कधी?... (गजल)

जीवनातली संपणार तडजोड कधी?
सापडेल का उपाय मज बिनतोड कधी?...

शब्द जिव्हारी लागती तुझे थट्टेचे
बदलणार का सांग तुझी ही खोड कधी?...

गिळून घेतो आतच माझे विचार मी
जवाब देऊ शकेन का मुहतोड कधी?...

कशाकशाच्या मागे धावत असतो मी?
बदलणार ही वृत्तीची धरसोड कधी?...

पचवत आहे जीवना तुझे सत्य कटू
वाट पाहतो शेवट होइल गोड कधी?...