तुला वरदान 'ति'चे...

एखाद्या मनस्थितीत कविता मनातून उलगडत येते... कोणाशीतरी बोलून मोकळं झाल्यासारखं होतं. पण बऱ्याचदा ती हवं तेव्हा सुचत नाही आणि मग चिडचिड होते. ज्याच्यापाशी ती सहज येते अशा माझ्या एका कवी मित्रासाठी ही कविता ! कविता सुचण्याचे वरदान लाभलेल्या सगळ्यांसाठीच खरंतर !!

सांग कशी 'ती' कुठून येते? शोधत तुजला दिशांदिशांतून.....

येऊन जाईल नुसती ? नाही ! हलवून जाते आतून आतून....

इतकी भिनली आहे रे 'ती' तुझिया शब्दांच्या आकाशी

वाऱ्यावरती विहरत जाते, वाहत येते माझ्यापाशी....!

साठवते मी एकदाच 'ति'ज... डोळे जाती भरून तेव्हा...!

लिहितच बसते 'तू' सुचल्यागत; रात्रही जाते सरून जेव्हा !!

पुरी-अपुरी मग 'ती' माझ्या नीजेला ओलांडून जाते !

पूर्वेच्या क्षितिजापाशी अन किरणे होऊन सांडून जाते !!

जागे व्हावे; 'ति'ने नसावे; खेळ जुने हे आभासांचे

नको वाटते आताशा मला हे आकाश तुझ्या शब्दांचे !

गहिऱ्या तपकिरी डोहांपाशी कधी मला 'ती' दिसली होती...

निसटून गेली क्षणार्धात बघ; तूच पापणी मिटली होती.

नको दाखवू पुन्हा पुन्हा तू तुझे नि शब्दांचे हे मैतर

तुझ्या 'ति'लाही उमगत नाही माझे घुसमटलेले अंतर

कोडे पडले युगायुगांचे; सुटले ना अद्याप मला ;

कसे तुला वरदान 'ति'चे, अन मौनाचा हा शाप मला !!

*****