सारे प्रवासी गाडीचे - २

                                                                            पक्षश्रेष्ठी
 

    अंधेरीला लोकलमधे चढताच 'स्टर्लिंग जो' मास्तरांना म्हणाले की आज कमळाकर येणार आहे. या दोघां आजी माजी शास्त्री हॉलवाल्यांच्या जवळचा, म्हणजे तिथलाच कोणी असेल हा माझा अंदाज बरोबर ठरला. तोही माजी शास्त्री हॉलवालाच निघाला. नालासोपारा येईपर्यंत तो कसा असेल याची अनेक चित्रे मी मनाशी रंगवून पाहिली. एका बँकेचा मॅनेजर म्हणून तो आजपासून सूत्रे हाती घेणार होता. (शाखाप्रमुख हा शब्द मुद्दामच वापरला नाही इतका तो बदनाम झाला आहे.) गाडी नालासोपाऱ्याला थांबली. ज्यों ना शोधत एक अत्यंत रुबाबदार, तांबुसगोरा स्थूल गृहस्थ आमच्यांत येउन बसला. मी निरीक्षण करत होतो. पांढरेशुभ्र पण थोडीसी सोनेरी छटा असलेले केस, लाल चेक्सचा खोचलेला शर्ट आणि भारदस्त पण अत्यंत बोलका चेहेरा! आमच्या ग्रुपच्या प्रथेप्रमाणे त्यांचे जोरदार स्वागत झाले. त्या क्षणानंतर मी त्यांना कधीही एकेरी नांवाने संबोधले नाही. व्यक्तिमत्वच इतके भारदस्त होते की टाय न लावता सुद्धा ते मॅनेजर वाटतच होते. बोईसर येईपर्यंत त्यांनी संगीतापासून ते खाद्यप्रकार अशा विविध विषयांवर इतक्या गप्पा मारल्या की तोपर्यंत आम्ही अगदी चांगले मित्र झालो. पहिल्याच भेटीत काही त्यांचे सगळे गुण जाणवले नाहीत पण कोणालाही न दुखावता आपलेसे करण्याचे त्यांचे कसब नंतर चिरपरिचयाचे झाले.
        जसजसा सहवास वाढत गेला तसतशी आमची निवड कशी योग्य होती याची आमच्या साऱ्या ग्रुपला खात्री पटली. गाणे, खवैयेगिरी आणि सहली अशा आवडी जुळत गेल्यावर ते आमच्या नकळत आमचे प्रमुख बनले. त्यांना पक्षश्रेष्ठी ही पदवी बहाल झाली.साहित्याची त्यांना चांगली जाण होती. त्यामुळे चांगल्या पुस्तकांचे आदानप्रदान, वाचून झाल्यावर त्यावर सखोल चर्चा वगैरे गोष्टींमुळे प्रवास कधी संपायचा ते कळायचेच नाही. नाटके बसवणे आणि त्यांत स्वतः काम करणे हा ही त्यांचा एक छंद होता. नाटकांत काम करण्याची जरी आमची कुवत नसली तरी त्यांच्या तालमी बघायला आम्हाला आवडे. त्यांच्या पोतडीत अनेक किस्से असत. रोजच्या शटलच्या परिसंवादात ते बऱ्याचवेळा सूत्रधार असत. अर्थात वाघोबा असले की इतर कोणाला ती संधी मिळायची नाही.
       एकदा असेच बोलण्याच्या ओघात महाभारताचा विषय निघाला. बोलता बोलता आमच्यात वादासाठी कौरव- पांडव असे तट पडले. पक्षश्रेष्ठी मात्र कृष्णाचीच भूमिका बजावत होते. तरी आवाज इतका वाढत गेला की शेजारच्या कूपेमधले लोक बघून गेले. वाघोबा तर सगळ्यांचाच उद्धार करत होते. शेवटी स्वामींनी समारोप करताना सांगितले की ' कशाला वाद घालता ? महाभारत ही एकूणएक अक्करमाशांची कथा आहे.' यावर गदायुद्ध होऊ शकले असते पण तेवढ्यात उतरायची वेळ झाली.
      आमच्या या चर्चा कोरड्या नसत, तर खानपान सेवेची जबाबदारी श्रेष्ठींनी स्वतःहून शिरावर घेतली होती. पुढेपुढे आमची ही खाण्याची आवड फारच बळावली. मग सगळ्यांनीच दिवस वाटून घेतले. पुरणपोळी पासून बासुंदीपर्यंत आमची मजल गेली होती. खाण्याची आणि दुसऱ्यांना खिलवण्याची त्यांना मनापासून आवड होती. एकदा बासुंदीपान चालू असताना त्यांनी एकच ग्लास पिऊन हात आखडता घेतलेला पाहून मी त्यांना आग्रह केला. " नको आज जास्त, सकाळीच १०-१२ जुलाब झाले आहेत" हे उत्तर मिळाल्यावर आम्ही बेशुद्ध पडायचेच बाकी होतो.
       ते बँकेचे व्यवस्थापक तर होतेच पण कुठल्याही सहलींचे आयोजन करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे सगळी जबाबदारी त्यांच्यावर सोपवून आम्ही निर्धास्त असायचो. आमच्या अनेक सहली त्यांनी उत्कृष्ट नियोजन करून त्यांनी पार पाडल्या. सफाळ्याचा डोंगर, सूर्य धरण, डहाणु व केळवे बीच या बरोबर भंडारदरा, लोहगड अशा वर्षा सहलींचाही आम्ही आनंद लुटला. अभयच्या लग्नाला आम्ही सर्वजण नागपूरला गेलो होतो. ती सर्वात मजेची आणि सर्वात हालांची सहल ठरली.
जाताना आम्ही अगदी मजेत गाणीबिणी म्हणत गेलो. लग्नात सर्वात सुरेल आणि खणखणीत आवाजात मंगलाष्टके म्हटली ती ह्यांनीच. परतीच्या प्रवासात स्टेशनवर येईपर्यंत आम्ही आनंदात होतो. स्टेशनवर आलो, कलकत्ता मेल यायला वेळ होता. पण स्टेशनवरची ती निळ्या पट्ट्या डोक्यावर बांधलेल्या लोकांची गर्दी पाहून आम्ही हबकूनच गेलो. पाय ठेवायला जागा नव्हती. तारीख होती ४ डिसेंबर! तरीही आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे त्याची पूर्ण कल्पना आली नव्हती. आमचे आरक्षण होते या फाजील आत्मविश्वासात आम्ही होतो. गाडी आली आणि प्रचंड धक्काबुक्कीत आम्ही सापडलो. गाडी सुटली तेंव्हा आमच्यापैकी केवळ दोघेच आंत शिरू शकलो होतो! आता बाकीच्यांचे काय होणार या विवंचनेत मी असतानाच गाडी थांबली. हे कर्तुत्व होते आमच्या श्रेष्ठींचे. कारण परिस्थितीचे आकलन झाल्याबरोबर त्यांनी प्रसंगवधान राखून स्टेशनमास्तरकडे धांव घेतली होती. क्षणार्धात पोलिस येऊन त्यांनी सपासप लाठ्या चालवल्या. सर्व आरक्षित प्रवासी आंत येऊ शकले. आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. पण पुढचे स्टेशन आले अन अशी काही गर्दी आंत घुसली की आम्ही मुंबईचे सराईत प्रवासी असूनही गांगरलो. नंतर प्रत्येक थांब्यावर हा महापूर आत येतच राहिला! रात्रीच्या झोपण्याच्या शक्यतेचा विचार तर आम्ही सोडूनच दिला होता. तेवढ्यात कमळाकरांनी एका पोलिसाशी दोस्ती करून त्याला आमच्या बाकावर बसवला. त्यामुळे निदान आमच्या डोक्यावर तरी कोणी बसले नाहीत.
         थोड्यावेळाने लक्षात आले की आता पाखान्याकडे जाणेही अशक्य आहे. रात्रीचे जेवण मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. दुसऱ्या दिवशीच्या 'काळजीने' ते न खाणेच योग्य होते. पॅसेज रिकामा नव्हताच. माणसे साधारणपणे तिसऱ्या शयनिकेच्या उंचीवरून आडवी होऊन जा ये करीत होती. गाडीच्या खिडक्या व दारे लोकांनी केंव्हाच बंद केली होती. बाहेरून प्रत्येक स्टेशनवर दार न उघडल्यामुळे तुफान दगडफेक होत होती. घुसमट होत होती. न रहावून एकाने खिडकी उघडली तर पाण्याचे शिंतोडे आत आले. पावसाचे पाणी म्हणून सुखावलो तेव्हढ्यात लक्षांत आले की ते शिंतोडे टपावरून लघवी करणाऱ्या मानवी पाण्याचे आहेत. शिसारी येऊन परत खिडकी लावली. अशा परिस्थितीतही कधीतरी बसल्याबसल्या डोळा लागला. सकाळी कल्याणला गर्दी जरा कमी झाली. आता तरी पाखान्यात जायला मिळेल या विचाराने तिकडे डोकावलो आणि बघुनच भोवळ आली. कसेतरी १२ वाजता दादरला उतरलो आणि टॅक्सीत अंग झोकून दिले.
        एके दिवशी त्यांच्या बदलीचा हुकुम आला. मी तुम्हाला भेटतच रहाणार आहे असे सांगून त्यांनी निरोपसमारंभ टाळला. खरोखरच बोईसर सुटले तरी ते आमच्यातून गेले नाहीत. अधुनमधुन भेटतच राहिले. वय व खाण्याच्या संवयींमुळे काही वर्षांनंतर त्यांची बायपासही झाली. शुद्धीवर आल्याबरोबर डॉक्टरला मी बटाटावडा कधी खाऊ शकेन हा पहिला प्रश्न विचारला म्हणे!
       अजूनही त्यांचा उत्साह पुर्वीचाच आहे. एखाद्या समारंभात पुढे पुढे करणाऱ्याला उत्सवमूर्ती असे म्हणतात. पण आनंदाने जगावे कसे हे शिकवणाऱ्या पक्षश्रेष्ठींना मात्र मी आनंदमूर्ती असेच म्हणीन. ज्यांना पहाताक्षणीच प्रसन्न वाटते अशा अनेक व्यक्ति मला आजपर्यंत भेटल्या आहेत. पण त्यातही क्रम लावायचा झाला तर कमळाकर नेन्यांचा नंबर पहिलाच!!!