लोकमान्य मुद्रा

सर्वांना आनंद आणि अभिमान वाटावा अशी बातमी आज ई सकाळमध्ये वाचायला मिळाली. तुम्हालाही ती सांगावी म्हणून खाली उतरवीत आहे -

ई सकाळातली मूळ बातमी : पाच रुपयांच्या नाण्यावर लोकमान्यांची प्रतिमा

पुणे, ता. २० - लोकमान्य टिळक यांच्या १५० व्या जयंती वर्षाची सांगता होत आहे. या वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधून लोकमान्यांना आदरांजली वाहण्यासाठी लोकमान्यांची प्रतिमा असलेले पाच रुपयांचे नाणे केंद्र सरकारतर्फे तयार करण्यात आले आहे. ........
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीत २३ जुलैला आयोजित करण्यात येत असलेल्या विशेष कार्यक्रमात या नाण्याचे अनावरण होणार आहे.

लोकमान्य टिळकांच्या जीवनाचा वेध घेणारा "मेकर ऑफ मॉडर्न इंडिया' हा ग्रंथ टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने तयार करण्यात आला असून, या ग्रंथाचे प्रकाशनही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. डॉ. दीपक टिळक यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. लोकमान्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, त्यांच्या आठवणी; तसेच लोकमान्यांची दुर्मिळ छायाचित्रे आदींचा समावेश या ग्रंथात करण्यात आला आहे.

डॉ. दीपक टिळक यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ""नवी दिल्लीत तीन मूर्ती भवन या ऐतिहासिक वास्तूत हा कार्यक्रम होणार आहे. केसरी-मराठा संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी गृहमंत्री शिवराज पाटील, कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह विविध नेते उपस्थित राहणार आहेत.''

लोकमान्यांची प्रतिमा असलेले पाच रुपयांचे नाणे एक ऑगस्टनंतर पुण्यात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.