आजच ज्योती बालिगा-राव यांची नितांत सुंदर गझल कधी कधी वाचनात आली आणि आम्ही खडबडून जागे झालो ("झोपेत होता तेच बरं होतं" असं कोण म्हणाला? त्याला ताबडतोब तोफेच्या तोंडी देण्यात यावे.) आणि लिहू लागलो.('कधी कधी' आम्हीही लिहितो म्हटलं). ज्योतीताईंची गझल वाचून सुचलेल्या ओळी अशा :
कारणाशिवाय मी बोलते कधी कधी
नेहमीच बोलते, ऐकते कधी कधी
घोळक्यात शोधते मी मुलींत त्यास अन्
समजुनी लसूण मी ठेचते कधी कधी
टाळुनी मला सख्या चालला कुणाकडे?
चोर तव मनातला पकडते कधी कधी
मानते पती तुला, (पाडव्यास देवही )
अन तुलाच दासही मानते कधी कधी
कोणत्या न अंगणी फूल वेचलेस तू?
रोज हे बरे नव्हे, शोभते कधी कधी
एकटेपणातही स्पर्श आठवे तुला
अन मिठीतही तुला बोचते कधी कधी
जागते अजूनही बाळ आपले मध्ये
रात्र आपुली अशी संपते कधी कधी
खिजवते कधी कधी, रिझवते कधी कधी
'खोडसाळ' खोड तव काढते कधी कधी