ह्यासोबत
युरोपात पोचल्यामुळे माझ्या मनातला हर्ष गगनांत मावेनासा झाला होता. पण युरोपच्या त्या भूमीवरून नजर वर करून समोर पाहताच पायाखालची जमीन सरकते की काय असा भास झाला, कारण खांद्याला स्वयंचलित बंदुका अडकवलेल्या व कमांडोजसारखा वेष धारण केलेल्या सैनिकांचा एक छोटा जथा समोर उभा होता. त्यातल्या चार पांच जणांनी सर्व प्रवाशांना एका रांगेतून चालवत प्रवासकक्षात (ट्रान्जिट लाउंजमध्ये) नेले. उरलेले सैनिक बहुधा रिकाम्या झालेल्या विमानात तपासणी करायला गेले असावेत. हे सगळे कशासाठी चालले होते याचा सुगावासुद्धा कोणीही प्रवाशांना लागू दिला नाही. फार फार तर "नॉर्मल सिक्यूरिटी प्रिकॉशन्स" एवढे संक्षिप्त उत्तर मिळाले.
ट्रान्जिट लाउंजमध्ये पोचल्यानंतर आमच्यावर कसलेही बंधन नव्हते. त्या ठिकाणी आश्चर्याचा दुसराच एक धक्का बसला. मुंबईच्या त्या काळातल्या विमानतळावर प्रवेशकक्षामध्ये चार पांच स्टॉलवजा दुकाने दिसली होती तेवढीच. सुरक्षाद्वाराच्या (सिक्यूरिटी गेटच्या) पलीकडे चहा कॉफी किंवा कोकाकोला यापलीकडे विशेष कांही मिळाले नसते. रोमच्या विमानतळावर तर अगदी एक्झिट गेटला खेटून चक्क बाजार भरला होता. विविध वस्तूंनी भरलेल्या दुकानांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येक दुकानात कांचेच्या भव्य शोकेसेसमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू आकर्षक रीतीने सजवून गौर मांडल्यासारख्या मांडून ठेवल्या होत्या व त्यावर प्रखर प्रकाश टाकून त्यांची चमक आणखीनच वाढवली होती. त्या काळात मुंबईमध्ये मॉल्स आले नव्हते. अकबरअलीज किंवा सेंच्युरी बाजारसारख्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये थोडी सजावट असायची पण तेथील आगाऊ विक्रेते गिऱ्हाइकाला ती नीटशी पाहू देत नसत. इथे मात्र ती अडचण अजीबात नव्हती.
आधी आधी मी बिचकत बिचकत दुकानाबाहेरूनच दिसेल तेवढे पहायचा प्रयत्न केला. पण अनेक लोकांना आंत शिरून मनसोक्त नेत्रसुख घेतांना पाहिले आणि अखेरीस बाहेर निघतांना ग्राहकाकडून पैसे घेणाऱ्या व्यक्तीखेरीज दुकानातला कोणी नोकर दिसला नाही. अर्थातच शॉप लिफ्टिंगला आळा घालण्यासाठी जागोजागी छुपे कॅमेरे लावलेले असणार. पण दोन्ही हात मागे बांधून कुठल्याही वस्तूला स्पर्श न करता मनमोकळेपणे फिरण्याची सर्वांना मुभा होती. माझ्या दौऱ्याची अजून सुरुवातही झालेली नसल्याने खिशातील थोडेफार पैसे अडी अडचणीसाठी राखून ठेवणे इष्ट होते याची जाणीव होती. एकेका वस्तूच्या किंमतींची लेबले वाचल्यावर तर ती विकत घेण्याचा विचारसुद्धा मनात डोकावू शकला नाही. माझे हे निरीक्षण चालले असतांनाच आमच्या विमानाच्या प्रस्थानाची घोषणा झाली व त्याबरोबरच सर्व प्रवाशांनी त्वरित आपापल्या जागांवर येऊन बसण्याची सूचनाही झाली.
रोमहून निघाल्यावर तासा दीडतासांत फ्रँकफर्ट आले. इतर प्रवाशांच्यासोबत चालत चालत व 'एक्झिट', 'बॅगेज क्लेम' वगैरे पाट्यांवरील बाणांच्या दिशा पहात पहात एका मोठ्या हॉलमध्ये आपल्या बेल्टपाशी येऊन पोचलो तोपर्यंत त्याचे सामानासकट फिरणे सुरूही झाले होते. दुरूनच आपली सूटकेस येत असलेली पाहून मी सुटकेचा निःश्वास सोडला व जवळ येतांच तिला उतरवून घेतले. खिशातून तिकीटासोबतची बॅगेजची स्लिप काढून ती आता कोणाला दाखवायची या विचारांत असतांनाच एक गणवेशधारिणी महिला माझ्या जवळ आली व तिने मोडकेतोडके इंग्रजी व उरलेले हातवारे या भाषेत माझी अडचण विचारली. मीही तशाच प्रकारे "माझे सामान मिळाले आहे, आता पुढे काय करायचे?" ते तिला विचारले. सारे प्रवासी जिकडे जात होते त्या दिशेने मलाही जायची खूण तिने केली.
कोणता प्रवासी कोणते सामान घेऊन बाहेर पडत होता या संबंधी कसलीच तपायणी त्या ठिकाणी दिसत नव्हती. पण "अशा चुका किंवा चोऱ्या फारच क्वचित होतात व त्या टाळण्यासाठी सर्व प्रवाशांची कसून तपासणी करण्यापेक्षा एखाद दुसऱ्याला घसघशीत नुकसानभरपाई देणे विमानकंपन्यांना परवडते, नाही तरी सामानाचा विमा उतरवलेला असतोच." असे स्पष्टीकरण कालांतराने मिळाले. पण त्या क्षणी तरी मला नुकसानाची भरपाई कितीही मोठी मिळणार असली तरी ती नको होती, आपले सामानच हवे होते, कारण ठरलेल्या कामाशिवाय इतर उचापती करायला माझ्याकडे अवधीच नव्हता.
बाहेर येऊन आप्रवेशाचा (इमिग्रेशनचा) ठप्पा पासपोर्टावर मारून घेतल्यानंतर पुन्हा पुढे काय करायचे हा प्रश्न पडला. मला फ्रँकफर्टहून लुफ्तान्साच्या विमानाने स्टुटगार्टला जायचे होते. त्या वेळेस भारतात फारसे संगणकीकरण झालेले नसल्यामुळे 'थ्रू चेक इन' मिळण्याची सोय नव्हती. त्यामुळे सामानाची ट्रॉली ढकलत नेत चौकशी करण्याची खिडकी शोधून काढली. इथे मात्र इंग्रजी भाषा समजणारी व्यक्ती होती. तिने मला माझ्या उड्डाणाचा (फ्लाईटचा) गेट नंबर सांगितला. भारतातल्या संवयीप्रमाणे एकादे उड्डाण चुकेल असे गृहीत धरून मला दोन फ्लाईट्समध्ये चांगला चार पांच तासांचा अवधी दिला गेला होता. पण रोममधली सुरक्षा जॉंच जमेला धरूनसुद्धा आमचे विमान जवळ जवळ वेळेवरच पोचले होते व मी अर्ध्या तासात सामानासह बाहेर आलो असल्यामुळे माझ्यापाशी भरपूर मोकळा अवधी होता. इतक्या लवकर पुढच्या फ्लाईटच्या बोर्डिंग गेटपाशी जाऊन बसण्यात कांहीच तारतम्य नव्हते. पण सामानाचे लोढणे घेऊन हिंडायचे तरी कसे?
इकडे तिकडे पाहता लुफ्तान्साचे जे पहिले काउंटर दिसले तिथे गेलो. तिथल्या महिलेने मला तासाभराच्या आंत सुटणाऱ्या आधीच्या फ्लाईटमध्ये बसण्याची संधी देऊ केली. पण मी तिथे लवकर जाऊन तरी काय करणार होतो? मला तिथली कांहीच माहिती नव्हती आणि माझा यजमान त्याला दिलेल्या वेळेवरच तिथल्या विमानतळावर पोचणार होता. हे सांगितल्यावर तिने लगेच मला माझ्या फ्लाईटचे बोर्डिंग कार्ड काढून दिले व सामानाच्या ओझ्यातून मुक्त केले. आता मी उरलेला वेळ आपल्या मनासारखा घालवू शकत होतो. तो चांगल्या प्रकारे घालवण्यासाठी तिने मला एअरपोर्टच्या इमारतीचा एक सुबक नकाशाही दिला.
फ्रँकफर्टचा अतिभव्य विमानतळ पाहिल्यावर असे लक्षात आले होते की त्यापुढे रोमचा विमानतळ साधा ट्रेलरसुद्धा नव्हता. इथल्याइतकी विविध प्रकारची दुकाने मला युरोपातल्या कोठल्या शॉपिंगसेंटरमध्येही पुढे दिसली नाहीत. त्या जागी काय म्हणून नव्हते ? उपयोगाच्या वस्तू होत्या तशाच शोभेच्याही होत्या. अद्ययावत कपडेलत्ते होते तशी सुगंधी अत्तरेही होती. साध्या कागद पेन्सिलीपासून कॉम्प्यूटरपर्यंत सगळे कांही विकायला ठेवलेले दिसत होते. इतकेच नव्हे तर खाण्यापिण्याची चंगळ होती तशीच मनोरंजनाची अनेक साधने होती. श्लील व अश्लील सिनेमापासून कॅसिनोज व बिलियर्डच्या खेळांपर्यंत मागाल ते त्या इमारतीच्या आवारात उपलब्ध होते. चार पांच तासच काय अख्खा दिवस तेथे घालवणे कठीण नव्हते. फक्त त्यासाठी आपल्या जवळ मुबलक पैसा असायला हवा होता!
नकाशाच्या आधाराने फिरता फिरता एका जागी खाली रेल्वे स्थानक असल्याचे समजले. तिथून फ्रँकफर्ट शहराला जाण्यासाठी फक्त दहा पंधरा मिनिटांचा प्रवास होता व जाण्या येण्यासाठी मुबलक गाड्या होत्या हे पाहून त्या प्रेक्षणीय शहराची एक धांवती चक्कर मारायच्या विचाराचा किडा मनात वळवळला. त्या जागी सगळ्या इंग्रजी पाट्या वाचीत फिरतांना माझा आत्मविश्वास वाढलेला होता. स्वयंचलित यंत्रामधून तिकीट काढून रेल्वेगाडीत जाऊन बसलो व शहराच्या मुख्य स्टेशनावर खाली उतरलो. आता मात्र माझे पुरते धाबे दणाणले, कारण विमानतळ सोडतांच इंग्रजी भाषेनेही साथ सोडली होती. स्टेशनासकट शहरातल्या सगळ्या पाट्या जर्मन भाषेत व इंग्रजी जाणणारा एक इसम रस्त्यात भेटायला तयार नव्हता. कुठून ही दुर्बुद्धी सुचली असा विचार करीत स्टेशनात परत आलो तर विमानतळाला जाणारी गाडी कशी शोधायची व त्याचे तिकीट तरी कसे काढायचे याचीसुद्धा पंचाईत झाली. कारण 'एअरपोर्ट' हा शब्दच कुठे दिसत नव्हता. त्याच्या ऐवजी त्या जागीसुद्धा अर्थातच जर्मन भाषेतील मला माहीत नसलेला शब्द लिहिलेला होता. घोळात घोळ होऊन भलत्याच गांवाला पोचलो असतो तर पुढचे विमान गांठणे कठीण होते. यापुढे असले साहस करायचे नाही असा कानाला खडा लावला आणि सारे मुद्राभिनयकौशल्य पणाला लावून कसाबसा परतीचा मार्ग शोधून काढला. तरीही रेल्वेगाडीच्या खिडकीमधून विमानतळ दिसू लागल्यावर जिवात जीव आला.
थोडी क्षुधाशांती करून विंडो शॉपिंग करण्यात उरलेला वेळ काढला आणि भारतातल्या संवयीप्रमाणे एक तास आधी गेटवर गेलो. त्या कक्षाचा दरवाजा चक्क बंद होता आणि कांही माहिती सांगायला त्या ठिकाणी चिटपांखरूसुद्धा नव्हते हे पाहून शंकांच्या पाली मनात चुकचुकायला लागल्या. पण सगळ्या मॉनीटर्सवर तर त्याच गेटचा क्रमांक माझ्या फ्लाईट क्रमांकासोबत येत होता. ते पाहण्यात माझी कांही चूक होत नव्हती. गेट नजरेच्या टप्प्यात राहील इतपतच फिरत राहिलो. विमान सुटायला जेमतेम वीस पंचवीस मिनिटे उरलेली असतांना लुफ्तान्सा कंपनीची माणसे आली आणि दरवाजा उघडून आंत प्रवेश मिळाला. ती फ्लाईट फक्त पंधरा वीस मिनिटांची असल्यामुळे तेवढ्या वेळांत चहापाणी पुरवणे शक्यच नव्हते. बोर्डिंग गेटवरच एक व्हेंडिंग मशीन ठेऊन ज्याला जे पाहिजे ते पेय स्वतःच घेण्याची व्यवस्था केली गेली. त्याचा लाभ घेईपर्यंत भराभर इतर उतारू येत गेले व पांच मिनिटात विमान गच्च भरले. त्यानंतर पांचच मिनिटांत त्याने उड्डाणही केले. वेळेच्या बाबतीतल्या या पराकोटीच्या काटेकोरपणाबद्दल जर्मन लोकांचे अतिशय कौतुक वाटले.
स्टूटगार्ट विमानतळ त्या मानाने खूपच छोटेखानी होता. त्या उड्डाणात मी एकटाच भारतीय प्रवासी होतो आणि माझ्या रंगावरूनच नव्हे तर चेहेऱ्यावरील वेंधळ्या भावावरून सुद्धा कोणीही मला पटकन ओळखले असते. तरीही मला उतरवून घेण्यासाठी आलेले सद्गृहस्थ माझ्या नांवाचा फलक हांतात उंच धरून उभे होते व मला पाहताच ते पुढे आले व त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. त्यांना बऱ्यापैकी इंग्लिश समजत असल्याने माझ्याबरोबर होत असलेला सारा पत्रव्यवहार तेच सांभाळत होते. त्यामुळे त्यांचे नांव माझ्या चांगले परिचयाचे होते. आता त्याला एका उमद्या व्यक्तिमत्वाची जोड मिळाली. त्यांनी मला बरोबर घेऊन न्यूर्टिंजन नांवाच्या गांवातल्या ज्या ठिकाणी माझ्या तात्पुरत्या निवासस्थानाची सोय केलेली होती तेथे नेले, माझी सर्व व्यवस्था नीट झाली आहे याची खात्री करून घेतल्यानंतर दुसरे दिवशी भेटण्यासाठी माझा निरोप घेतला.
अशा रीतीने माझ्या प्रवासाचा पहिला टप्पा तर सुरळीतपणे पूर्ण झाला.
. . . . . . (क्रमशः)