या झोपडीत माझ्या

माझ्या मैत्रिणीने ईमेलने पाठवलेली कविता मला आवडली म्हणून  येथे देत आहे. तुम्हाला सर्वांना माहीती असेलच.

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ॥ १ ॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥ २ ॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥ ३ ॥

जाता तया महाला, "मज्जाव" शब्द आला
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥ ४ ॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥ ५ ॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥ ६ ॥

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥ ७ ॥

- संत तुकडोजी महाराज