होतोय त्रास मजला

आमची प्रेरणा विश्वास यांची गझल  आहे उसंत कोठे

होतोय त्रास मजला खाली बसायला
जातेय काय तुमचे नुसते हसायला 

कारण पराभवाचे देऊ नकोस तू
चुपचाप घे अता तू पत्ते पिसायला 

मी ही जपून थोडे बोलायला हवे
असते तयार पत्नी येथे रुसायला

फुकटात चापण्याला गर्दी अमाप ही
मज वाट सापडेना तेथे घुसायला

घेऊन धोतऱ्याची आलास ही फुले
समजू नकोस वेडी मजला फसायला

आली कुठून सासू माझ्या घरात ही
घडणार काय पुढती लागे दिसायला 

बाहूत बायकोच्या होतो मजेत मी
हा सासरा तिथे ही आला डसायला

जी वाट लागलेली माझी घरा मधे
तुम्ही तिथे नको पण होते असायला

होता सुखात "केश्या" लग्ना विना किती
बघ लागतात आता फर्श्या पुसायला