बघ किती गंमत असते !

काही न सांगण्यातही बघ किती गंमत असते
शब्दांचा हात सोडण्यातही बघ किती गंमत असते 

पोटात खड्डे खड्डे पडतात, जाळ नुसता लागतो पेटू
दोन अश्रू पिण्यातही बघ किती गंमत असते 

वाटेवर अंधारात काटे कुटे खुपत जातात
रक्त सांडत चालण्यातही बघ किती गंमत असते 

जीव होतो वेडापिसा, ओढ जाते खोल खोल
तरी दूर जाण्यातही बघ किती गंमत असते

मन जेंव्हा आतुरतं मेघातून झरण्यासाठी
हातचं राखून ठेवण्यातही बघ किती गंमत असते

तुला घोर लागलेला काळजात सलतो तरी
हसण्यावारी नेण्यातही बघ किती गंमत असते 

प्रकाशाच्या दुष्काळात, नाही दिवा नाही वात
रत्नदीप होण्यातही बघ किती गंमत असते 

कशासाठी झुरायचे पौर्णिमेच्या रात्रीसाठी?
चिमूटभर चांदण्यातही बघ किती गंमत असते

-संपदा
(१०.१०.२००७)