सुगावा

हासून प्रणाम करावा आता
बगलेत सुरा दडवावा आता


हा फार सवाल विचारू पाहे
ह्याला चुपचाप पुरावा आता


सिंहासन आज नव्या परक्यांचे
इतिहास नवा घडवावा आता


ओढ्यात बुडे गलबत का माझे
सागर नशिबात नसावा आता


भिंतीवर चित्र चढे कोणाचे
स्मरणात वसंत उरावा आता


घायाळ असे नजरेने केले
जखमेवर जीव जडावा आता


स्नेहार्द्र तुझ्या नयनांना आवर
लागेल जगास सुगावा आता


फिर्याद तुझी करता येईना
मी आळ कुणावर घ्यावा आता


सवयीने बोथट शल्या केले
काटाही फूल ठरावा आता