वडगाव

 'सेतू' हा आमचा नागपूरमधला अभिनव उपक्रम.एखादा विषय घ्यायचा उदा. शिकवणी वर्गाची गरज, मुलांचा आहार, मुलांना वाचनाची आवड कशी लावता येईल इ. व त्या विषयातील तज्ञाला बोलावून त्यांच मार्गदर्शन व चर्चा असा महिन्यातून एकदा कार्यक्रम घेत असतो. चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू असूनही दर भेटीत वेळेच्या अभावी आम्ही एकमेकांच्या आवडीनिवडी, छंद, मुलांची ओळख होत नव्हती.  आपाआपसांत ओळख व्हावी, संवाद साधता यावा ह्या हेतूने एक सहल काढायची ठरलं! सणवार नाही, परीक्षा नाही असा सगळा विचार करुन, ६-७ सप्टेंबर ह्या तारखा वडगावला जाण्यासाठी ठरवल्या होत्या. पाहुणे येणार आहेत, मुलांच्या गीतापठणाच्या स्पर्धा आहेत, घरात कोणाला तरी बरं नाही अशी अनेक कारणं ऐकायला मिळाली तेव्हा वाटलं ३० सीटरचीच बस ठरवावी. पण हो-नाही करता-करता २ वर्षापसून ५० वर्ष वयापर्यंतचे ४५ जण तयार झाले आणि ५० सीटर बस ठरवावी लागली. १५ जणांचे पैसे जमा झाल्यावर आमच्या संस्थेची(सेतु-A conscious parent forum) संस्थापक  स्नेहा आणि मी अविनाश देऊस्कर सरांना भेटायला गेलो. प्रसिद्धी परामुख असलेल्या सरांची आणि माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती. सरांनी आयोजित केलेल्या पहिल्या मुलींच्या कुलु-मनाली गीर्यारोहण कॅम्पला स्नेहा गेली होती. सध्या गीर्यारोहणा व्यतिरिक्त मोठमोठ्या एमएनसीज व कारपोरेट वर्ल्डच्या लोकांना ट्रेनिंग देण्यात व्यस्त असल्याचे शांत, मृदू व मितभाषी अविनाश सरांनी सांगितलं. आम्ही आमचा कार्यक्रम सांगितला. "तुमचा मुख्य उद्देश पालकत्व आहे, त्यादृष्टीने मी काही खेळ घेईन," सर म्हणाले. पाचच मिनिटात आमची भेट आटोपली आणि आम्ही त्यांच्या खोलीतून बाहेर पडलो. दारातच सरांच्या पत्नी भेटल्या. स्नेहाला पाहून त्यांना इतका आनंद झाला की काय बोलू न काय नको असं झालं.त्यांच्या नेतृत्वाखाली केलेली २२२१८फुट 'भृगुपंथ शिखर'चढाईची मोहिम यशस्वीरित्या पार पाडून आल्याबद्दल आम्ही त्यांच अभिनंदन केलं. मनमोकळ्या विमला नेगी-देऊस्कर हिंराठीत मोहिमेच वर्णन सांगत होत्या. आणि हो मुलांच व नवऱ्याच कौतुक करायला विसरल्या नाहीत. " मी काही केलं नाही, मी फक्त त्यांच्या शाळेत जाण्याऱ्येण्याच्या व जेवणाच्या वेळा सांभाळल्या," त्यांना मध्येच अडवत सर म्हणाले. आता ६ तारखेला भेटायच ठरवून आम्ही त्या दोघांचा निरोप घेतला. आम्ही ६ तारखेला  भारतीय वेळेनुसार निघालो. शिरस्त्याप्रमाणे गाडीत गाण्याच्या भेंड्यांचा खेळ सुरू झाला. गाणाऱ्यांच्या व गाडीच्या सुरात सुर मिसळण्यात कोणीच मागे नव्हते. पोहचेपर्यंत अंधार पडला त्यामुळे धरण बघण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवसावर ढकलल्या गेला. चहा व  मुलांसाठी बोर्नव्हिटा तयार करुन आमची वाट पाहत होते. चहापाणी आटोपल्यावर १० मिनिटात मोठ्या छत्रीखाली गोळा व्हायला सरांनी सांगितलं. पालक आपल्या चिल्ल्या-पिल्ल्यांना तयार करून २० मिनिटात गोळा झाले. रोजच्या शाळा, अभ्यास, शिकवणीवर्गाला जखडलेल्या मुलांना हुंदडायला मोकळं रान मिळाल होतं, त्याचा पुरेपुर फायदा घ्यायला ते आई-बाबांकडे न बघता सज्ज झाले होते.

आपापली ओळख सांगण्याच्या कार्यक्रमानंतर जोडप्यांसाठी एक गंमतशीर खेळ ठेवला  होता. साताजन्माच्या बंधनात अडकलेल्या जोडप्यांना बांधलेल्या दोरातून मोकळं व्हायच होतं. नवऱ्याला साधारण अर्धा मीटर लांबीच्या दोराच्या बेड्या घातल्या त्यातून तेवढाच दोर काढून बायकोला बेड्या घातल्या. पाहिल्या बरोबर अशक्यप्राय वाटत होतं पण अक्षरशः दोनच मिनिटात बोकारे पती-पत्नी यशस्वी झाले. कोल्हाला द्राक्षे आंबट प्रमाणे आम्हाला असेच राहयला आवडेल असे म्हणत इतर सगळे प्रयत्न मात्र करत होते. लहान मुलांच्या भुकेची अन झोपेची वेळ झाल्यामुळे खेळ आटोपते घ्यावे लागले. गरमा-गरम साध पण चविष्ट आणि मुख्य म्हणजे आयतं जेवण मिळाल्याचा आनंद सगळ्या गृहिणींच्या चेहऱ्यावर अनपढसुद्धा वाचू शकला असता. तृप्तीची ढेकर देत वरच्या मजल्यावर स्लाईड शो बघायला गेलो. 'प्रेरणा'(मोटिवेशन) व 'आऊटवर्ड बाऊडिंग' ह्या दोन्ही फिल्म छान होत्या. त्यानंतरच्या सादरीकरणाच्या खेळात बाजी मारली 'खेर' कुटुंबानी. नवऱ्याचे टक्कल, बाळाचे विरळ जावळ आणि स्वतःचे लांब केस अश्या उपलब्ध गोष्टीतून केलेली केशतेलाची जाहिरात अप्रतिम. मनिषाने लहानपणीचे खेळ व त्यातून काय शिकलो(आत्मविश्वास, एकाग्रता, सहकार्य आणि तेही चकटफू कारण हे सगळ शिकायला तेव्हा पर्सनॅलिटी डेव्हलप्मेंटचे क्लासेस नव्हते) हे सांगितले. दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रम सकाळी सहा वाजता सुरू होणार होते त्यामुळे इच्छा नसतानही झोपायला जावेच लागले.

घरी लवकर उठायला कुरकुरणारी मुलं एका हाकेत उठून पटकन तयार झाली. आम्ही अंगणात आलो तर कोईमतुरच्या एका शाळेची तिसरी ते आठवी पर्यंतची मुलं त्यांच्या शिक्षकांसह शिस्तीत उभी होती. चार दिवसांचा त्यांचा कॅंप होता आणि आज ते परत जाणार होते. कोईमतुर ते नागपुर हा २४ तासांचा प्रवास, त्यात कुठलाही एशोआरामाच्या/लक्झरी नसलेल्या ठिकाणी चार दिवस पाठवणाऱ्या पालकांची व सरांनी कमावलेल्या विश्वासाबद्दल, सरांची मनोमन पाठ थोपटली.

रोज सकाळी आम्ही फिरतोच पण दाट हिरव्या वनराईतून, पक्ष्यांच्या किलबिलाटात फिरणे हा इथला अनुभव काही आगळाच होता. कॅंपपासून साधारण दोन किमीवर पसायदान परिसर आहे. ध्यानमंदिराच्यावर तीस फुट उंचीची ज्ञानेश्वर माऊलीची भव्य मुर्ती व शिवाजींच्या किल्ल्यांचा नमुनाकृतींमुळे पसायदान परिसर लहान-थोरांसाठे प्रेक्षणीय झाला आहे. ध्यानमंदिरात प्रवेशद्वाराच्या समोर  ध्यानसाधानेसाठी निळ्या चौकोनात चक्रांच्यामध्ये 'ओम' अंकित केला आहे. त्या 'ओम' वर मन एकाग्र झालं तर बाजूची चक्रे फिरताना दिसतात. दहा मिनिटं ध्यान लावण्याचा प्रयत्न केला. सरांनी धीर गंभीर पण मृदू आवाजात ध्यानसाधनेचे महत्त्व थोडक्यात सांगितलं. हा एक अविस्मरणीय अनुभव होता.

 आता अध्यात्मिक विश्वातून आम्हाला साहस-विश्वात जायच होतं. निरनिराळे साहसी खेळ तिथे तयार करून घेतले आहेत. त्यावर काही प्रात्यक्षिकं तिथल्या शिक्षकांनी करून दाखवली. ६० फुट उंचीच्या प्रतिमात्मक भिंतीवर थोड्या-थोड्या अंतरावर टप्पे (जसे माणसाचा ६० वर्षाचा जीवनालेख) केले आहेत. त्यावर कसे चढले पाहिजे व उतरतांना कशी काळजी घेतली पाहिजे हे प्रात्यक्षिकाद्वारे अत्यंत उत्तमरित्या समजावून सांगितले. त्यानंतरचा खेळ होता 'मैत्री'. १,२,३..१,२,३ म्हणून ८-८ व्यक्तिंचे तीन गट पाडले. प्रत्येक गटानी गोलाकर उभं राहायचं. आपल्या समोरच्या व्यक्तिशी हस्तांदोलन करून त्या व्यक्तिचा स्वभाव विशेष सांगायचा, ती व्यक्ती आपल्याबद्दल सांगेल. हातात हात तसाच राहू द्यायचा. असं गटातल्या प्रत्येकानी केल्यावर दुसऱ्या हातानी इतर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तिशी हस्तांदोलन करून मैत्री करायची. असं करता सगळे जवळ आले. मला वाटलं, ओळख झाली, जवळ आलो, झाला खेळ! खरी गंमत पुढे होती. आता हातातले हात सुटू न देता मोठ्ठा गोल करायचा होता. एक हात एकाच्या हातात तर दुसरा शेजारच्या हातात . कसं शक्य आहे? पण दोनच मिनिटात शक्य झालं तीन नंबरच्या गटाला. त्यांचा हर्षोत्सव सरांनी कॅमेरात आणि आम्ही डोळ्यात टिपला. कालपासून गटा-गटानी राहणारे, एकत्र कसे आले हे सरांनी 'मैत्री' मधून दाखवून दिले.

                   

इडली-सांबार-चटणी असा भरपेट नाश्ता करून उत्सुकतेने पुढच्या खेळासाठी सज्ज झालो.पुढचा खेळ होता आंधळी कोशिंबीर पण ह्यात पकडा-पकडी नव्हती. नवरा-बायको (आपापले) जोड्या करायच्या. नवऱ्याच्या डोळ्याला पट्टी बांधायची व बायकोने नवऱ्याचा हात पकडून त्याला फिरवून पाच मिनिटात वापस यायचे. बायकोने मौन पाळायचे व नवऱ्याने अखंड बडबड करायची. एकजात सगळे नवरे खुष झाले हे सांगायलाच नको. अंगठ्याने दाबले की डावीकडे वळायचे व बोटानी दाबले की उजवीकडे वळायचे ह्या दोनच खुणा करायची परवानगी होती. ह्यानंतर विरुद्ध करायचे आहे हे माहित नसल्यामुळे अखंड बडबड करण्याचा आनंद नवरे घेत होते. सर प्रत्येक जोडप्याच निरीक्षण करत होते. त्यांनी त्याच केलेलं विवेचन  सकारत्मक असलं तरी विचार करायला लावणारं होतं.

नंतरचा खेळ होता तलावाकाठी.  दोन गट पाडले. प्रत्येक गटाला बांबू, प्लॅस्टिकच्या कॅन, दोर, वल्हे, लाईफ जॅकेटस अशी सामुग्री दिली होती. तलावाच्या दुसऱ्या टोकाला झेंडा रोवलेला होता. गटप्रमुखाला चिठ्ठीत काय करायच आहे ते लिहून दिलं होतं. दोन्ही गटानीदिलेल्या सामुग्रीचा तराफा तयार केला आणि लाईफ जॅकेटस घालून पाण्यात उतरले.  आमचा गट पुढे होता. मागे वळून बघितलं तर दुसरा गट काठावर उभा होता. बहुतेक त्यांचा तराफा जमला नसावा आता आपणच जिंकणार ह्या आनंदात, हरहर महदेवच्या गर्जनेत पुढे निघालो. आम्ही तो झेंडा घेतला आणि वापस आलो. जिंकल्याचा आनंद कुणाच्याच चेहऱ्यावर नव्हता. पहिल्या गटानेही आमचं अभिनंदन केलं नाही कारण तेही तेवढेच खजिल होते त्यांच्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं लीव्ह द फ्लॅग ऍज इट इज ( म्हणजे त्यांना तराफाही करायची गरज नव्हती)आणि आमच्या चिठ्ठीत ब्रिंग फ्लॅग( जो आम्हाला काठाच्या बाजूनी चालत जाउनही आणता आला असता). ह्या खेळानी मात्र सगळेच अंतर्मुख झाली. आपण आपल्या जीवनातही सोप्या-सोप्या गोष्टी अवघड करून जीवाचा आटापीटा करत असतो. सुसंवादानी प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतात हा बोध घेत तयार व्हायला बॅरॅक मध्ये आलो. हे सगळे खेळ होईपर्यंत एकाही पालकाला मुलांची आठवण आली नाही मुलांना न होणं स्वाभाविकच होतं कारण मनोजदादानी त्यांच्यासाठी खेळ तसे आखले होते.

           

झाडाखाली जेवणाची तयारी झालेली होती. नाश्ता केव्हाच जिरला होता. जेवण करून थोड्या वेळात निघावं लागणार होतं जातांना वाटेत धरणही बघायचं होतं. सरांच्या मुलाला बरं नसल्यामुळे ते आमचा निरोप घेऊन आधीच निघाले होते, पुढील सुत्र ललितच्या हाती सोपवून. कालच्या सारखचं आजचही जेवण अतिशय रुचकर होतं. एवढ्या परिश्रमानंतर, पोटभर जेवल्यावर सगळेच सुस्तावले होते पण एक शेवटचा खेळ/कार्यक्रम राहिल्यामुळे काही चान्सच नव्हता. प्रत्येकाला एकेक लंब आयाताकृती पिवळा कागद दिला. त्यावर स्वतःचे नाव लिहून तो कागद आपल्या शेजारच्या व्यक्तिला द्यायचा. आपल्याजवळ असलेल्या ज्या व्यक्तिचा कागद असेल त्या व्यक्तिमधील आपल्याला आवडलेले गुण लिहून तो कागद पुढच्या व्यक्तिला द्यायचा. अशा तऱ्हेने प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाबद्दल चांगलंच लिहून तो कागद आपल्या जवळ  परत येणार. कागद हातात आल्यावर आश्चर्याचा सुखद धक्का बसला . हा पॉझिटिव्ह ऍटीट्यूड घेऊनच गाडीत बसलो. For more information log on to http://www.outwardbound.org.in/