मासिकात ६० पाने आपण स्त्रीचे गोडवे गाणारे असत कारण ते मासिकच स्त्रीवादी. पण उरलेल्या चार पानात एखादा पुरूष लेखक बाईच्या मूर्खपणाचे, वेंधळेपणाचे असे काही किस्से लिहायचा की विचारू नका.. मग असे कसे चालायचे? त्यामुळे त्या काळी स्त्री मासिकात लेखन करणाऱ्यापैकी एखाद्या महिला सदस्यानेच हलकेफुलके लेखन असणारे एखादे सदर सुरू करावे असे त्याकाळी संपादक मंडळातील सदस्यांचे मत झाले. मग एकीकडून दुसरीकडे चेंडू टोलवत तो माझ्याकडे आला आणि जवळजवळ दहा वर्षे मी 'झुळूक' हे सदर चालवले. सुरुवातीच्या काही लेखात मी चाचपडत असले तरी पुढे मला माझी शैली गवसली आणि लेखनातही अधिक प्रगल्भता आली असे आता वाटते. थोडक्यात सांगायचे तर अशा अपघातानेच मी विनोदी लेखनाकडे वळले.
इतर स्त्री लेखिका आणि पुरुष आक्रमकपणे लिहीत असताना तुमच्या लेखनात विनोद असला तरी संयमितपणा दिसतो त्यामागचे काय कारण आहे?
खरं सांगायचं तर कोणाला दाखवून देण्यासाठी कशाला लिहायचं? कोणाची जिरवणे, त्याचा अपमान करणे असे माझ्या स्वभावातच नाही आणि दुसरे असे की अशाने ललित लेखनाला नसती प्रयोजने चिकटतात. ते मला मान्य नाही. "बघ बाबा, ही अशी गंमत आहे," इतपत लेखन करून सोडून द्यावे असे माझे मत आहे. शिवाय माझी मुले, माझा नवरा आणि माझा संसार सुद्धा डोक्यात असायचा. माझ्या लेखनाचा त्यांना अभिमान वाटला नाही तरी चालेल पण निदान कमीपणा तरी वाटू नये असा माझा प्रयत्न राहिला आहे. एखाद्याची जिरवणे म्हणजे त्याला उगीच महत्त्व देणे सुद्धा आलेच ना! म्हणून त्यापुढे जाऊन मी म्हणते की एवढे कोण लागून गेले आहेत पुरुष?..
तुमच्या लेखनातून जो मार्मिक विनोद असतो आणि त्यात जी सहजता आहे त्यामागे कोणती कारणे आहेत?
जगावेगळ्या आनंदाच वा चैनीचे माझे बालपण नव्हते, अगदी सर्वसामान्य मुलामुलींप्रमाणे माझे बालपण गेले. पण कृत्रिमतेचा मला लहानपणापासून कंटाळा होता. ढोंग, देखावा एखाद्यासाठी सोंग आणणे याचा मला खूप कंटाळा आहे. माझे व्यक्तिगत जीवन सुद्धा असेच आहे. एकतर हे सोंग फार काळ टिकणार नाही हे माहिती असल्याने माझ्या लेखनात सहजता आणि सोपेपणा असावा असा माझा सुरुवातीपासून प्रयत्न होता. माझ्या किशोर वयात पु. ल. देशपांड्याच्या लेखनाने मी खूप प्रभावित झाले होते. आपण जर काही लेखन केले पुढे मागे पुलंसारखे करावे असे मला वाटायचे.माझ्यावर पुलंचा खेळीया म्हणून प्रभाव, तर लेखक म्हणून चिं. वि. जोशी यांचा प्रभाव अधिक होता असे मला माझ्या कथांमध्ये असणाऱ्या कौटुंबिक जीवनाच्या चित्रणावरून आता वाटते.
तुमच्या लेखनावर वाचकांचा प्रतिसाद कसा असतो? त्यात पुरुषांच्या प्रतिक्रिया सुद्धा असतात का?
अगदी पहिल्या लेखापासून मला वाचकांची पत्रे येत गेली आहेत. मग गमतीने मुलाखतींमध्ये आम्ही अगदी पत्रांचा पाऊस पडतो असे नेहमी म्हणतो ..तो पाऊस नेहमीचाच असतो... पण आलेल्या प्रतिसादांतून ही लेखिका अगदी आपलेच आयुष्य लिहिते असा वाचकांचा कौल जाणवतो. सहसा पत्र पाठवणारा स्तुतीचेच पत्र पाठवतो. त्यामुळे पाच सहा पत्रे आली आणि कधी त्यात टीका असली तरी ती तारतम्याने घेता आली पाहिजे. जर एका वाचकाने पत्र पाठवले असेल तरी निदान शंभर वाचकांनी लेख वाचला असे मी समजते.
विविध साहित्यिक गट, महिला मंडळे, वाचनालये यांच्याकडून माझ्या एखाद्या कथासंग्रहाचे वाचन, त्यावर परिसंवाद, किंवा नाटकाचे सादरीकरण करायचे आहे म्हणूनही पत्रे येतात. पुरुषांच्या प्रतिक्रिया संमिश्र असतात. "सुरुवातीचे चार पाच वर्षे आम्ही तुमचे लेखन वाचलेच नाही." अशी कबुली मला अगदी नामवंत पुरूष लेखकांनी दिली. शिवाय बायका विनोदी लिहिणार म्हणजे आमचे हे आमचे ते यावर लिहितील असा त्यांचा ग्रह दिसला. कधी कधी क्वचित कोणी बस झालं लेखन असेही म्हणत....
माझा 'ऑपरेशन आवराआवर' असा एक लेख आहे. त्या लेखात माळ्याचे वर्णन आले आहे. तो लेख आल्यानंतर लगेच एका आठवड्यात मला काही गमतीशीर पत्रे आली. "गेल्या महिन्यात तुम्ही आमच्याकडे आला होता तेव्हा तर हॉलमध्ये बसला होता. तेथून तुम्हाला आमचा माळा कसा दिसला? तुम्ही अगदी हुबेहूब वर्णन केले आहे," अशा आशयाची पत्रे होती. कधी कधी क्वचित कोणी बस झालं लेखन असेही म्हणत....
सध्याचा सीझन आम्ही लेखक दिवाळी अंकाचा सीझन म्हणतो त्यानिमित्ताने सुद्धा पत्रे येतात.
जेव्हा तुमचे आयुष्य , अनुभव आणि लेखन याची वाचक सरमिसळ करतात त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय होते?
मला असे वाटते की स्त्रिया म्हणजे स्त्री लेखिकांचा जास्त वेळा बळी जातो. बाईचे आयुष्य आरशासारखे असते असे अमृता प्रीतम म्हणाल्या आहेत. अगदी तसे नसले तरी लेखिकेचे लेखन काही ठराविक कक्षेबाहेर जाणार नाही असा समज वाचकांचा आणि समीक्षकांचा असतो हे या संबंध जोडण्यामागे एक कारण आहे असे मला वाटते. अशा घटना घडतात तेव्हा मी माझे लेखन अधिक तर्कसंगत, समृद्ध कसे होईल एवढाच विचार करते.
तुमचे लेखन वाचल्यावर असे लक्षात येते की तुमचे शिक्षण, तुमचे दैनंदिन जीवन या चाकोरीपलीकडे जाऊन तुम्ही विमानप्रवासापासून ते टाईम मॅनेजमेंट अशा विविध विषयांवर लेखन केले आहे. ते वाचताना तुम्हाला म्हणजेच लेखिकेला या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव आहे असेच वाटते. लेखन करताना इतक्या विविध क्षेत्रातील विषयांत तुम्हाला एवढी सहजता आणणे कसे काय शक्य झाले?
इथे नवोदित लेखकांना मला एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते, ती म्हणजे ज्या विषयावर लेखन करायचे आहे त्याची सखोल माहिती मिळवा, प्रत्यक्ष अनुभव नसला तरी अनेक माध्यमातून आता माहिती मिळवणे सोपे झाले आहे. तेव्हा लेखनात तर्काची चूक राहणार नाही याची काळजी घ्या. एखाद्या स्टेशनवर एखादी गाडी जाते असे म्हणायचे असेल तर ती नक्की जाते की नाही त्याची माहिती मिळवा. गाडी थांबत असली तर किती वेळ थांबते अशा प्रकारची सर्व माहिती काटेकोरपणे मिळवून तिचा योग्य वापर करा. अशामुळे त्या लेखनाची आणि पर्यायाने लेखकाची विश्वासार्हता वाढते. अगदी माझेच उदाहरण द्यायचे झाले तर माझा एक लेख तीन चार पानाचा असला तरी त्यामागे कित्येकदा कित्येक दिवसांची मेहनत असते. त्यात सहजता यावी, सोपेपणा यावा आणि तर्काची चूक राहू नये हा माझा नेहमी प्रयत्न असतो. लेखामागे एका क्षणाची स्फूर्ती असली तरी कित्येक दिवसांची कारागिरी सुद्धा असते. दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे. आज सुदैवाने माहिती देणारी अनेक माध्यम उपलब्ध आहेत याचा लेखकांना अधिक फायदा करून घेता आला पाहिजे.
अनेक परकीय भाषेतील अनुवादित पुस्तके, नवे विषय असणारे लेखन आता सहजतेने मराठी वाचकांपर्यंत पोहोचते आहे. अशा ग्लोबलायझेशनच्या जमान्यात लेखन करतात तुम्हाला अधिक आव्हाने जाणवतात का?
आज मराठी पुस्तके वाचणाऱ्यांमध्ये तरुण पिढीचा नाही म्हटले तरी समावेश कमी आहे कारण त्यांना अनेक भाषांमधील पुस्तके आहेत. तसेच इतर मनोरंजनाची साधने आहेत. भारतातले आणि भारताबाहेरचे जग वेगाने बदलते आहे. लेखनात या जगाचे प्रतिबिंब असणारे इतर बऱ्याच भाषांतले साहित्य वाचकांना सहज उपलब्ध आहे. मराठी लेखकांचे विश्व तसे मर्यादित आहे. ही परिस्थिती नवी नाही. पण या काळात आम्ही म्हणजेच आज साठीला आलेले माझ्यासारखे लेखक किंवा इतरही मराठी लेखक जर तीच ते सासू सुनेची कथा रंगवत राहिलो तर नव्या पिढीच्या वाचकांना ते वाचण्यात काही स्वारस्य उरणार नाही. त्यामुळे नव्या पिढीला चटकन समजेल, आवडेल आणि म्हणून अधिकाधिक वाचावेसे वाटेल असे विषय, भाषा आणि मांडणी असणारे लेखन करण्याचे आव्हान आम्हा सर्वापुढे आहे.
भाषेचा विषय निघाला म्हणून एक प्रश्न विचारते. शुद्ध मराठी, मराठी भाषा वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्या अनेक चर्चा आणि त्याकरता सुरू असणारे प्रयत्न आपल्याला आज अनेक ठिकाणी दिसतात. त्याविषयी तुमचे काय मत आहे?
प्रमाणित भाषा कोणती आणि बोली भाषा कोणती यावरच मोठे डिबेट आहे. तेव्हा आपण तो मुद्दा बाजूलाच ठेवूया. भाषा कोसाकोसावर बदलते. अगदी मराठीचेच उदाहरण घेतले तरी लोकांच्या वापरातील भाषा बदललेली दिसते. काळाच्या प्रवाहात भाषांचे अभिसरण ही नैसर्गिक गोष्ट आहे. तेव्हा ते टाळणे अवघड आहे. ललित लेखनामध्ये वातावरण निर्मितीच्या दृष्टीने जी भाषा योग्य वाटेल तिचा वापर करावा. कथा जर तुम्हाला भिडायला हवी असेल तर पात्रांच्या तोंडी तशी भाषा असावी. तरुणाने तरुणाची भाषा बोलावी आणि लहान मुलीने तिच्यासारखी. मात्र ग्रांथिक भाषा ही अशा लेखनातील भाषेहून नक्कीच वेगळी असते. ललित लेखन करताना भाषाशुध्दीच्या नावाखाली आपण जे लिहिले ते जर बोजड झाले म्हणून कोणी वाचलेच नाही तर? लेखनाचा मूळ उद्देश लोकांना ते समजणे आणि त्यांना आवडणे हा आहे. त्यासाठी त्यांची भाषा त्यात असणे आवश्यक आहे. त्यांनी वाचत राहावे असे मत असेल तर काही दुसऱ्या भाषेतले काही शब्द लेखनात आले तर फारसे बिघडत नाही असे माझे मत आहे. पुण्यात इंग्रजी शब्द वापरून लेखन करणाऱ्या लेखकांविरुद्ध भाषाशुध्दीचा एक मोठा गट काम करतो. ते त्यांचे काम करतात मी माझे लेखनाचे काम करावे असे मला वाटते.
तुम्हाला आवडलेले असे एखादे आताचे पुस्तक/ नाटक / चित्रपट कोणते आहे?
मला मिलिंद बोकिलाचे 'शाळा' हे पुस्तक खूप आवडले. सुबोध जावडेकरांचे कुरुक्षेत्र हे सुद्धा एक फार सुंदर पुस्तक आहे. गिरीश जोशी यांनी लिहिलेले 'फायनल ड्राफ्ट' हे मला अतिशय आवडलेले नाटक आहे. वेगवेगळ्या माहितीवर आधारित, वेगवेगळ्या विषयावर आधारित अशी अनेक मराठी पुस्तके सध्या आपल्याकडे आहेत. तर दुसरीकडे उत्कट अशा कथा , नाजूक ललित लेखन आता काळाच्या रेट्यात कमी होते आहे असे मला वाटते.
पु. ल देशपांडे यांचे साहित्य हा तुमचा आवडीचा विषय आहे. व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ ही त्यांची तुम्हालासुद्धा खूप आवडणारी पुस्तके. त्या पुस्तकातील व्यक्तिरेखा आता पुसट होत आहेत का? त्या पुस्तकाविषयी तुमची निरीक्षणे काय आहेत?
पु. ल देशपांड्यांचे समग्र साहित्यदर्शन अशा धर्तीचा एक प्रकल्प मी राजहंस प्रकाशनासाठी केला. त्यादरम्यान विविध गावे, विद्यापीठे यामध्ये मी पुलंच्या साहित्यावर व्याख्याने दिली. त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करताना मला विलक्षण आनंद मिळाला. मला असे वाटते की व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातील एक व्यक्तिरेखा दुसरीसारखी नाही. त्यातली सर्व चित्रणे अतिशय जिवंत आहेत. त्या व्यक्तिरेखांमधून माणसाच्या स्वभावाचे अनेक कंगोरे पु ल यांनी अलगद उलगडून दाखवले आहेत.
या पुस्तकातील काही संदर्भ काळानुसार पुसट होत गेले तरी ज्या व्यक्तिरेखा आहेत, त्या मनाला भिडणाऱ्या आहेत. खुद्द माझ्या मुलांनी बटाट्याच्या चाळीबद्दल मला विचारले आहे की"आई , यात एवढे हसण्यासारखे काय आहे?" आजच्या मुलांनी चाळही बघितलेली नाही आणि डालडाचा डबाही ! अशी परिस्थिती आहे. त्यांना त्या पुस्तकातील कित्येक गमती मग कशा कळणार? पण संदर्भ बदलले म्हणून साहित्याचा दर्जा खालावला नाही. साहित्याचा दर्जा तोच आहे. खरे सांगायचे तर एकोणीसशे नव्वदनंतर जग एवढ्या झपाट्याने बदलले आहे की कित्येक संदर्भ आता हरवले आहेत. पण एक लेखक म्हणून पुलं यांनी जवळजवळ पन्नास वर्षे मराठी माणसाच्या मनावर राज्य केले यातच त्यांचे यश सामावले आहे.
पण एक गोष्ट जी नेहमी मला 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकाच्या संदर्भात खटकते ती म्हणजे त्यात एकही स्त्री व्यक्तिरेखा नाही . एकही दखलपात्र स्त्री व्यक्तिरेखा पुलं सारख्या प्रतिभावान लेखकाने रेखाटू नये का? किंवा समाजाची घडणच अशी होती की त्यांनीही स्त्रीकडे दुर्लक्ष केले? या विचाराने मी अस्वस्थ होते.
तुमचे आगामी प्रोजेक्ट कोणते आहे ? एवढ्यात तुमचे एखादे पुस्तक प्रकाशित होते आहे का?
माझे 'जिथली वस्तू तिथे' हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यामध्ये गेल्या दोन वर्षात 'माहेर', 'आवाज' , 'जत्रा' अशा विविध दिवाळी अंकात ज्या कथा आल्या त्या कथांचा समावेश आहे. याशिवाय इतर कोणताही प्रोजेक्ट सुरू नाहीये. सध्या मी जरा सुटीच्या मूडमध्ये आहे. तरी नवा विषय नवे प्रोजेक्ट याचा शोध सुरू आहेच. जर काही मिळाले तर जरूर त्यावर काम करेन.
प्रत्येकाला आयुष्यात जे आवडत तेच कार्यक्षेत्र म्हणून निवडता येत असे नाही. तुम्हाला एक नवी संधी मिळाली तर काय करायला आवडेल?
मला शिक्षण क्षेत्रात काही तरी काम करायला आवडलं असत. माझा मूळ पिंड मास्तरकीचाच आहे असे म्हणेन. माझे विनोदी कथासंग्रह वगळता 'वयात येताना' ,'दत्तक घेण्यापूर्वी,' 'काय तुझ्या मनात' या पुस्तकात थोडा शिकवण्याचा सूर आहेच. मी हे केवळ क्रमिक पुस्तकापर्यंत शिकवणे मर्यादित असावे असे म्हणत नाही. आता साधं शाळामास्तर होण्यातही व्याप आहेत. पण मला तरुणपिढीमध्ये मिसळायला आवडते. त्यांच्यासमोर जी आव्हाने असतात, त्यातून आपल्याला आपल्या समोर एक आयुष्य घडताना बघायला मिळते. ते पाहण्यात एक मोठा आनंद आहे असे मला वाटते.
पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर मला मंगला गोडबोले होण्यातही काही कमीपणा वाटणार नाही. माझा संसार व्यवस्थित सुरू आहे आणि एक लेखिका म्हणूनही माझं दुकान तसं बरं चाललंय! स्वतःला प्रमोट करण्याचे कोणतेही विशेष प्रयत्न न करताही माझी एवढी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वयाच्या विशी तिशीत काही वेगळी संधी मिळाली असती तर कदाचित त्याचा जास्त फायदा झाला असता. असो. पण ज्या घटना घडून गेल्या त्याविषयी उगीच खंत करण्याचा स्वभाव नाही! त्यामुळे मंगला गोडबोलेच होण्यातही काही गमावले आहे असे वाटत नाही.
(मंगला गोडबोले काही दिवस अमेरिकेत आल्या होत्या. तेव्हा दूरध्वनीवर त्यांच्याशी संपर्क साधून मी मनोगताच्या दिवाळी अंकाकरता मुलाखत द्याल का अशी त्यांना विनंती केली होती आणि ती त्यांनी मान्य केली. मनोगत आणि मनोगतींतर्फे मंगला ताईंचे आभार मानून आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन गप्पागोष्टीं आवरत्या घेतल्या. )
--सुवर्णमयी