आणखी एका पदवीदान समारंभाची गोष्ट

मे २००५ मध्ये मला अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर ती काळी की गोरी हे सुद्धा पहायला मिळाले नव्हते. मुंबई विद्यापिठाचा पदवीदान समारंभ डिसेंबर २००५ मध्ये पार पडला आणि तेव्हा अमेरिकेतील माझे पदव्युत्तर शिक्षण २५% पूर्ण झाले होते. त्यामुळे काळा डगला, डोक्यावर ती चौकोनी टोपी आणि हातात पदवीचे भेंडोळे अशा अवतारातला फोटो काढून मिरवायची संधी कधी मिळते, याकडे लक्ष लागून राहिलेले. साधारण दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतील माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन 'मास्टर ऑफ़ कंप्यूटर सायन्स' ही पदवी मिळाली आणि ते स्वप्न साकार झाले. आईबाबांना समारंभाचे आमंत्रण पाठवून, त्यांचे व्हिज़ाचे सोपस्कार उरकून त्यांनी इकडे येण्यासाठी विमानात पाय ठेवेस्तोवर पदवीदान समारंभ अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला होता. त्यांचे तिकीट दोन वेळा बदलणे, प्रवासाची तयारी, औषधे या सगळ्यात मी अमेरिकेत असून आणि परीक्षा चालू असूनही अडकलोच होतो. आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा प्रवास करून येण्याचा तणाव, लेकाच्या भेटीची तळमळ या सगळ्यात अनावश्यक सामानाचा व्यत्यय नको म्हणून त्यांची बॅगही मुंबई-पुणे प्रवासातल्या सामानासारखी भलतीच आटोपशीर झाली होती. आईबाबा येणार आणि आपले कौतुक करणार, शाबासकी देणार याची उत्सुकता लागून राहिली असल्याने तीन दिवसही खूप मोठा काळ वाटत होता. अमेरिकेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मातापित्याचे स्वागत करायला हा गडी साधारण दोन-एक तासांचा प्रवास करून डेट्रॉइटला ज़ायचा होता; पण ऐन वेळी खराब हवामानामुळे अस्मादिकांचे विमान त्यांच्या नंतर पोचले आणि मी माझ्या आईबाबांचे स्वागत करण्याऐवजी त्यांनीच माझे स्वागत केले. मीराताईंच्या चिरंजिवांच्या पदवीदान समारंभाबाबतचे लेखन वाचल्यानंतर तर खराब हवामान आणि पदवीदान यांचे जन्मजात वैर असावे, असेच वाटून गेले. विमानात मिळालेली काळीकुट्ट, दूध-साखर नसलेली कॉफ़ी आणि एका मुज़ोर हवाईसुंदरीबद्दलची तक्रारसुद्धा आई ज्या कौतुकाने सांगत होती, ते पाहिल्यावर माझ्या उच्च शिक्षणाचे आणि तिच्या डोळ्यांत तरळलेल्या आनंदाश्रूंचे चीज़ झाल्याचे वाटले.

डेट्रॉइटला माझ्या मावसबहिणीकडे दोन दिवस घालवून आम्ही आमच्या गावी समारंभाच्या आदल्या दिवशी परतलो. आईबाबांच्या लग्नाचा आणि आईचा असे लागोपाठच्या दिवशीचे दोन्ही वाढदिवस त्यांना विमानात झोपा काढून साज़रे करायला लागल्याने आम्ही डेट्रॉइटलाच एक छोटीशी पार्टी उरकून घेतली. पदवीदान समारंभाच्या दिवशी माझ्यापेक्षा जास्त उत्साहाने आईबाबाच तयार होत होते. बाबांचा कडक इस्त्रीचा सफारी, आईची शिफ़ॉन साडी आणि मॅचिंग ब्लाउज़ आधीच ठरले असल्याने त्यांना तयार व्हायला मुळीच वेळ लागला नाही. मात्र कोणता शर्ट, कोणता टाय हे ठरवताना मात्र माझी बरीच पर्म्युटेशन्स-कॉंबिनेशन्स चालू होती. अखेर मनासारखा नट्टापट्टा झाल्यावर आम्ही घरून निघालो तेव्हा पदवीदान समारंभ अवघ्या १५ मिनिटांवर येऊन ठेपला होता. आईबाबांबरोबरच सुपरिचित मनोगती विनायककाका आणि रोहिणीकाकू, माझे मित्रमैत्रिणी, खोलीमित्र (रूममेटस) आमच्याबरोबर. त्यातच माझे दोन रूममेटसही माझ्याबरोबर ग्रॅज्युएट होणार आणि त्यातल्या एकाचे कुटुंब त्याच्याबरोबर. एकूणच मोठा लवाज़मा होता.

संपूर्ण विद्यापिठाचा पदवीदान समारंभ खूप मोठा, धडाकेबाज़ काहीसा नखरेल पण तरीही हवाहवासा. प्रॉव्हिडन्स बॅप्टिस्ट चर्चमध्ये झालेला आमच्या संगणकशास्त्र विभागाचा पदवीदान समारंभ मात्र सुनियोजित आणि आटोपशीर. मोज़की पण मोलाची भाषणे, विचारांची देवाणघेवाण आणि मग पदव्या प्रदान करण्याचा सोहळा आटोपून बाहेर पडेस्तोवर साधारण तीन तास उलटून गेले होते. छायाचित्रे काढणे, मास्तरांना भेटणे, आईबाबांच्या सगळ्यांशी औपचारीक ओळखी, गप्पाटप्पा, हास्यविनोद यांत पोटात कावळे ओरडायला लागल्याची ज़ाणीव झाली नव्हती; पण 'बिर्याणी हाउस'च्या दारातून आत शिरल्यावर मात्र गप्पांपेक्षा अधिक - खाण्यासाठी - तोंड चालू लागले. जेवण आटोपून आणि नंतरच्या गावजेवणासाठीची आवश्यक खरेदी करून घरी गेलो तेव्हा संध्याकाळचे सात वाज़ून गेले होते. विनायककाका आणि रोहिणीकाकूंना त्यांच्या गावी वेळेत पोचणे आवश्यक असल्याने गरमागरम चहा झाल्यावर त्यांनी आमचा निरोप घेतला. रात्रीच्या जेवणासाठी त्यांना थांबता आले असते तर काकूंच्या हातची कोणती डिश चाखायला मिळाली असती, हे स्वप्नरंजन मी आज़ही अधूनमधून करत असतो

अमेरिकेतील विद्यार्थी समुदायामध्ये आपल्यातल्याच कोणाचीतरी आई आल्याचा आनंद हा इतर कोणत्याही आनंदापेक्षा मोठा असतो. आणि त्या आनंदाचा चवदार मोठेपणा हा दरदिवशी एक पदार्थ या हिशेबाने साठ-एक बटाटेवडे, तितक्याच इडल्या, चार किलो चिकन, कोलंबीभात आणि सोलकढी, पावभाजी, झुणकाभाकर नि चटणी, पराठे, थालिपिठे, पोहे नि उपमा, छोले/मटार उसळ, नानाविध भाज्या आणि मुख्य म्हणजे गरमागरम, तूप लावलेल्या पोळ्या यांच्या डिशच्या डिश काही मिनिटातच संपायला लागल्या की ठळकपणे ज़ाणवतो. एरव्ही अमेरिकेत असताना पोळी-भाजी, आमटीभात आणि बाज़ूला आंबा किंवा मिरचीचे लोणचे, पापड/तळलेली मिरची/सांडगे किंवा कोशिंबीर यांपैकी काहीतरी असा चौरस आहार दिवसातून दोन वेळा सोडाच पण दोन महिन्यांतून एकदा मिळण्याचेही सुख नाही  फक्त काही दिवसच मिळालेल्या या सुखाने आम्हां सगळ्यांचे आमच्याआमच्या 'लोडशेडिंग'चे बेत एकहाती उधळून लावले; पण त्या पंधरा-सोळा मुखांनी प्रत्येक डिश चाटूनपुसून खाताना दिलेला ढेकररूपी दुवा ही माझ्या आईबाबांसाठी पुत्रविरहावरची दवा ठरणार यात मुळीच शंका नाही. आमेन!!!

समारंभाची छायाचित्रे येथे पाहता येतील.