ह्यासोबत
माझे शिक्षण संपताच लगेच नोकरीचा शोध सुरू झाला. त्या काळात 'कँपस सिलेक्शन' फारसे प्रचारात नव्हते. वार्षिक परीक्षा वेळेवर होत असत व त्यांचे निकालही ठरलेल्या दिवशी लागत. त्या सुमारास वर्तमानपत्रांमधील पानेच्या पाने भरून नोकऱ्यांच्या जाहिराती येत. त्या नित्यनियमाने वाचून जिकडे तिकडे अर्ज टाकायला सुरुवात केली. एखाद्या परदेशी कंपनीमध्ये नोकरी मिळाल्यास त्यांच्या खर्चाने परदेशाटन घडणे जवळजवळ निश्चित होते. परंतु त्यातील बहुतेकांची निवड पद्धतही गुंतागुंतीची असायची. आधी आलेल्या अर्जांची छाननी व त्यातून निवडलेल्या लोकांची लेखी चांचणी होऊन मग उमेदवारांमध्ये सामूहिक चर्चा होई आणि मनुष्यबल विकास अधिकारी, तांत्रिक तज्ञ आणि इतर सल्लागार या सगळ्यांबरोबर एकत्र किंवा वेगवेगळे इंटरव्ह्यूज होत. यांत कधी कधी परदेशी माणसेही असत. या सर्व अडथळींमधून पार करून गेल्यानंतर ती नोकरी हाती लागत असे. तीही नशीब जोरांवर असेल तर!
नोकरीसाठी फारशी खटपट करावी लागण्यापूर्वीच माझी अणुशक्तीकेंद्रामध्ये निवड झाली. 'सरकारी नोकरी' म्हणून ओळखीच्या कांही लोकांनी नाके मुरडली, पण त्या काळांतील एकंदरीत परिस्थिती पाहता मला चांगली वाटली म्हणून ही संधी मी सोडली नाही. रोजच्या कामातच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संबंध येत असल्याने जगभरातील अनेक संस्थांमधील कित्येक लोकांबरोबर पत्रव्यवहाराद्वारे नेहमी संपर्क घडत असे. नेहमी आमचे कोणी ना कोणी वरिष्ठ अधिकारी या ना त्या देशाला जातच असत. एक हरहुन्नरी व हुषार माणूस खास त्याचीच सोय पाहण्यासाठी नेमलेला होता. त्यामुळे कधी ना कधी एक दिवस आपणही कोठे तरी जाणार आहोत हे निश्चित होते. पण पारपत्र, व्हिसा, परकीय चलन वगैरेची व्यवस्था बाहेरून करावी लागत असल्यामुळे मनात आले की निघाले इतके ते सोपे नव्हते. या दौऱ्याचा दुरुपयोग केला जाऊ नये यासाठी त्यावर अनेक कडक निर्बंध होते, त्यासाठी वरिष्ठ पातळीवरील अनेक प्रकारची आगाऊ परवानगी घ्यावी लागत असे. अशा कारणांमुळे कुठे तरी जायचा प्रस्ताव येई आणि कांही कारणाने तो मध्येच बारगळून जाई असे सगळ्यांच्याच बाबतीत वारंवार होत असे. एखाद्याचा पहिलाच प्रस्ताव सर्व पातळ्यांवर मंजूर होऊन मार्गात कसलीही आडकाठी न येता तो नशीबवान माणूस परदेशी चालला गेला असे क्वचितच घडत असे.
माझ्याकडे असलेल्या कामातील गुंतागुंतीच्या तांत्रिक प्रश्नासंबंधी चर्चा व थोडी प्रत्यक्ष पाहणी किंवा निरीक्षण करणे यासाठी जर्मनी व य़ू.के. या देशातील कांही संस्थांना भेट देण्याचा एक कार्यक्रम निश्चित झाला व त्याची आंखणी सुरू झाली. परदेशांतील संस्थांबरोबर पत्रव्यवहार करून त्यांना सोयिस्कर अशा तारखा ठरवणे, त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवणे आणि वेळेवर पारपत्र, व्हिसा, विमानाचे तिकीट व परकीय चलन प्राप्त करणे ही एक मोठी कसरत असते. या सगळ्या गोष्टींबद्दल गुप्तता बाळगायची असतेच. शिवाय वेगवेगळ्या बाबतीत नेमके कुठे काय चालले आहे याचा आपल्याला स्वतःलाच सुगावा लागत नाही, तेंव्हा कुणाला काय सांगणार?
अखेर हे सगळे ग्रह एकदाचे व्यवस्थितपणे जुळून आले आणि निर्याणाची तारीख ठरली. तिला जेमतेम दोन तीन दिवसांचाच अवधी होता आणि अजून सगळी कागदपत्रे प्रत्यक्षात हांतात आलेलीही नव्हती. पण सगळी खबरदारी घेऊनही माझ्या दौऱ्याची कुणकुण आमच्या परिसरांत फिरत असणाऱ्या कांही रोगजंतूंना बहुतेक लागलीच आणि कदाचित परदेशभ्रमणाची ही संधी सोडायची नाही या विचाराने त्यांनी माझ्या शरीरात प्रवेश करून ठाण मांडले. या वेळी स्वतःला कितीही शिंका आल्या तरी चालल्या असत्या पण एकाही माशीला शिंकू द्यायचे नाही असा माझा निर्धार होता. त्यामुळे घरगुती काढे, डॉक्टरी उपचार, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक वगैरे जो जी सांगेल ती औषधे घेऊन रोगजंतूंवर चौफेर हल्ला चढवला आणि त्यांना आटोक्यात आणले. तोपर्यंत जाण्याचा दिवस उजाडलाही होता.
......... (क्रमशः)