श्रद्धांजली...

परवा १ ऑगस्ट रोजी साहित्यिक सुधाकर प्रभु यांना देवाज्ञा झाली.
आज ३ ऑगस्ट रोजी  पहाटे सरोजिनी वैद्य देवाघरी गेल्या.

शाळेत पुरवणी वाचनाला सुधाकर प्रभुंची पुस्तकं होती. तिथे माझा त्यांच्या लेखनाशी परिचय झाला. अतिशय ओघवती आणि कुठेही सूत्र सुटू न देणारी, बांधून घालणारी आणि नेमका अर्थ पोहोचवणारी अशी लेखनशैली असलेल्या या लेखकाने अनेक वर्षे मनाचा कब्जा घेतलेला होता. किशोर कादंबरिका हा प्रकार बहुधा त्यांनीच मराठी भाषेत आणला असावा. त्यांची कथाबीजे दैनंदिन आयुष्यातली असली तरी साहसी वृत्तीच्या अवखळ किशोरमनांना हाक घालणारी असत आणि वाचणारा त्या पुस्तकांच्या प्रेमात पडल्यावाचून रहात नसे. अतिशय सकस आणि उच्च साहित्यमूल्ये असलेले लिखाण त्यांनी सातत्याने केले. रंजकतेतून संस्कार करण्याची त्यांची हातोटी विशेष उल्लेखनीय होती. ठरविक साहसकथांच्या कल्पनांना छेद देणाऱ्या साहसकथा लिहून त्या कथांमधले कथानायक आणि नायिका त्यांनी अक्षरशः जिवंत केल्या.
प्राणी स्वतंत्र झाले, एका रात्रीची गंमत, धिटुकली, कोणार्कचा कलाकार, अमोल अमोल  ही सुधाकर प्रभुंच्या अनेक पुस्तकांपैकी मी वाचलेली काही पुस्तके. बालसाहित्यात त्यांचे नाव अजरामर झाले आहे. एका पुस्तक प्रदर्शनाच्या वेळी त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला होता. शाळकरी वयात आवडता साहित्यिक भेटणे ही पर्वणी असते आणि त्यांच्या प्रत्यक्ष भेटीने तो आनंद द्विगुणित केला होता. ती भेट मी कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी स्वाक्षरी करून दिलेलं त्यांच पुस्तक आज माझ्या दृष्टीने एक अमूल्य ठेवा ठरलं आहे.

सरोजिनीबाईंबद्दल बरंच काही ऐकलं आहे पण प्रत्यक्ष भेटीचा योग आला नाही.पण माझी एक जिवलग मैत्रीण त्यांच्या साहित्याच्या प्रेमात आहे. एका अफलातून योगायोगाने ती  त्यांना भेटली होती. आज सकाळी तिचा दूरध्वनी आला तेंव्हा त्यांच्या आठवणींनी तीही सैरभैर झाली होती.
आमच्या बालपणाचं रूपांतर अनेक सुंदर आठवणींच्या खजिन्याने भरलेल्या एका जागुई नगरीमधे करण्यामधे या सर्व साहित्यिकांचा मोठा हात आहे. आणि याबद्दल मी त्यांची मनोमन ऋणी आहे.
या दोन दिवंगत साहित्यिकांना माझा प्रणाम.
--(दुःखी) अदिती