वैताग

ऑफिसला जाताना एवढा वैताग त्याला कधीच वाटला नव्हता. नोकरी सोडून घरची उत्तम शेती करायची रोमँटिक कल्पना त्याच्या डोक्यात असंख्य वेळा चमकून गेली होती. पण पेपरातल्या आत्महत्यांबद्दल वाचून वडलांनी आणि यंदा मुलाचे कर्तव्य आहे असा झेंडा (त्याच्या पगारपत्रकासहित) मिरवणाऱ्या आईने त्याच्या कल्पनेला डोक्याबाहेर पडू दिले नव्हते. त्यामुळे वैताग वेगवेगळ्या स्वरूपात वाढतच होता. पण आता सगळ्याच गोष्टींचा कडेलोट होतोय असं त्याला गेले काही दिवस मुद्दामच वाटत होतं. पण आजचा दिवस जणू आपल्यावर सूडच उगवायला उगवलाय अशी खात्रीच त्याला ऑफिसमध्ये पाऊल टाकल्यापासून झाली. आपण जागी पोहोचायच्या आधीच जर आपला बॉस आपल्या क्यूबिकलमध्ये आपली वाट पाहत उभा असेल तर त्यासारखा मोठा अपशकुन कोणता अख्ख्या जगात नसेल. आता चार वाजेपर्यंत काही फॉरवर्ड्स वाचता येणार नव्हते, चॅटिंग तर लांबची गोष्ट. आता मेलबॉक्स चार दिवस मुक्ती न मिळालेल्या महानगरपालिकेच्या कचरा कंटेनरसारखा भरून वाहणार होता. कंटेनरची आठवण होताच नाकात वास भरून त्याचा चेहरा वाकडा झाला. नेमकी त्याची तीच भावमुद्रा टिपून बॉसनं निदान हजारवेळा मारलेला हँगओवरचा पकवू पीजे परत मारला आणि स्वत:च आपल्या पीजेवर खूश होत ख्या ख्या करून हसला. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या अप्रायझलची आठवण करून त्यानं मन मारून स्माइल केलं आणि गुडमॉर्निंग म्हटलं. ढीगभर कामाची जंत्री त्याच्या गळ्यात मारून एक तासानं बॉस त्याच्या क्यूबिकलबाहेर पडला तेव्हा त्याला आपल्या क्यूबिकलवर मोठा काळा ढग बरसायच्या कमांडची वाट बघत थांबलाय असं वाटलं. काले मेघा काले मेघा पानी तो बरसा म्हणत अचकट विचकट नाचणारे लगानमधले आमिरचे सगळे गावकरी बॉसचे नातेवाईक असल्याची फालतू कल्पना त्याच्या मनात उगीचच तरळली. दुपारी टिफीन डेस्कवर यायच्या दोन मिनिटं आधी बॉस लंचनंतरच्या मीटिंगची दवंडी पिटून गेला आणि त्याचं जेवण पार अळणी होऊन गेलं. मीटिंगमध्ये नकट्या कुरूप पोरीचा बाप असल्यासारखा बॉस कस्टमरच्या सर्व मागण्या मान्य करतच चालला होता. टीचभर क्यूबिकलमध्ये आणि वीतभर ऑफिसमध्ये जन्मठेपेच्या कैद्यासारखं पिझ्झ्याचे तुकडे चावत काढाव्या लागणाऱ्या पुढच्या असंख्य संध्याकाळी आणि रात्री त्याच्या नजरेसमोर तरंगल्या. मीटिंगनंतरच्या इंटर्नल डिस्कशनमधे शेड्यूलवर बॉसबरोबर तासभर वाद घालून त्याचं डोकं पिकून गेलं होतं. संध्याकाळी टीमबरोबर चहा घ्यायला टपरीवर आला तेव्हा गप्पांची सुरुवात होम लोन या त्याच्या नावडत्या विषयानेच सुरू झाली. मग कुठं बुक केला फ्लॅट असं दोघातिघांनी विचारल्यावर त्याला गावाकडं आई वडलांचं घर असूनसुद्धा उगीचच बेघर वाटायला लागलं.  चहाबरोबरच्या गप्पांचा शेवट अपेक्षित पण वैतागवाणा असा शेअर मार्केटने झाल्यामुळे त्याला आपण रेसकोर्सच्याबाहेर बसून चणे विकणाऱ्याच्या लायकीचेच असल्यासारखं वाटलं.

संध्याकाळी ऑफिसमधला मुक्काम दहा तासापेक्षा जास्त लांबल्यानंतर आणि खिडकीतून काळोख डोकावू लागल्यानंतर त्याचा मोबाईल वाजला तेव्हा अंमळ आश्चर्याने त्याने नंबर बघितला. नंबर ओळखीचा तर नव्हताच पण घड्याळाकडं एक नजर टाकून हा फोन कुठल्या बँकवाल्या अक्काबायचा असणार नाही याची मनोमन खात्री करून, एस टी डी कोड कुठला असेल असा विचार करत त्याने फोन उचलला. पलीकडचा पुरुषी आवाज अगदी परिचित नाही पण एखाद्या खोल तळाच्या पिशवीत चाचपताना वस्तू हाताला लागावी पण ती काय आहे हे कळू नये असा वाटत होता. खूप वेळ फिरकी घेऊन पलीकडच्या आवाजाने ओळख करून दिली तेव्हा कचकून एक शिवी त्याच्या तोंडून बाहेर पडली आणि त्याचा आवाज उगीचच मोठा आणि मोकळा झाला. गावच्या कट्ट्यावर ऐसपैस बसावं तसा तो टेबलावरचं फतकल मारून बसला. काही मिनिटातच मनाने [float=font:vijay;color:D7002B;background:F3F2F0;place:top;]तो त्या फोनवरच्या आर्मीतल्या मित्रांच्या सीमेवरच्या कुठल्याशा निर्जन पोस्टवरच्या बराकीत जाऊन पोचला. त्याचं क्यूबिकल आणि मित्रांची बराक एक तासाभरासाठी शेजारी शेजारी असल्यासारखंच वाटत होतं त्याला.[/float] इकडं हा ऑफिसमध्ये एकटा आणि तिकडं ति पोस्टवर एकटे. तिकडं पडणारा हिमवर्षाव आणि थंड बोचरा वारा स्वत: अनुभवत असल्यासारखं तो अंग चोरून बसला. मित्र सुटीसाठी गावी येताहेत हे ऐकून त्याला बऱ्याच दिवसांनी गावी जायची ओढ लागली. मित्रांच्या सुटीच्या तारखांची मनात उजळणी करत त्यानं फोन ठेवला तेव्हा त्याला जरा बरं वाटू लागलं. पँट्रीत जाऊन ताजमहालच्या पिशव्या टाकून बनवलेला चहा मायक्रोवेव्हमधे जरा जास्तच उकळून त्याने एक घुटका घेतला. दुपारी बॉसबरोबरच्या भांडणानंतर आखलेल्या प्रोजेक्टच्या पसरट वेळापत्रकावर नजर टाकून त्याने मित्रांच्या सुटीशी जुळणाऱ्या तारखा टिपून एक रजेचा अर्ज भरला. तो अर्ज बॉसला (तारखांच्या स्पष्टीकरणासहित) मेल करून तो निघाला तेव्हा ऑफिसबाहेर पडताना एवढे प्रसन्न त्याला कधीच वाटले नव्हते.