जंजिरा - इतिहास (२)

१६६९ च्या मोहिमेत अपयश हाती आले पण महाराजांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती तसेच दंडा राजपुरीला आरमारी गलबतांचा काफिला सज्ज ठेवला होता.

१६७१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता (१० फेब्रुवारी १६७१) . हे ठाणे म्हणजे किनाऱ्या वरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकां शिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यत ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्या साठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हमल्या कडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्या वर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. सगळे जणू ह्या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते. ह्या अतीव शांततेत कासीमची ललकारी गुंजली. परत लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दी कडे गेली.

जंजिऱ्या च्या पलीकडे असलेल्या बेटावर महाराजांनी पद्मदुर्ग वसविण्याचे दिव्य सुरु केले, किल्ल्याचा बांधकामात मोठा अडसर होता तो जंजिऱ्या वरून होणाऱ्या तोफेच्या वर्षावाचा. तरीही नेटाने काम चालू होते. दरम्यान महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम चालू केली, आरमाराचे बळ वाढविले. सिद्दीने वेंगुर्ल्यावर स्वारी करून वेंगुर्ले जाळले. मराठी आरमाराने राजापुराहून व विजयदुर्गापासून सिद्दीचा पाठलाग केला पण तो निसटून जंजिऱ्यास पोहोचला. जंजिऱ्याला मराठी आरमाराचा वेढा पडला, जंजिऱ्याच्या तटावर मराठी तोफा आग ओकू लागल्या. मोठमोठ्या तरफांवर तोफा चढवलेल्या होत्या आणि त्या तराफा जंजिऱ्याच्या सभोवती तरंगत तरत्या तोफखान्याचे काम करत होत्या. सिद्दि संबूळ जो ह्या वेढाच्या वेळेस वेंगुर्ल्याच्या बाजूस गेला होता तो आपल्या आरमारासह परतला पण मुसंडी देऊन त्याने हा वेढा मोडून काढला.

ऑगस्ट १६७६, मोरोपंत यांनी जंजिऱ्याची मोहीम आखली. ह्या वेळी सिद्दी कासीम हा सुरतेहून जंजिऱ्याकडे आरमारासह परतत होता. जंजिऱ्यावर मराठ्यांच्या तोफा पुन्हा कडाडू लागल्या. होड्या-मचव्यावर बांधलेल्या तोफांचा गराडा जंजिऱ्याला पडला. जंजिऱ्याचा तट अजस्र होता, तोफ गोळ्यांचा काही एक परिणाम होत नव्हता. मोरोपंत प्रयत्नांची शिकस्त करत होते आणि त्यांच्या डोक्यात एक धाडसी विचार आला, जंजिऱ्याच्या तटावर शिड्या लावून चढायचे व सिद्दीची फौज कापावी. विचार अगदी घातकी होता पण अजून उपाय तरी काय होता. तरीही बरेच प्रश्न पुढ्यात होते. तटावर शिड्या कश्या लावायच्या? कुणी लावायच्या? तटाखालच्या समुद्राचे काय? तटावरच्या बंदोबस्तात शिड्या आणि माणसे कसे पोहोचवायचे?

लाय पाटील ह्याने हा मनसुबा,ही जबाबदारी स्वतः वर घेतली. लाय पाटील ह्याने तटावर शिड्या लावून द्यायच्या व मोरोपंतांनी हजार बाराशेची फौज तटावर चढवायची अशी योजना होती. मध्यरात्री नंतर लाय पाटील आपल्या साथीदारां बरोबर लहान होड्यां मधून शिड्या घेऊन गेला. तटावरच्या पहारेकऱ्यांना चुकवत अलगद जंजिऱ्याच्या तटाजवळ ते पोहोचले. अंधारात आवाज होता तो केवळ तटाला भिडणाऱ्या समुद्राच्या लाटांचा. लाय पाटील अत्यंत अधीरतेने वाट पाहत होता मोरोपंतांच्या तुकडीचा. वेळ भरभर पळत होता आणि इथे मोरोपंतांचा पत्ता नव्हता. कधी तटावरील गस्तकऱ्यांना चाहूल लागेल आणि फटाफट गोळ्या सुटतील ह्याचा नेम नव्हता. अशक्य कोटीतली कामगिरी तर लाय पाटलाने निभावली होती, पण पंतांचा पत्ता नव्हता. पहाटेची वेळ आली, शिड्यांची चाहूल लागली असती तर गस्तकरी सावध झाले असतेच पण हा बेत परत कधीही यशस्वी झाला नसता. हताश होत लाय पाटील आणि त्याचे साथीदार शिड्या काढून झपाट्याने परत निघून आला. नेमका काय घोटाळा झाला? कोणाची चूक होती? हे केवळ इतिहासालाच माहीत. मोरोपंतांनी ह्या मोहिमेच्या अपयश स्वतः स्वीकारले. माहाराजांना ही घटना कळताच त्यांनी लाय पाटलाचा सन्मान करण्यास त्याला बोलावले व त्यास पालखीचा बहुमान देऊ केला. पण त्या स्वराज्याच्या इमानी सेवकाने नम्रपणे तो बहुमान नाकारला. हे पाहून कौतुकाने महाराजांनी लाय पाटलासाठी गलबत बांधण्याचे फर्मान सोडले व त्यास "पालखी" असे नाव दिले. एका दर्यावीराचा यथोचित सत्कार महाराजांनीच करावा. थोरल्या महाराजांनंतर शंभू महाराजांनी देखिल १६८२ मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता.

असा हा अजेय जंजिरा, सिद्दि मुहमंदखान हा शेवटच्या सिद्दी असताना २० सिद्दी सत्ताधीश व त्याच्या राज्याच्या ३३० वर्षांनी ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाले.

जंजिरा कसे जायचे? - मुंबई पुण्याहून मुंबई-गोवा महामार्गावरून अलिबाग-चौल-काशिद-मुरुड अश्या मार्गाने यावे.

राहण्याची, जेवण्याची सोय? - मुरूड गावात बरेच हॉटेल आहेत.