मांडला गेलो इथे मी...!
......................................
मांडला गेलो इथे मी ऐन गर्दीच्या ठिकाणी...
हासती सारे...कुणाच्या का न यें डोळ्यांत पाणी ?
प्रीत होती, स्वप्न होते, सूर होते, गीत होते...
- हे पुढे संपेल सारे...हे कुठे माहीत होते ?
राहिली नाही कशाची आज काहीही निशाणी
हा असा साऱयाच जन्माचा कसा बाजार झाला ?
चार भिंती पारख्या...रस्ताच हा आधार झाला !
दुःख हे ओशाळवाणे...वेदना ही दीनवाणी...
नाइलाजानेच माझी लाजही निर्लज्ज झाली
धूळ रस्त्याची उडे...ती अंग झाकायास आली !
नागव्या दुनियेतली हा नागडी माझी कहाणी !
विद्ध झाला सूर...आहे गायचे आता तरीही...
रुद्ध झालेला गळा ठेवायचा गाता तरीही...
कोडगे हे श्वास...त्यांची तीच ती लाचार गाणी !
आजची आहे दशा ही कालच्या त्या वैभवाची
हाय ! घालीना कुणीही भीक एका आसवाची
कोरडा माझा कटोरा....त्यात ही खोटीच नाणी !
* * *
- यातही आनंद आता मानतो आहे जरी मी
मुक्त मी होईन का...जाईन का माझ्या घरी मी ?
...की अशी संपेल ही वाऱयावरी माझी विराणी ?
रचनाकाल ः १४ ड़िसेंबर २००३
- प्रदीप कुलकर्णी