"माय" मराठीच्या कोशात इंजिनीअर, इस्टेट, ऑफिसर...

आजच्या म.टा. त ही माहिती वाचून आनंद झाला. अनेक प्रचलित शब्दांची भर शब्दकोशात केलेली  पाहून बरे वाटले. सर्वांना ही माहिती व्हावी आणि तिच्यावर विचारांची देवाणघेवाण करता यावी ह्या उद्देशाने ती येथे उतरवून ठेवीत आहे.

म.टा.तली मूळ बातमी : "माय" मराठीच्या कोशात इंजिनीअर, इस्टेट, ऑफिसर...
शनिवार १७ नोव्हेंबर २००७.

सारंग दर्शने, मुंबई

इंजिनीअर, इस्टेट, कंटेनर, क्रशर, आरसीसी, आरडीएक्स, अॅडमिरल, अॅक्युपंक्चर, अॅडॅप्टर, पाईप, सर्कल ऑफिसर, अल्ट्राव्हायोलेट या आणि अशा असंख्य शब्दांचा अर्थ आता सापडेल...मराठी शब्दकोशात! गेल्या दोन दशकांत रोजच्या वापरातली मराठी झपाट्याने बदलली, समृद्ध झाली असली तरी तिचे प्रतिबिंब कोशांमध्ये उमटतच नव्हते. ही त्रुटी दूर झाली आहे ज्येष्ठ अभ्यासक (कै.) मो. वि. भाटवडेकर यांच्या या नव्या शब्दकोशामुळे.

या कोशाचे नावच आहे 'व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश'. त्यामुळे मराठी माणसे आज वापरत असलेले सारे शब्द सोवळेपणा न करता कोशात समाविष्ट झाले आहेत. ऑक्सफर्ड शब्दकोशांच्या आवृत्त्या निघतात तेव्हा इंग्रजीत येणाऱ्या नव्या हिंदी, जपानी, रशियन शब्दांना त्यात आवर्जून स्थान दिले जाते. तसाच दृष्टिकोन हा कोश करताना ठेवण्यात आला.

वयाची आठ दशके उलटलेले भाटवडेकर काही वर्षांपूवीर् हा ४५ हजार शब्दांचा कोश करायला बसले तेव्हा त्यांनी सगळ्या मराठी दैनिकांचा, नियतकालिकांचा कसून अभ्यास केला. बातम्या, लेखांमध्ये वापरला जाणारा प्रत्येक शब्द या कोशात आला पाहिजे, असा निकष ठेवला. याशिवाय, मराठी माध्यमाच्या पहिली ते बारावीच्या प्रत्येक विषयाच्या पुस्तकातील हरेक शब्दही कोशात घेतला.

राज्य सरकारने कित्येक दशकांपूवीर् रसायन, अभियांत्रिकी आदी विषयांचे खास मराठी कोश तयार केले. शासन व्यवहार तसेच परिभाषा कोशही प्रकाशित केला. पण या शब्दांना परंपरेत अडकलेल्या शब्दकोशांनी फारसे स्थान दिले नाही. भाटवडेकरांनी सरकारी कोशांमधले सगळे शब्द (मृद्संधारण, निरसित, संविदा, निवडश्रेणी, पुनरीक्षण...) मुद्दाम घेतले. या शब्दांचे अर्थ नीट कळणे म्हणजे 'एम्पॉवरमेंट'च, हा त्यामागचा दृष्टिकोन.

अनेक वषेर् खपून भाटवडेकरांनी सिद्ध केलेला हा कोश 'राजहंस प्रकाशन' प्रकाशित करत आहे. तो पाहण्यास भाटवडेकर मात्र हयात नाहीत. याआधी 'पर्यायी शब्दांचा कोश' केलेले भाटवडेकर मूळचे नामांकित अर्थतज्ज्ञ. मराठीवरील

प्रेमापोटी त्यांनी निवृत्तीनंतर

हे दोन कोश केले. यानंतर 'अर्थच्छटा कोश'

बनवण्याचाही संकल्प त्यांनी सोडला होता. तो मात्र

अपुराच राहिला...

जनरल नॉलेज परिशिष्टे

मोठ्या साडेआठशे पानांच्या या कोशात भाटवडेकरांनी २९ परिशिष्टे समाविष्ट केली. त्यात जगातले देश, भारतातील राज्ये, राशी, नक्षत्रे, सर्व कालगणना, मूलदव्ये, सागरी अंतरमापन, महाराष्ट्राचे जिल्हे, मुख्यमंत्री, राष्ट्रीय पुरस्कार असे विविधांगी तपशील आहेत.


राज्य सरकारने कित्येक दशकांपूवीर् रसायन, अभियांत्रिकी आदी विषयांचे खास मराठी कोश तयार केले. शासन व्यवहार तसेच परिभाषा कोशही प्रकाशित केला. ..... हे कोश कोठे मिळतात? किंमत किती असते? आपल्यापैकी कोणी वाचले / बघितले आहेत का? कोण वापरतात ह्याची काही कल्पना आहे का? हे कोश जालव्यग्रतेने (ऑन लाइन) न्याहाळता येतात का? येतील का?

शासकीय आणि पाठ्यपुस्तकातील प्रचलित प्रतिशब्द आता शब्दकोशात घेण्याने नेमका काय फरक पडेल? त्यांच्या वापराविषयी प्रामाण्य येण्यास मदत होईल की कसे?