प्रकाशपेरणी - (07 OCTOBER 2007)
"ती' खूप समजूतदार, शहाणी अन् संयमी. मला नेहमी म्हणायची, ""हे आयुष्य खूप छान आहे; ते तितक्याच छानपणे जगण्यासाठी देवानं जन्माला घातलंय. तितकंच सुंदर "मन' आपल्याला परमेश्वरानं दिलंय. रंग, गंध, रूप, नाद, स्पर्श साऱ्या संवेदना जागृत ठेवून त्याचा आस्वाद घ्यावा. देवानं तुमच्यासाठी किती निसर्गाची विविध रूपं बहाल केली आहेत; त्याकडे डोळे उघडे ठेवून पाहा ना जरा....'' असं "ती' बोलत राहायची... आमच्या मैत्रिणींच्या गटातील "ती' म्हणजे "सुधा'.
परवा परवाची गोष्ट. मीना तिच्या सुनेबद्दल सांगत होती. किती चपखल- हुशार आणि धूर्त आहे म्हणून.. खरं तर मीना शिक्षिका. कित्येक मुलांना तिनं उत्तमपणे घडवलेलं मी पाह्यलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी सून तिचा "इगो' दुखावतेय. सासूचा पैसा तिला हवा, कष्ट हवेत; पण सासूची कुठेही सत्ता नको. मीनाला ती सत्ताही दाखवायची हौस नाही. तिला हवेत दोन "प्रेमाचे शब्द' -
या सासू-सुना एकत्र राहत नाहीत. प्रसंगाने मेच्या सुटीत एखादा महिनाच एकत्र येतात. पण त्या वेळी सगळा पुढाकार सूनच घेते. छोट्या छोट्या गोष्टीत खसकन् बोलायचं- हृदयावर चरे उमटावेत असं. मीनाला हा एकुलता एक मुलगा. त्याच्यात तिचा जीव गुंतलेला असे. आणि आता तो मुलगासुद्धा, "आई तू थांब- तिला विचारून कर' असं म्हणतो. अगदी सहज सहज मीना त्याला म्हणाली- ""तू कसा राहतोस रे हिच्या विचित्र स्वभावात?'' - त्यानं शांतपणे सांगितले - ""तुझे संस्कार आहेत ना माझ्यापाशी; नाही तर आमचं नातं कधीच तुटलं असतं...'' मीनाला ते ऐकून हुंदका आला. तेही खरंच होतं. एकूण काय, चार घरांत सासू-सून हा संघर्ष जसा, तसा मीनाकडे. दोघीही सुशिक्षित असल्यानं उंबऱ्याच्या बाहेर त्याचे पडसाद नाही, इतकंच. आणि मीना सोशीक- हळवी. ती सुनेला एक शब्दही बोलत नव्हती, त्याचं कारण नवरा. अति शांत. तो प्रत्येक गोष्टीत मीनाला शांत करे. अशा या मीनाला, आता कुठल्याच गोष्टीत रस वाटत नव्हता. तेव्हा "ती' आली. ती म्हणजे आमची सुधा...
सुधा तिला म्हणत होती- ""अगं त्याच्या पायात सामर्थ्य आलंय, पंखात बळ आलंय आणि हुशार जोडीदारीण आहे. तुझ्या कुशीत किती दिवस त्याला ठेवणार आहेस? घरट्यातून उडायला शिकवल्यावर पक्षीणसुद्धा निर्धास्त होते. आणि तू... तू निर्धास्त हो. तुझं वाचन कर. अगं तुझ्याकडे कथा सांगण्याची केवढी सुंदर कला आहे! ती विकसित कर. पूर्वी जसं पौरोहित्य शिकायला जात होतीस, तसं शिकायला जा- आम्हा मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये पूर्वीसारखी ये. आता आपणच आपलं विश्व व्यापक करायचं असतं. मूल-सून-नातवंड यापेक्षा अजून दुसऱ्या गोष्टींत आनंद लुटायला शीक.''
सुधाचं सारं तंत्र मीनानं ऐकलं आणि एक समृद्ध जीवन आता ती जगतेय... मुलाला आणि सुनेलाही तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटावं असं. तिच्या मनातली निराशेची मरगळ कधीच गेली आणि तिथं लख्ख प्रकाशाचा झोत आला- तिला उजळून टाकणारा. या प्रकाशाच्या कवेत अशा दुःखी सासवांना घेऊन ती प्रकाश पेरीत जाईल, हे नक्कीच.
लेखिका- सौ. अनुपमा अ. पंडित श्रीपूर