'परतीचा प्रवास' - उदास करणारे संदिग्ध आत्मचरित्र

'वनमाला' हे नाव घेतले की स्वर्गीय देखणेपण समोर तरळते. लगेच 'श्यामची आई' आणि 'आचार्य अत्रे' ही दोन नावे धक्काबुक्की करीत पुढे येतात. 'पायाची दासी', 'वसंतसेना', 'लग्नाची बेडी' आदि मंडळी जरा मागच्या रांगेत थांबतात.

वनमालाबाईंना दीर्घायुष्य लाभले. त्यांची नव्वदी उलटल्यावर ऍड. सुनील पाटणकर यांनी शब्दबद्ध केलेले 'परतीचा प्रवास' हे त्यांचे आत्मचरित्र.

ग्वाल्हेरच्या सरदार घराण्यात जन्मलेल्या सुशीला पवार या स्त्रीच्या आयुष्यात काय काय ठेवले होते! सत्य हे अकल्पिताहून अद्भुत असते असे म्हणतात त्याची प्रचीती देणारे आयुष्य त्या जगल्या. ग्वाल्हेरच्या दिवसांत कुणा ब्रिटिश तरुणाच्या प्रेमात पडून लग्न करायला निघालेली सुशीला वडिलांनी अनुमती नाकारली म्हणून मागे येते. मग वडिलांच्या हट्टाखातर लग्नाला उभी रहाते. पी के उर्फ बाळासाहेब सावंत हे राजकारणी (जे पुढे महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले; बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ त्यांच्याच नावाचे) त्यांचे पती. पण त्यांच्याबरोबरचा संसार जेमतेम तीन महिनेच करून ती बाहेर पडते. सावंतांनी घरी सावंतांनी स्वतःहून आणलेला पाहुणा म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे. मात्र त्यावेळेस अत्र्यांनी त्यांच्याकडे 'तोंड वर करून पाहिलं देखिल नाही'.

मात्र फासे पडायचे ते पडलेलेच असतात. आणि मग सुरू होतो एका न थांबणाऱ्या भिरभिऱ्यावरचा प्रवास.

अत्र्यांची रखेली म्हणून जगाने हिणवले. घरच्या माणसांनी संबंध तोडले. आपल्याच मस्तीत जगताना वनमालाबाईंनी त्याची पर्वा फारशी केली नाही. जेव्हा असह्य होऊन जीवनाचा अंत करायला निघाल्या तेव्हा जिवाजीराव शिंद्यांनी (माधवराव शिंद्यांचे वडील, ज्योतिरादित्य शिंद्यांचे आजोबा) वाचवले. मग कृष्णभक्तीत रमून त्यांनी उर्वरित आयुष्य काढले.

हा सगळा प्रवास थोड्या तुटकपणे, थोड्या विस्कळीतपणे, बऱ्याचशा संदिग्धपणे या पुस्तकातून समोर येतो. मात्र त्या संदिग्धपणामुळे बऱ्याच वेळेला रसभंग होतो. तसेच निवेदनाची शैलीही कधीकधी अगदीच बाळबोध वळणावर जाते. इथे शांता हुबळीकर किंवा हंसा वाडकर यांच्या आत्मचरित्रांची आठवण झाल्यावाचून रहात नाही.

भोगलेले भोग उघड्यावाघड्या शब्दांत मांडायला वनमालाबाई कचरतात म्हणावे तर त्या "सावंतांनी माझ्याशी कधीही वैवाहिक संबंध ठेवले नाहीत आणि वैवाहिक संबंध काय असतात ते न समजण्याइतकी मी लहानही नव्हते. मर्यादेच्या पलिकडे जाऊन ते काय असतं हे मी उपभोगलं होतं" असे लिहून जातात. पण संपूर्ण पुस्तकाचा सम्यक विचार केला तर अत्र्यांबद्दल मनात अजूनही असलेले प्रेम, आणि अत्र्यांनी केलेले हालहाल याच्या ओढाताणीत भाषाशैली लंबकासारखी हिंदोळत रहाते. एखादी जीवघेणी कळ शब्दबद्ध करायला जावे आणि मध्येच जनसंमत शिष्टाचार आडवे यावेत तसे कधी होते. तर कधी शिष्टसंमत भाषेत निवेदन चालू असतानाच फटकन एखादा भयाण अनुभव नागडेपणाने समोर येतो.

अर्थात हा मूलतः शब्दबद्ध करण्यातला दोष आहे. अनुभव अस्सल आहेत आणि या उणीवेवर मात करूनही ते 'आत' पोचतात. वनमालाबाईंचे मनस्वीपण अर्पणपत्रिकेतही झळकते! 'माझी दैवते वीर सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, जयप्रकाश नारायण आणि इंदिराजी गांधी यांना समर्पित'!

एकंदरीत त्यांच्या आयुष्यात आलेल्या माणसांसंबंधी बरेच मनमोकळेपणाने त्यांनी लिहिले आहे. त्यांना गुलाबाचे फूल आणि चांदीची हेअरपिन भेट देणारे अटलबिहारी वाजपेयी, रेल्वेच्या डब्यात भेटलेले आणि 'वसंतसेना' म्हणून ओळख दाखवणारे जयप्रकाश नारायण, खाजगी आयुष्यात सल्ला मागणारी नर्गिस, गुजराथी चित्रपटांतून काम करावे असा आग्रह धरणारे मुरारजी, आपल्या मुलाला बरोबर घेऊन सकाळी नाश्त्याला घरी येणारे प्रबोधनकार.... प्रत्यक्ष वाचलेलेच बरे.

प्रकाशन आणि पुस्तकाची रचना अगदीच नवशिकी आहे. सुमतीबाई धनवटे या वनमालाबाईंच्या धाकट्या भगिनी. त्यांना प्रत्यक्ष भेटलेल्या लोकांना सुमतीबाईंचे अतिरेकी भगिनीप्रेम माहीत आहेच. त्याचीच पुनरावृत्ती करीत त्यांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच आपल्या निवेदनात 'आता मी आवाहन करते की वनमालादेवींसारख्या असामान्य अभिनेत्रीला भारत सरकारने पद्मभूषण हा सन्मान द्यावा' असे अत्यंत विजोड ठिगळ लावले आहे.

तसेच एकंदरीत छायाचित्रांचा दर्जा खूपच वाईट आहे. पान १७ वरचे छायाचित्र तर छापण्याऐवजी कोरी चौकट सोडली असती तर सुंदर दिसली असती.

आणि पुस्तकाच्या शेवटी काय? तर Resume! त्यातील भाषा तर विरूपतेचा नमुनाच!

वनमालाबाईंनी आयुष्यात खूप भोगले. हे पुस्तक त्याचे प्रतिबिंब व्हावे म्हणून त्यांचे असे धिंडवडे काढले की काय कोण जाणे!

कसलेल्या कलाकाराने मारवा सादर करताना तबलजीने मात्रा खाव्यात, ध्वनीक्षेपकाने यांत्रिक खरखर मिसळावी, निवेदनकर्त्याने हास्यास्पद भाषण करावे, आणि तरीही अंगभूत ताकदीमुळे मारव्याने आतून कुठूनतरी हलवून सोडावे तसे वाटते. या सर्व गोष्टी नीट जमल्या असत्या तर....

प्रकाशक: विहंग प्रकाशन

प्रथमावृत्ती: एप्रिल २००७