माझीही अपूर्वाई - भाग ६

'इंग्लंड', 'इंग्रज' व 'इंग्रजी' यांना माझ्या विश्वात महत्वाचे स्थान आहे. शाळेत असतांना इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमात तर इंग्लंडविषयी बरेचसे शिकायला मिळालेच, पण संस्कृतचा अपवाद सोडल्यास विज्ञान, भाषा यासारख्या  इतर विषयांतही कुठे ना कुठे त्याचा उल्लेख यायचा. एकंदरीत जितक्या इतर देशांचा अभ्यास केला असेल त्यांत 'ग्रेट ब्रिटन' किंवा 'युनायटेड किंग्डम'चा सर्वात वरचा क्रमांक लागेल. तरीही या दोन्ही संज्ञांमध्ये नेमका काय फरक आहे ते नक्की सांगता येत नाही ही गोष्ट वेगळी! 'इंग्लंड' हा त्यातला एक विभाग आहे हे माहीत असले तरी ते नांव आपल्याकडे जास्त प्रचलित आहे म्हणून तेच नांव सोयीसाठी इथे घेतले आहे.

इंग्रज लोकांनी भारतावर आक्रमण केले, येथील राजांमध्ये आपापसात कलह लावून कुटिल नीतीने सारा देश आपल्या अंमलाखाली आणला. इथल्या प्रजेची लूटमार केली, तिच्यावर अनन्वित जुलूम जबरदस्ती केली, फोडा आणि झोडा या नीतीने दुफळी माजवली वगैरे त्यांच्या दुष्टपणाच्या कहाण्या ऐकतांना संताप तर येणारच. पण या सगळ्या इतिहासातल्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसल्यामुळे त्याची तीव्रता फार दाहक झाली नाही. त्याचे द्वेषात रूपांतर झाले नाही. इंग्रजांच्या राज्यकालात कांही चांगल्या गोष्टीसुद्धा घडल्या हे मान्य करण्याइतपत अलिप्त वृत्ती धारण करणे शक्य झाले. फार तर इंग्रजांच्याबद्दल मनात एक आढी निर्माण झाली एवढेच. तरीही सर आयझॅक न्यूटन, जेम्स वॅट, एडवर्ड जेन्नर, शेक्स्पीयर, जॉर्ज बर्नार्ड शॉ प्रभृती विभूंतींच्या बद्दल मनात फक्त आदराची भावनाच निर्माण होते. ते शत्रूपक्षाचे आहेत असे कधी वाटलेच नाही.

उच्च शिक्षणासाठी इंग्रजी भाषेचा उपयोग करणे सुरू झाले व त्यानंतर नोकरीतले दैनंदिन कामकाज त्याच भाषेत होत राहिले. रोजच्या व्यवहारात सर्वात अधिक लिहिणे, वाचणे, ऐकणे व बोलणे त्याच भाषेत होत गेले. त्यामुळे ती भाषा आता परकी वाटतच नाही. आपण जी भाषा रोज उपयोगात आणतो, ज्या भाषेतून जास्तीत जास्त संवाद साधतो ती भाषासुद्धा आपलीच होते, नाही कां? ती आपल्या देशात जन्मली नसेल पण आज ती इथे सर्रास वापरली तर जातेच आहे ना? त्या भाषेत लिहिलेल्या लिखाणातून आपल्याला नवनवीन गोष्टींची माहिती होतेच ना? त्या भाषेत लिहिलेल्या कथा, कविता, कादंबऱ्या वाचतांना आपल्या मनाला आनंद मिळतोच ना? मग तिच्याबद्दल आपुलकीची भावना निर्माण होणे साहजीकच आहे.

लंडनला जात असतांना अशासारखे विचार मनात येत होते. आपण आपल्या शत्रूच्या गढीत शिरायला चाललो आहोत असे न वाटता जुन्या मित्राच्या घरी जात आहोत ही भावना प्रबळ होती. लहानपणापासून ज्याचा गाजावाजा कानावर पडत आला होता ते लंडन शहर 'याचि देही याचि डोळा' पहायला मी चाललो होतो ही सत्य परिस्थिती होती. राग, द्वेष, मत्सर, भय अशा नकारात्मक भावना मनात येत नव्हत्या. ही मायानगरी प्रत्यक्षात कशी असेल याची उत्सुकता, वाचनांत किंवा ऐकण्यात आलेली एक अद्भुत जागा डोळ्यांनी पाहण्याची आतुरता, कित्येक वर्षांपासून मनात दडलेली इच्छा पूर्ण होणार असल्याचे समाधान आदि सकारात्मक भावना मनांत घेऊन मी हीथ्रो विमानतळावर उतरलो.

नुकतेच फ्रँकफूर्टचे विशाल विमानतळ पाहिलेले असल्यामुळे हीथ्रोच्या भव्यतेने डोळे मुळीच दिपले नाहीत. उलट इमिग्रेशनच्या रांगांमधील काळ्यागोऱ्यातला भेदभाव पाहून संतापच आला. खुद्द इंग्लंडच्या रहिवाशांना त्यांच्याच देशांत मुक्त प्रवेश असावा हे एक वेळ समजण्यासारखे आहे. पण युरोपियन व अमेरिकनांसाठी वेगळी खिडकी व जलद गतीने चालणारी वेगळी रांग होती. आशिया व आफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची मुलाखत घेऊनच त्यांना प्रवेश मिळत होता. यासाठी त्यांची मंदगतीने सरकणारी वेगळी रांग होती. एकदा सर्व चौकशी करून व्हिसा देऊ केल्यानंतर पुन्हा प्रवाशांना तेच प्रश्न विचारण्यात काय अर्थ होता? तरीही प्रत्येकाला त्या सवालजबाबामधून जावेच लागत होते. मात्र जर्मनीमध्ये असतांना तिथली स्थानिक भाषा समजत नसल्यामुळे मनात सतत जी अस्वस्थता वाटत होती ती लंडनला पोचताच निघून गेली. इथे गरज पडल्यास कोणाशीही संवाद साधणे शक्य होते. विमानतळापासूनच बरेच भारतीय वंशाचे लोकही दिसायला लागले. गर्दीमधील सलवार कमीज, साड्या आणि पगड्या पाहून चांगले वाटत होते. 

माझ्या परदेशदौऱ्यातला पहिला आठवडा जर्मनीत काम केल्यानंतर शनिवार व रविवार हे मधले दोन सुटीचे दिवस थोडे जिवाचे लंडन करून घालवायचे आणि सोमवारपासून इंग्लंडमधल्या कॉव्हेन्ट्री या गांवातील यंत्रोद्योगाला भेट द्यायची असे वेळापत्रक मी बनवले होते. त्या दृष्टीने शनिवारी लंडनला आगमन व रविवारी तेथून प्रयाण ठेवले होते. पण दीड दोन दिवस नक्की काय करायचे याची स्पष्ट कल्पना नव्हती. कांही ठरवण्यापूर्वी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी मी "मी आपणास कांही मदत करू कां?" असा फलक लावलेल्या खिडकीकडे गेलो. अशा जागी आपल्याला कितपत उपयुक्त माहिती मिळेल याविषयी मी आधी साशंकच होतो. समोरील दोन तीन माणसे दहा बारा सेकंदात सरकली व माझा क्रमांक आला.

पलीकडच्या बाजूला एक हंसतमुख तरुण बसला होता. मी सरळ त्याला माझा कार्यक्रम सांगितला आणि त्याचा सल्ला मागितला. माझे बोलणे ऐकता ऐकताच तो हाताने कांही कागद गोळा करतांना दिसत होते. माझे बोलणे संपताच त्याने बोलायला सुरुवात केली,"हा लंडन विमानतळाचा नकाशा. आता तुम्ही इथे उभे आहात. या इथून लिफ्टने खाली रेल्वे स्टेशनला जा. हा मेट्रो रेल्वेचा नकाशा. ही लाईन पकडून या स्टेशनवर जा. तिथे गाडी बदलून त्या लाईनने 'किंग क्रॉस' स्टेशनवर जा. तिथे गेल्यावर उद्या संध्याकाळी सुटणाऱ्या गाडीने कॉव्हेंटरीला जायचे रिझर्वेशन करू शकता. रेल्वेच्या 'लेफ्ट लगेज' ऑफीसात आपले सामान जमा केलेत तर तुम्हाला मोकळेपणाने फिरता येईल. त्यानंतर पुन्हा या मेट्रो लाईनीने अमक्या स्टेशनांवर जा. तिथे बाहेर पडतांच 'लंडन सिटी साईट सीइंग'ची ओपन टॉप बस मिळेल. या बसमध्ये बसल्या बसल्याच लंडनमधली सगळी महत्वाची ठिकाणे ते दाखवतील. प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी त्याचे थांबे आहेत. वाटल्यास त्यातल्या कोणत्याही ठिकाणी उतरलात तरी हरकत नाही. दर पंधरा मिनिटांनी तिथे पुढची बस येत राहील. त्याच तिकीटावर तुम्ही दुसऱ्या बसमध्ये चढून पुढील ठिकाणे पाहू शकता. एक चक्कर मारून झाल्यावर तुम्हाला एकंदर अंदाज येईल व नकाशाच्या सहाय्याने तुमच्या आवडीची ठिकाणे सावकाशपणे पाहू शकाल. यातील अमकी अमकी ठिकाणे पहाणे तुम्हाला जास्त आवडेल असे मला वाटते. हे तुमचे रेल्वेचे तिकीट आणि हे साईट सीइंगच्या बसचे तिकीट. याचे इतके पौंड झाले. आणखी कांही शंका असल्यास जरूर विचारा." तो भराभर हातातील नकाशावर पेन्सिलीने खुणा करीत सांगत गेला.

इतके सुस्पष्ट मार्गदर्शन मी यापूर्वीही कधी पाहिले नव्हते आणि नंतरही कधी मला मिळाले नाही. 'चौकशी' च्या खिडकीवर तर नाहीच नाही. या माणसाने शंकेला कुठे जागाच ठेवली नव्हती. त्याने मागितलेले पौंड देऊन सगळे कागद गोळा केले व त्याचे आभार मानले. त्या दोन दिवसात मला पुन्हा कोणालाही कांहीही विचारण्याची गरज पडली नाही. एकदा समग्र लंडन दर्शन करून घेऊन त्याने सुचवलेली प्रेक्षणीय स्थळे सविस्तर पाहिली आणि कॉव्हेंटरी गांठली.

पुढील आठवडा पहिल्या आठवड्यासारखाच धामधुमीत गेला. फरक एवढाच की कॉव्हेंटरी हे एक मोठे शहर असल्यामुळे तिथे रात्री उशीरापर्यंत उघडी राहणारी कांही दुकाने होती. सिटी बसेसची सोय होती आणि बहुमजली इमारत असलेले मोठे हॉटेल होते. त्यामुळे संध्याकाळी परत आल्यावर थोडी बहुत हालचाल करता येत होती. भाषेच्या अज्ञानामुळे आलेले परावलंबित्व राहिले नव्हते. जर्मनीमधील लोकांना तांत्रिक गोष्टी सुद्धा सांगतांनाच नाकी नऊ येत होते तसे इथे होत नव्हते. ज्या लोकांबरोबर काम करीत होतो त्यांच्याशी थोड्या अवांतर विषयांवर बोलणे शक्य होते.

असेच एकदा माझ्या समवयस्क इंग्लिश इंजिनियराबरोबर सहजच बोलत असतांना आमच्या जीवनांची तुलना होत होती. मी त्याच्यापेक्षा किंचित मोठ्याच आकाराच्या निवासस्थानात रहात होतो, माझ्या घरातसुद्धा टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन वगैरे त्या काळातील सारी आधुनिक उपकरणे होती. दोघांनाही ऑफीसला जायला साधारण तितकाच वेळ लागायचा, फक्त तो स्वतःच्या गाडीने जायचा आणि मी ऑफीसच्या. जेवणातले पदार्थ वेगळे असले तरी दोघेही आपापल्या आवडीचा तितकाच सकस आहार रोज घेत होतो. फावला वेळ घालवण्याचे आमचे छंदही साधारणपणे सारखेच होते. अशा प्रकारे आमच्या नित्याच्या जीवनात फारसा फरक नव्हता. मात्र हे सगळे करून त्याची महिन्याला पडणारी शिल्लक माझ्या महिन्याच्या पूर्ण पगारापेक्षाही अधिक असे. त्यामुळे तो दोन तीन वर्षांत एकदा तरी फ्रान्स, स्पेन, इटली, स्विट्झर्लँड अशासारख्या देशातल्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देत असे. जमल्यास लवकरच भारताला येण्याचाही त्याचा विचार होता. मला मात्र जन्मभर काटकसर करूनसुद्धा असे निव्वळ मौजमजेसाठी परदेशभ्रमण करणे त्या वेळी शक्यतेच्या कोटीत दिसत नव्हते. 

ही वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट झाली. त्यानंतर परिस्थिती बदलत गेली. जे तेंव्हा अशक्य वाटत होते ते आता आटोक्यात आले. त्यामुळे आराम करण्याच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये जाऊन राहून आलो. पण त्या दिवसात इतरत्र फिरण्यासाठी अनुकूल हवामान नव्हते. त्यामुळे युरोप पाहता आले नाही. त्यासाठी व्यवस्थित नियोजन करून नुकताच फिरून आलो. त्यासंबंधी एका वेगळ्या लेखमालिकेची सुरुवात केली आहे. लंडन, एडिंबरा व यॉर्क या इंग्लंडमध्ये पाहून घेतलेल्या स्थळांची वर्णनेही त्याच मालिकेत देण्याचा विचार आहे. पण ही मालिका मुख्यतः चित्रमय असल्यामुळे मनोगतावर देणे मला सध्या तरी ते अवघड वाटते. 

 . . . . . (समाप्त)