मिरची भजी

  • ८-१० मध्यम तिखट लवंगी मिरच्या
  • बेसन १ वाटी
  • मीठ
  • हळद अर्धा लहान चमचा
  • तेल तळणापुरते
१५ मिनिटे
खाणार्‍या माणसांच्या तिखट खाण्याच्या प्रमाणावर अवलंबून.

१. मिरच्यांना उभे काप देउन घ्या.(२ तुकडे करु नका. नुसता एका बाजूने काप द्या.)
२. कापात चिमूटभर मीठ भरा.  
३. बेसन पिठल्याला भिजवतो तितके पातळ भिजवून त्यात थोडेसेच मीठ आणि हळद घाला.
४. तेल चांगले तापवा.
५. मीठ भरलेल्या मिरच्या देठाला धरुन बेसनात नीट घोळवा आणि तळा. बेसन फार पातळ नसावे, अन्यथा मिरच्याना कमी थर बसून त्या तेलात जळतात.
६. कुरकुरीत तळा.

गरम गरम खायच्या बाहेर पाऊस पडत असताना. कानानाकातून थोडा धूर येईल. काळजी करु नका. त्या धूर येण्यात तर खरी मजा आहे. जवळ पाणी आणि आवडता एखादा गोड पदार्थ तयार ठेवा.डाळ तांदळाच्या खिचडीबरोबर पण छान लागतात खायला.