स्वप्ना (१)

स्वप्ना -

" अवी ऽ !"
                आईची हाक आली. ती मी ऐकलीही पण उत्तर द्यावंसं वाटलं नाही. कारण तिला काय म्हणायचं होतं ते मला चांगलंच माहिती होतं आणि तो विषय मला नको होता. तरीही मला ते ऐकावं लागणारच होतं. तिला फार काळ असं टांगणीला ठेवणं आता या पुढे जमणारं नव्हतं. आता मी तिला टाळण्याचा जराही प्रयत्न केला तर दुखावली जाणार होती. बाबा गेल्यापासून ती फारच हळवी झाली होती.  

"अरे! ऐकतोयस ना." आई पदराला हात पुसत समोरच येऊन उभी ठाकली.
" हं, बोल "
" मी काय म्हणते.. करंबेळकरांचा काल पुन्हा फोन आला होता."
" बरं ! "
" अरे, बरं काय? मी काय म्हणते... एकदा मुलगी बघायला काय हरकत आहे?"
" हं !"
" कम्माऽल झाली बाई तुझी! तू लग्न करणारेस की नाही? ...ते काही नाही. येत्या रविवारी ते मुलगी आणताहेत, दाखवायला. 
 मी हो म्हणालेय त्यांना. मुलगी चांगली शिकलेली आहे. इंटीरीयर का कसलासा कोर्सही केलाय आणि खूप देखणी आहे म्हणे."

" देखणी! ....तशी असेल का गं!" मी तंद्रीतच बोललो. आईच्या बोलण्याकडे माझं लक्ष होतंही आणि नव्हतंही.

" तशी म्हणजे कशी? तू काय लावलं आहेस हे? तू काय दुसरी एखादी मुलगी बिलगी पाहिलीएस की काय? आणि मग सांगत का नाहीस तसं? "
" तसं काही नाही गं. ठीक आहे. बघू."
" बघू बिघू काही नाही. रविवारी घरीच राहा आपण. आणखी एक मेहेरबानी करा. कशात हरवू बिरवू नका."

                आई मला हरवू नका म्हणाली पण मी आताही हरवलेलाच होतो. तिला पाहिल्या पासून या हरवलेलेपणाच्या धुक्यात मी गुरफटून गेलो होतो.  या क्षणीही ती जणू माझ्या समोर उभी होती.  मी आताही माझा उरलो नव्हतो. एखाद्या कळसूत्राने जणू माझा ताबा घेतल्यागत मी कपाटातून माझी रोजनिशी काढली आणि मागच्या कप्प्यातले तिचे छायाचित्र काढून त्यात हरवलो.

               एक जुनाट वाडा. वाडा कसला जणू गढीच. वाड्याच्या मागे एक भलं मोठं परस. परसात एक भली मोठी बारव. परसात झाडझाडोराच माजलेला. वाड्याची तशी बारवेचीही पडझडच झालेली. पण बारव अजून बर्‍यापैकी तग धरून राहिलेली. वरल्या तोंडाला अष्टकोनी  चिरेबंदी घेर. बारवेला एका बाजूने पाण्याच्या डोहापर्यंत उतरत जाणार्‍या पायर्‍या. पायर्‍या जिथे सुरू होतात त्याच्या जरा पुढे वरती ताशीव दगडांची डौलदार कमान. कमानीच्या आतील भितीवरून लटकणार्‍या हिरव्याकंच रानवेली. कमानी खाली भिंतीला अलगद टेकून, काहीशी ओठंगून पण अगदी ऐटीत उभी ती आणि सुंदर हा शब्दही अगदी क्षुद्र ठरावा अशी तिची लोभसवाणी छबी. आणि ते सारं काव्य शेवटच्या पायरीवरून कॅमेर्‍यात उतरवताना माझी झालेली तारांबळ.

" काय झालंऽ? निघतोय की नाही माझा फोटो?"  जणू एक वीणाच झंकारली.
" हं झालं. रेडी?"  मी कॅमेर्‍याची कळ दाबली फक्ककन्‌ फ्लॅश उडाला, आणि दुसर्‍याच क्षणी,
" आई गं! "  एक किंकाळी उठली आणि तिचा तोल गेला. प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसा मी तिला सावरायला झेपावलो. पण त्या आधीच ती सावरली होती.
"  काय झालं? केवढ्याने किंचाळलीस. काय झालं इतकं घाबरायला."
" किंचाळू नको तर काय करू! केवढा मोठा प्रकाश! डोळे दिपून गेले अगदी. आम्हाला तर बाई भीती वाटली अगदी. वाटलं एखादा ताराच कोसळतोय की काय अंगावर."
तिचे ते निरागस विभ्रम पाहून मला हसायला आलं.
" आमचा इकडे जीव जातोय आणि तुम्हाला मात्र हसायला येतंय. जातोच आम्ही कशा ते. बसा तुम्ही हसत."
माझं हसू आवरून होऊन मी तिला काही म्हणेतो ती वार्‍याच्या झुळकीसारखी पसार झाली.

                ती गेली त्या दिशेकडे काळ्यामिट्ट अंधारात पाहत राहिलो ते कसल्याशा आवाजाने. कदाचित एखादी पाकोळी डोक्यावरून फडफडत गेली असावी.भानावर आलो तसा आपसूक काळे वकिलांच्या घराकडे चालू लागलो. काळे वकील. माझ्या बाबांचे जुने मित्र. त्यांनीच मला या गावाकडे बोलावून घेतले होते. गाव कसला! एकही इमारत सरळ आणि धड उभी नाही. भले मोठे मातीच्या भिंतींनी बांधलेली घरं, वाडे. बहुदा सगळेच्या सगळे पडझड झालेले. जे जरा सुस्थितीत असावे असे दिसत होते, ते जुनेच डागडुजी केलेले नाही तर नव्यानेच बांधलेले. कधी काळी या गावात सुबत्ता नांदत होती या वदंतेवर जराही विश्वास बसणार नाही इतकी गावाची रया गेलेली. इंग्रज मायदेशी रवाना झाले त्याच्या नऊ दहा वर्षं आधी गावात जीवघेणा दुष्काळ शिरला आणि पुढेही वीस बावीस वर्षं मधून अधून थैमान घालीतच राहिला. त्याने कर्ती सवर्ती माणसं पोटापाण्यासाठी परागंदा झाली ती झालीच. जे जिथे गेले, तिथेच वसले. पुन्हा गावाकडे अभावानेच फिरकले. मी देखील अशातल्याच एकाचा वारस होतो. इतकाच काय तो माझा या गावाशी संबंध.
                पण या संबंधालाही एक नाव होते. पेशकारांचा वाडा. पेशकार माझे आडनाव. पूर्ण नाव अविनाश जनार्दन पेशकार. जनार्दन विश्वास पेशकारांचा आणि पेशकार कुटुंबाचा एकुलता एक विद्यमान वारस. या गावात आमच्या वारसा हक्काचा एक जुनाट, बराचसा भग्नावशेष उरलेला वाडा. माझ्या वडिलांनाही  त्यांच्या लहानपणी पाहिलेला. इतका जुना. वाड्याच्या एका बाजूला बर्‍यापैकी डागडुजी करून नानासाहेब काळे वकील राहत होते. माझ्या वडिलांचे ते मित्र आणि विश्वस्तही. वाड्यात दोन तीन भाडेकरू होते. पण त्यांच्या सगळ्याच्या वर्षाच्या भाड्याएवढ्या रकमेत या गावाकडे येण्याचे प्रवास भाडेही सुटत नसे. त्यामुळे भाडेवसूली, नगरपालिकेचे नैमित्तिक कर भरणे, आणि अशी बाकी सारी व्यवस्था वकील साहेबच बघत. तेही आता गाव सोडून त्यांच्या मुलाकडे जाऊ इच्छित होते. तेव्हा हा वाडा येईल त्या किमतीला विकून टाकावा हा त्यांचा प्रस्ताव होता. वाडा घ्यायला तालुक्यातील एक वखारवाला तयार झाला होता. आणि त्या साठी आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी मी या गावात आलेलो होतो. एखाद दोन दिवसात हे काम आटोपेल असे वाटले होते पण येऊन आठ दिवस उलटून गेले तरी फारशी प्रगती झालेली नव्हती.

               सुरुवातीला गाव बघण्यात, गावाबाहेरील महादेवाचे पडके हेमाडपंथी मंदिर, चार दोन शेते बघण्यात वेळ गेला. पण पुढे वेळ जाई ना. वाड्याबद्दलचे कुतूहल मात्र स्वस्थ बसू देत नव्हते. मी त्या भल्या मोठ्या वाड्यातील अवशेषातून डोकावू लागलो. असाच एकदा वाड्यामागील भागाकडे गेलो तर एक बर्‍यापैकी सुस्थितीतील एक विहिरी दिसली. तिला बारव म्हणतात हेही असेच कोणीतरी सांगितलेले. बारवेच्या पायर्‍या उतरून पाण्यात पाय सोडून शेवटच्या पायरीवर बसलो. बरेचसे अंधारून आलेले होते. पण त्या थंड पाण्याचा स्पर्श इतका सुखावणारा होता की वेळेचे भान न गळाले असते तरच नवल. [float=font:brinda;place:top;background:eeeeff;color:52507F;]या गूढ रम्य वातावरणात तिची माझी पहिली भेट होईल असं स्वप्नंही मला कधी पडलं नसतं. पण पुढे जे घडत गेलं ते स्वप्नाहूनही अद्भुत होतं.[/float]

क्रमशः