जंजिरा - इतिहास

कर्नाळा इतिहास व हा लेख लिहिल्या नंतर महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांचा इतिहास सुद्धा प्रस्तुत करावा असा विचार आहे.  उपक्रम मोठा आहे पण सुरुवात तर केलेली आहे. इथे नमूद केलेला जंजिऱ्याचा इतिहास संपूर्ण नसला तरी कमीत कमी छत्रपतींचा काळ व त्या दरम्यान झालेल्या लढाया यांचा तपशील मी देत आहे.

जंजीरा चा अर्थच मुळी समुद्राने वेढलेला किल्ला, तसा जंजीरा आपल्या स्वराज्या साठी अजेय राहिला. मुरूडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. जंजिरा किल्ला राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटा वर बांधलेला आहे. भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता. या तोफां मध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती.

जंजिरा स्वतंत्र कोळी राजाच्या सत्तेखाली होता, कदाचित हा शासक जंजिऱ्याचा जनक असला पाहिजे. यादव राज्य बुडून सुलतानी राज्य आल्या नंतर पण सन १४९० पर्यंत हा किल्ला स्वतंत्र होता, १४८५ मध्ये जुन्नरच्या मलिक अहमद ने जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कोळ्यांचा नेता होता रामभाऊ कोळी. अभेद्य किल्ला आणि रामभाऊचा पराक्रम ह्या पुढे मलिक ने हात टेकले. ह्या घटनेच्या चार वर्षा नंतर एक व्यापारी जहाज जंजिऱ्याच्या तटाला लागले. पेरीमखान नावाचा व्यापारी व त्याच्या सिद्दी नोकरांनी सुरतेहून आल्याची बतावणी केली व आसरा मागितला. एतबारराव ह्या किल्लेदाराने मंजुरी देताच पेरीमखानाच्या मालाचे पेटारे किल्ल्यामध्ये आले. रात्री त्या पेटाऱ्यांतून ११६ हत्यारबंद लोक बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात भयंकर कापाकापी झाली, किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या अंमलाखाली आला (१४९०). निजामशहाने किल्ल्याची जबाबदारी सिद्दी सरदारांकडे सोपवली व किल्ल्याचे नामकरण 'जंजिरे मेहरूब' असे केले.

सर्वप्रथम १४ ऑगस्ट १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या हाती जंजिऱ्याची मोहीम दिली होती पण त्या स्वराज्याच्या पहिल्या मोहिमेत अपयश हाती आले. मे १६६९ ला महाराजांनी स्वतः मोहीम आखली. पायदळाने दंडा -राजपुरी वर व जंजिऱ्या वर नौदलाने स्वारी करून जंजिऱ्याची कोंडी करायची असा बेत होता. जंजिऱ्याचा सिद्दी होता फत्तेखान व त्याच्या हाताखाली संबूल, कासीम व खैर्यत हे सेनानी होते. फत्तेखान स्वतः दंडा-राजपुरीत होता. त्याच्या अमलांतील प्रदेशात इतर सात किल्ले होते. स्वराज्याचे आरमार जंजिऱ्याला उभे ठाकले. जंजिऱ्याचे पूर्ण बळ खर्ची पडत होते. पायदळाने एका मागोमाग एक असे फत्तेखानाचे सातही किल्ले काबीज करून दंडा-राजपुरी कडे वळाले होते. मराठी आरमारापुढे  जंजिऱ्याची कलाल बांगडी तोफ लंगडी पडली. दंडा-राजपुरी काबीज झाल्या मुळे जंजिऱ्याची सर्व बाजूंनी कोंडी झाली होती. फत्तेखानाने मुंबईकर इंग्रजांना मदती साठी पत्र लिहिले, पण सुरतेच्या वरिष्ठ इंग्रजांनी महाराजां विरुद्ध पाऊल उचलण्या पेक्षा तटस्थ राहण्याचा सल्ला मुंबईकर इंग्रजांना दिला. (जून १६६९)

सिद्दीने मोगलांकडे आर्जव केले, त्या नुसार वेढा उठवण्याची आज्ञा महाराजांना झाली. पुरंदरचा वेढा, तह, महाराजांची आग्रा भेट व तिथले पलायन ह्याला फार वेळ झाला नव्हता. तहातले गेलेले किल्ले मिळवून स्वराज्याची घडी नीट बसवे पर्यंत महाराजांना मोगलांचे अंकित असल्याचे नाटक वठवायचे होते. तरीही ती आज्ञा दुर्लक्षीत करून महाराजांनी वेढा अजून बळकट केला. महाराजांनी फत्तेखानाची झालेली कोंडी ओळखली होती, त्यांचा मुक्काम पेण जवळ होता (नोव्हेंबर १६६९). त्यांनी फत्तेखानाला सन्मानाने कळविले की, जंजिरा आमच्या स्वाधीन करा त्या बदल्यात आम्ही तुम्हाला भरपाई म्हणून मोठी रक्कम देऊ व स्वराज्यात योग्य असा मान देखील बहाल करू. जर्जर सिद्दी ह्यास कबूल झाला पण इतर सेनानी हे पाहून उसळले. त्यांनि फत्तेखानाला तुरुंगात डांबले व जंजिरा ताब्यात घेतला. सिद्दी संबूल हा जंजिऱ्याचा मुख्य सिद्दी झाला व सिद्दी कासिम आणि सिद्दी खैर्यत हे अनुक्रमे जंजिऱ्याचे किल्लेदार व हवालदार बनले. विजापूरच्या दरबाराचे अंकित झुगारून त्यांनी औरंगजेबाकडे अर्ज केला. औरंगजेबाची आरमारी ताकद ह्या मुळे वाढली, त्याने सिद्दीच्या गादीला असलेला 'वजीर' हा किताब रद्द करून नवीन 'याकूतखान' हा किताब दिला व तिघांनाही मनसब, जहागीरदारी आणि सुरतेहून गलबतांचा काफिला दिला (डिसेंबर १६६९).