दोन चाकोरीबाहेरची आत्मचरित्रे भाग २

आत्मचरित्रे लिहिण्याला जी कारणे असतात त्यात "स्वान्त सुखाय" या मोकळ्या हेतूने लिहिलेले एक अत्यंत वेगळे कथन म्हणजे "तिकीट प्लीज". लेखक सारंग चपळगांवकर हे रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरीला लागले आणि त्याच खात्यात वेगवेगळे हुद्दे भूषवून निवृत्त झाले.

हे लिहिण्यामागची भूमिका त्यांच्याच शब्दात देतो: "मी ३९ वर्षे रेल्वेत टिकिट चेकिंग खात्यात टी सी पासून ते उप-मुख्य टिकीट निरिक्षका पर्यंत काम केले. माझी नोकरी मी कधीच कमी प्रतीची समजलो नाही. माझ्या मते टी सी चा जेवढा जन संपर्क रेल्वे खात्यात आहे तेवढा अन्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा नाही. याचा मी पुरेपूर फायदा घेतला व अत्यंत उत्साहाने व प्रामाणिकपणे काम केले. जेवढी जमतील तेवढी माणसे जोडली. त्यात मोठमोठी प्रतिष्ठीत माणसे ही होती. टी सी म्हणून साधारण वाटणाऱ्या नोकरीत मी अत्यंत स्वाभीमानाने व समाधानाने दिवस काढले. त्या नोकरीचा मला अद्याप अभिमान वाटतो. त्या वेळी आलेल्या काही रोचक व रंजक आठवणी लिहिण्याचा हा प्रयत्न".

या आठवणी रोचक आणि रंजक करण्यात चपळगांवकरांना बऱ्यापैकी यश आले आहे. एकंदरीतच या विषयावर (रेल्वेतली नोकरी आणि त्यातील तपशील) आतापर्यंत काही लिहिले गेले नसल्याने त्या मनोवेधक होतात. रेल्वेचा प्रवास - वातानुकूलित नसलेल्या डब्यात, लाकडी फळकुटांच्या बाकांवर बसून, रेल्वेचे असे ते रस-गंध-चव याच्या पलीकडे गेलेले जेवण जेवत (किंवा दही भात, तिखटामिठाच्या पुऱ्या असा ऐवज जवळ बाळगत), कोळशाच्या इंजिनाची बारीक काळी धूळ आणि दगडी कोळशाचा कडवट धूर छातीत भरून घेत ज्या लोकांनी प्रवास केला आहे त्यांना तर 'स्मृतींची चाळता पाने' असा अनुभव येईल.

आधीच्या 'मला न पडलेले स्वप्न' पुस्तकाबद्दल लिहिताना "मोकाशी फारसे प्रासादिक वगैरे लिहिण्याच्या भानगडीत पडत नाहीत" असे म्हटले होते. पण चपळगांवकरांशी तुलना केली तर मोकाशी फारच प्रासादिक ठरतील! चपळगांवकर कमीत कमी शब्दात थेट गोष्ट सांगून मोकळे होतात. सर्व आत्मचरित्र त्यांनी ८२ पानांत संपवले आहे. मॅट्रिक झाले त्याबद्दल ते लिहितात "मॅट्रीकला विजापूर सेंटर घेतले होते. माझ्याजवळ एक नऊवारी पातळ नेसलेली मुलगी बसली होती. ती सारखा माझा पेपर पाहत लिहित होती. नंतर कळले की ती विजापुरातील एका वकीलाची मुलगी आहे. पेपर झाल्यानंतर तिला मी गाठले व इतके सारखे पाहत लिहू नकोस. मला भीती वाटते असे सांगितले. त्यावर ती म्हणाली 'उद्या जॉमेट्री आहे. मला नीट दिसेल असा पेपर ठेवून लिही'. मी म्हटले, 'ती लांब शेपटा असलेली सुपरवायझर बाई सारखी हिंडत असते. तिची फार भीती वाटते'. यावर ती म्हणाली 'त्यांची अजिबात काळजी करू नकोस, त्या पुण्याहून आलेल्या आहेत व आमच्याकडेच उतरल्या आहेत".

पुढचे शिक्षण परवडत नाही म्हणून ते रेल्वेत भरती झाले. पुण्याला आल्यावर पहिली रात्र टी सी ऑफिसमध्येच काढली. पुण्यात एक मित्र राहत होता, "त्याचा पोस्टल ऍड्रेस माहीत होता. पत्ता नीट माहित नसतांना गावात टांग्यातून जाण्याची हिम्मत झाली नाही. कारण आचार्य अत्रे यांचे 'पुणेरी टांगेवाला' हा धडा इ. ६ वी ला होता. त्यामुळे टांगेवाला गंडवील असे वाटले". पण रात्रीतून त्यांच्या सामानाच्या पिशवीची चोरी झालीच!

स्टेशनवर एक-दीड वर्षे काम केल्यावर त्यांना गाडीत भरारी पथकात काम करण्याची संधी मिळाली. ती त्यांनी 'विना तिकीट लोकांना पकडणे' हे आपले जीवित्कार्य असल्यासारखी तडीस नेली. 'सारंग आला रे आला' ही सराईत विना-तिकीट प्रवाशांना त्या काळात धडकी भरवणारी घोषणा. "यामध्ये खूप लोकांना चार्ज करून वरिष्ठ रेल्वे ऑफिसर्सना खूष करावे किंवा त्यांच्याकडून सर्टिफिकेट्स मिळवावीत किंवा याचा फायदा पुढील प्रमोशनकरिता करून घ्यावा असा काहीही हेतू नव्हता. लोक आपल्याला घाबरतात व आपले नांव सारखे उच्चारले जाते यातच गंमत वाटायची". एकदा तर त्यांनी विना तिकीट प्रवाशाला पकडण्याकरता चिंचवड स्थानकावर उतरून सायकलने त्याचा पाठलाग केला. शेवटी तो पळून पळून थकला आणि म्हणाला, "सारंग साहेब, आता बस, उभे राहण्याची पण ताकद नाही". मग त्याला सायकलच्या दांडीवर बसवून परत स्थानकावर आणले आणि दंड ठोकला.

चपळगावकरांचे पुस्तक हे अशा मनोरंजक घटनांची जंत्रीच आहे. त्यात मागेपुढे पाल्हाळ नसल्याने त्या सटासट आपल्यावर आदळत जातात.

त्यात लोणावळा पुणे प्रवास घाईत तिकीट काढायला न जमल्याने विना तिकीट केला म्हणून पुण्याहून लोणावळ्याला जाताना दोन तिकिटे काढून रेल्वेचे नुकसान भरून देणारा प्रवासी येतो.

पुण्याच्या अश्वशर्यतींना विनातिकीट आणि विनापैसा आलेला, आणि आपला दंड परत मुंबईला जाताना भरणारा शाम्या नावाचा खिसेकापू येतो.

विनातिकीट पकडलेल्या साधूंना अनेक प्रश्न (तुम्ही कुठले राहणारे? तपश्चर्या किती व कोठे केली? तुम्हाला परमेश्वराचे दर्शन झाले का? सात्त्विक समाधान मिळते का व कसे मिळते? हिमालयात वगैरे जाऊन आला का?) विचारण्याची आवड असलेले (आणी नाममात्र सजा देणारे) मॅजिस्ट्रेट येतात.

असा विनातिकीट पकडलेला एक साधू त्र्यंबकेश्वरला ताक विकताना भेटतो व त्याला 'आपण रेल्वेत नसून बँकेत नोकरीला आहोत' असे सांगून स्वतःची सुटका (त्याच्या साथीदारांनी दंगा केला तर?) करून घेणे येते.

केडगांवची तरुण भाजीवाली टी सी चा धक्का लागून फुटलेल्या अंड्यांचे पैसे कसे त्याच्याकडूनच दामदुप्पट वसून करते ते येते.

कर्जत स्थानकावर एका कातकऱ्याचे पोते 'आत काय आहे' म्हणून बघणाऱ्या टी सी कडून कसे फाटते आणि त्यातील बेडूक कसे फलाटभर पसरतात, "पुण्यास जाण्यासाठी आलेले सर्व पॅसेंजर्स, लोकलला जाण्यासाठी आलेले चाकरमाने पुरुष, बायका, मुलं, मुली, स्टेशनवरील कर्मचारी, वडेवाले, दिवाडकरांचे हॉकर्स, सर्वजण टणाटण उड्या मारू लागले. मुलं तर रडू लागली, बायका किंचाळू लागल्या, स्टेशन मास्तर जे बाहेर उभे होते ते आतल्या ऑफिसमध्ये उडी मारून गेले व दरवाजा लावून घेतला... आणखी मजा म्हणजे आमच्या दादा नगरकरने निवृत्त होईपर्यंत त्या दिवसानंतर एकाही कातकऱ्याला तिकीट म्हणून विचारले नाही" हे येते.

पुण्याचे गेल्या पिढीतले प्रसिद्ध फौजदारी वकील ब ना भिडे आपले तिरकस वकिली डोके वापरून एका रेल्वेच्या मोफत पासवर प्रवास करणाऱ्या पण आरक्षण (reservation) नसताना घुसखोरी करून दुसऱ्याच्या जागेवर बसलेल्या अशिलाला कसे सोडवतात ते येते.

काकासाहेब गाडगीळ पंजाबचे राज्यपाल असताना त्यांच्या डब्याला असलेले पोलिस संरक्षण भेदून एक कातकरी बाई 'डोंगरची काळी मैना' त्यांच्यापर्यंत पोचवते, कारण काकासाहेबच तिला खिडकीतून बोलावत असतात हे येते.

'पत्री सरकार' प्रसिद्ध नाना पाटील यांना ते (स्वातंत्र्यानंतर) मुंबईला जात असताना चपळगांवकर "लोणावळ्याला न्याहारी पाहिजे का" हे कामाचा भाग म्हणून विचारतात. नाना पाटील चपळगांवकरांना आपली मराठमोळी न्याहारी (ज्वारीची भाकरी, कोरडी पालेभाजी, परतलेली मसालेदार हरभऱ्याची डाळ, कांदा, गाजर, काकडी, मुळा, टरफलासकट भुईमुगाच्या शेंगा) खाऊ घालतात, आणि "तुम्ही तिकीट तपासल्यावर मला ब्रेकफास्ट पाहिजे का विचारले, तेव्हाच मी ठरविले, तुम्ही सर्वांना विचारता ब्रेकफास्ट घेणार का तर तुम्हालाच न्याहरी द्यावी" असे सांगतात हे येते.

मनोहर माळगांवकर आपले 'दि प्रिन्सेस' हे पुस्तक स्वाक्षरीसकट कसे भेट देतात हे येते.

बालगंधर्व नाटक बघण्याची चपळगावकरांची सोय कशी इतमामाने करतात, आणि "सारंग, तुमचा जन्म झाला नसेल. तेव्हा पासून माझी नाटक कंपनी मुंबई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, हैद्राबाद येथे रेल्वेने नेत आलो आहे. त्यावेळी तुमचे डी. टी. एम. आणि डी. टी. एस. असे मोठे रेल्वे अधिकारी मला मदत करत नसत, तर तुमचे टी. सी. लोकच मदत करीत. त्यांचे ऋण मी कसे विसरू शकेन" अशी कबुली देतात हे येते.

बघता बघता पुस्तकातल्या बऱ्याचशा घटनांची जंत्रीच मांडली. ह्या सर्व कहाण्या अगदी सरधोपटपणे आपल्यासमोर मांडल्या जातात. आणि हेच निःसंशय वेगळेपण आहे. तुलना करण्याचा अजिबात उद्देश नाही, पण कुठेतरी या साधेपणाचे आणि लक्ष्मीबाई टिळकांच्या 'स्मृतिचित्रे' या पुस्तकाचे काहीतरी नाते असावे असे वाटते. थोडीशी 'कोसला'चीही आठवण येते.

हे सर्व वाचून दोन गोष्टी मनात आल्या. एक म्हणजे 'संपादकीय संस्कार' करण्याच्या नादात आपण कथानकाचा अस्सलपणा मारून टाकतो का हा प्रश्न. कारण चपळगांवकरांच्या पुस्तकाला कुणा 'संपादका'चा हात लागलेला नाही हे स्वच्छ कळते. आणि प्रक्रियाविरहित विहिरीच्या पाण्याप्रमाणे ते गोडही वाटते. दुसरे म्हणजे, आत्मचरित्र लिहिण्यासाठी जास्तीत जास्ती लोक पुढे आले तर जग हे एवढ्या अनेकविध आणि अकल्पित गोष्टींनी भरलेले असते याची थोडीफार तरी कल्पना आपल्याला येऊ शकेल.

अर्थात, पुस्तक काढायचे म्हटले म्हणजे छपाई, वितरण, जाहिरात, विक्री अशा पैशाच्या गोष्टी येतात. त्यामुळे नवनवीन लोकांनी पुढे यावे हे सांगणे (खिशात हात घालायचा नसल्याने!) मला सोपे आहे याची कल्पना आहे. पण स्वांतसुखाय असा हा उद्योग चपळगावकरांनी स्वतःच्या खिशाला खार लावून, आणि 'खाजगी वितरणासाठी' केला आहे. अर्थात त्यामुळे हे पुस्तक सर्व लोकांपर्यंत पोचण्यात अडचणी जरूर आहेत. उत्साही मनोगतींनी २४४८७९०२ या त्यांच्या पुण्याच्या दूरध्वनी क्रमांकावर चौकशी करावी. (हा क्रमांक त्या पुस्तकात आहे. मी त्यांच्याशी बोललो नाही किंवा त्यांच्यापैकी कोणालाही ओळखत नाही. त्यामुळे ते आता आहेत की नाहीत इथपासून तयारी आहे. पुस्तकात प्रकाशक व मुद्रक म्हणून संदीप चपळगांवकर असे नाव आहे)

तळटीप: या दोन्ही पुस्तकांवर एकत्र लिहिण्याचे एकमेव कारण म्हणजे ही दोन्ही पुस्तके मी परवा लकडीपुलावर जुनी पुस्तके विकणाऱ्याकडून घेतली. (त्यातील मोकाशींच्या पुस्तकात तर त्यांनी स्वहस्ताक्षरात 'अभिप्रायार्थ संपादक महाराष्ट्र टाईम्स मुंबई १' असे पहिल्या पानावर लिहिलेले आहे). चपळगांवकरांचे पुस्तक कुणाला छायाप्रत काढून वा तत्सम मार्गांनी पाहिजे असल्यास पुण्यातील मनोगतींसाठी तो प्रकार करता येऊ शकेल.