ऐवज - दत्ता सराफांचे आत्मकथन

पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला ठसा निर्माण केलेल्या दत्ता सराफांचे हे आत्मकथन. तसा आत्मकथन हा प्रकारच अवघड. स्वतःबद्दल तर लिहायचे, पण ते स्व-केंद्रित होऊ द्यायचे नाही. हा तोल सांभाळणे भल्या-भल्यांना संकटात टाकते.

पण सराफांनी हा तोल उत्तम रित्या सांभाळला आहे. नाशिक हे जन्मस्थान आणि अधुनमधुन कर्मस्थान असलेल्या सराफांनी सुरुवात नाशिकच्या कोंडाजीच्या चिवड्याइतक्याच प्रसिद्ध "गांवकरी" वृत्तपत्रात केली. दादासाहेब पोतनीस हे गांवकरीचे मालक आणि त्या पिढीतल्या बऱ्याच इतर उदाहरणांप्रमाणे व्यक्ती कमी आणि संस्था जास्त असे व्यक्तिमत्त्व. त्यांनी विचारलेला एक साधा प्रश्न "'गांवकरी'त का येत नाही?" हा सराफांची पत्रकारिता सुरू व्हायला पुरेसा ठरला.

पण पत्रकार म्हणून त्यांचा शिक्का तयार होण्याआधीच सराफांनी एक विलक्षण उडी मारली आणि ते जेलर झाले! अर्थात त्या जगात आपले काम नाही हेही त्यांना लौकरच कळले आणि ते पत्रकारितेत परतले. पण त्या काळातल्या आठवणींतूनही त्यांची संवेदनशीलता चांगलीच दिसून येते.

सराफ परतले आणि 'रसरंग' साप्ताहिकाला जन्म देते झाले. त्यावेळेस त्यांचे वय होते केवळ पंचवीस! तिथे त्यांनी इसाक मुजावर नावाचा अवलिया पारखून घेतला आणि मराठी चित्रपट समीक्षेच्या दालनात नवीन हिरा जडवला.

तीन हजार प्रतींनी सुरुवात झालेला रसरंग तीन वर्षात एकवीस हजार प्रतींवर पोचला आणि सराफांना मुंबई खुणावू लागली. जयंत साळगावकर या संस्थेने त्यांना मोहित केले. 'बहुश्रुत' हे अपत्य जन्माला आले.

एका जागी राहणे हे सराफांना मान्य नसावे किंवा परिस्थितीला मान्य नसावे! चालू केलेला वा चांगला चाललेला खेळ मोडून नवीन सुरू करणे या घटनेत काहीही नावीन्य उरू नये याची जबाबदारी या दोघांनी झकास पार पाडली. त्याचे तपशील इथे भरत बसलो तर पुस्तकाचेच पुनर्लेखन होईल. पण थोडक्यात, मुंबईतले वास्तव्यही अल्पजीवी ठरले आणि सराफ पुण्याला पोचले. तिथून गोवा, कोल्हापूर, जळगाव, परत पुणे, परत कोल्हापूर करून शेवटी नाशिकला निवृत्ती पत्करली.

या पुस्तकात वाचण्यासारखे काय आहे? तर व्यक्तीसापेक्ष दृष्टिकोनातून का होईना, एक खूप मोठा काळाचा पट ते आपल्या समोर मांडतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सराफ कळत्या वयाचे होते. तेथपासून ते आत्ता-आत्तापर्यंत म्हणजे दोनेक वर्षांपूर्वीपर्यंत सराफ कार्यरत होते. वृत्तपत्रसृष्टीतल्या अनेक मोठ्या समूहांतून (किर्लोस्कर, गोमंतक, सकाळ, पुढारी, लोकमत) त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. पुढारी आणि लोकमतच्या तर प्रत्येकी दोन खेपा झाल्या. रोज आपल्या हातात पडणाऱ्या वृत्तपत्रासाठी जे वेणा सोसतात त्यातील मुख्य संपादक सोडल्यास आपल्याला फारसे माहीत नसते. त्या 'आतल्या' माहितीने एक वेगळीच मजा येते.

सराफांनी या सगळ्या भिरभिरणाऱ्या प्रवासात माणसे उदंड जोडली. कुसुमाग्रजांचा हात डोक्यावर घेऊन त्यांनी वाटचाल सुरू केली. तेथपासून दत्तो वामन पोतदार, मोहन वाघ, अ वा वर्टी, दत्ता भट, अत्रे, ना सी फडके, अण्णा माडगूळकर, मुकुंदराव किर्लोस्कर, अनिल अवचट... नावांची यादी संपता संपत नाही. या सर्वांबरोबरचे संबंध अत्यंत वाचनीय रीतीने सराफांनी रेखाटले आहेत.

तीसेक वर्षांपूर्वी 'मनोहर' साप्ताहिकाने जी खळबळ उडवून दिली, त्याबद्दल प्रत्यक्ष वाचलेलेच चांगले. एक गंमत म्हणजे आज 'रेव्ह पार्टी'वरून एवढी बोंबाबोंब सुरू आहे. पण अशीच एक 'पार्टी' चक्क १९७३ साली मळवलीला झाली होती. आणि तीही अगदी खुल्लम खुल्ला! एकंदरीतच 'मनोहर'ने जो वादळी वाऱ्याचा झोत मराठी वृत्तमाध्यमात आणला त्यातील अनेक प्रसंग आज चाळिशी पार केलेल्यांना पुनराठवणीचा आनंद देतील.

सराफांचा एकंदर स्वभाव 'सर्वांमुखी मंगल बोलवावे' असा असल्याने संघर्षाचे प्रसंग त्यांनी अगदीच हात राखून रंगवले आहेत. त्यातही शक्यतोवर स्वतःकडे कमीपणा घेऊन. पण तरीही वऱ्याच 'मोठ्या' नावांमागची अप्रकाशित बाजू उजेडात आणण्याचे कार्य सुदैवाने घडून गेले आहे. वृत्तपत्र माध्यमात पैसा गुंतवणारे व्यवसाय म्हणूनच त्याकडे बघणार हे खरे असले तरी ते बऱ्याच वेळेला भयावह वाटते. त्या दृष्टीने सराफांनी थोडे अजून परखडपणे लिहायला हवे होते. अर्थात त्याचे उत्तरदायित्व माझ्यावर येणार नसल्याने 'अजून परखड लिहावे' असे म्हणणे मला सोपे आहे याची जाणीव आहेच!

पत्रकारितेला 'वलय' तसे फारच कमी. आणि भरीत भर म्हणून सराफांच्या पिढीला पन्नाशी ओलांडल्यावर नवीन तंत्रज्ञानाचे आव्हान (संगणकाचा प्रच्छन्न वापर गेल्या पंधरा वीस वर्षांतला) समोर आले. ते त्यांनी समर्थपणे पेलले. त्या मागची धडपड हीदेखील वाचनीय.

मात्र मलपृष्ठावरचे सराफांचे छायाचित्र सोडल्यास अख्ख्या पुस्तकात एकही छायाचित्र नाही. कथानकाच्या ओघात ते जाणवत नाही. आणि स्वतःवर पडणारा झोतही त्यांनी शिताफीने टाळला आहे. अन्यथा कुठल्याही आत्मचरित्रातील छायाचित्रे हा बऱ्याच वेळेला स्वपूजनाचा एक किळसवाणा सोपस्कार होतो. एकंदरीतच 'मी-मला-माझे' या त्रिदोषांपासून त्यांचे लिखाण मुक्त आहे.

मुंबईबाहेरील महाराष्ट्राचा गेल्या पन्नास वर्षांचा वृत्तपत्रीय इतीहासात्मक आढावा असे थोडक्यात लिहून हे संपवतो.

प्रकाशक: राजहंस प्रकाशन. प्रथम आवृत्ती: जानेवारी २००६