बाहेर उन्हाचा चटका म्हणावा तेवढा नव्हता. पण एसी बंद करावा तर चटचटू लागे, आणि चालू करावा तर त्या गारशीळ वार्याचे हबके बसून अंग जडावे. तो गारवा सोसतही नव्हता आणि संपूर्णपणे सोडवतही नव्हता.
अस्वस्थपणे तिने हातातले पुस्तक उशीशेजारी ठेवले आणि डोळे मिटायचा प्रयत्न केला. हा सतरावा. पण डोळे मिटल्यावर परत तेच भुंगे मन पोखरायला आले. आणि उघडल्यावर परत पुस्तक उघडायची रटाळ कृती करायचाही कंटाळा आला.
तिरीमिरीने उठून तिने पडदे बाजूला सारले. समोरच्या मोकळ्या मैदानावरून प्रकाशाचा झळाळ आत आला. दुखर्या देहाने ती उष्णता तिने पिऊन घेतली.
=========
घाटात गाडीचे सुकाणूचक्र डावी-उजवीकडे फिरवून फिरवून त्याला नेहमीप्रमाणेच कंटाळा आला. अजून किती, अजून किती चा घोष मनात सुरू झाला. तसा तो सकाळपासूनच सुरू झाला होता म्हणा.
एरवी गाडी चालवताना त्याला दुसरी कसली गरज पडत नसे मन रमवायला. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून गाडी चालवत होता तो. गाडी चालवण्याची झिंग पुरेशी नसेल तर गाडी चालवूच नये असे त्याचे स्पष्ट मत होते. पण आज त्याला अचानक कंटाळा दाटून आला. त्याने कॅसेट आत सरकवली. ती नेमकी कालच्या रात्रीच्या मैफलीचीच निघाली. ध-नि-रे-ध-नि-रे-ग-ध-नि-रे-ग-म-ध-नि-रे-ग-म-ध-ध-नि-रे-ग-म-ध-नि-रे-नि-नि-ध-नि-नि..... खटकन त्याने कॅसेट बंद केली.
गाडीने वळण घेतले आणि उन्हाची तिरीप थेट डोळ्यांवर आली. डोळे किलकिले करून त्याने दुखर्या अंगात मुरलेला आळस कडकडवला. आणि हुशारून परत गाडी चालवण्यावर लक्ष लावले.
=========
गाडीचा आवाज वाळू आणि खडीच्या वाटेवर फरफरला.
नाइलाजाने पाय रेटत ती पोर्चमध्ये आली.
अनिच्छेने जडावलेले अंग त्याने गाडीतून बाहेर लोटले आणि पोर्चच्या पायर्या कशाबशा पार केल्या.
दोघेही समोरासमोर आले.
डोळ्यांनी लपंडाव खेळून पाहिला, पण शेवटी धावत्या नजरेला चोरटी नजर चाटून गेलीच.
कष्टाने ते दोघेही एकमेकांसमोर उभे राहिले.
"मला माफ कर. मी तुझ्याशी प्रतारणा केली" परवचा म्हटल्यासारखा दोघांनी एका सुरात, एका लयीत शब्दांचा झोपाळा झुलवला.
आणि काय झाले ते कळूनही न कळल्यासारखे दोघेही दिङ्मूढ होऊन टकाटका पाहत राहिले.