ह्यासोबत
" काय हो! जीव द्यायचा विचार चाललाय की काय."
कुठुनश्या आलेल्या आवाजाने आणि पाठोपाठ भिरभिरत आलेल्या हास्याच्या खळखळाटाने मी दचकलोच. आवाजाच्या रोखाने मी वर पाहिले तर एक तरुण मुलगी दिसली. मी अभावितपणे उठून पायर्या चढू लागणार इतक्यात पुन्हा आवाज आला,
" थांबा तिथेच. मीच खाली येतेय."
तिथे त्या ओसाड स्थळी आणि त्या क्षणी कुणी येईल अशी जराही शक्यता नव्हती आणि त्यामुळे नाही म्हटले तरी मी काहीसा भांबावलो होतो. ती मुलगी कधी समोर येऊन उभी राहिली हे समजलंच नाही. पुन्हा एक लोभसवाणा हास्याचा खळखळाट आणि,
" बाई गं! किती घाबरलाहात हो तुम्ही. कोण आहात तुम्ही? आणि इथं काय करताय आता, यावेळी."
" मी ... मी.. काही नाही. इथं आलो होतो... सहजच... काही काम होतं... काळे वकिलांकडे आलोय."
" अच्छाऽऽ! तरीऽच!!"
" तरीच...? तरीच काय ?"
" तरीच म्हणजे, बाहेर गावचे दिसताहात. एरवी गावातला कुणी जीव गेला तरी इकडे या ठिकाणी फिरकायचं धाडस करणार नाही."
" का? हे अगदी ओसाड आहे म्हणून? पण मला तर ही जागा फार आवडली. किती शांत आणि छान वाटतंय नाही इथं "
" खरंच तुम्हाला आवडली ही जागा? द्या टाळी! माझीही ही खास जागा आहे."
" म्हणजे तू...आय् मीन...तुम्ही नेहमी येता."
" काही हरकत नाही.. तुम्ही मला तू म्हणालात तरी चालेल. आणि माझं म्हणाल तर ही जागा माझा अगदी स्वर्गच आहे म्हणाना."
" छान! म्हणजे, तू इथे रोज येत असशीलच. आणि नसलीस तरी रोज येत जा, प्लीज! काही कामासाठी आलोय मी या गावात.
पण दोनच दिवसात जीव नकोसा व्हावा इतका कंटाळलोय.तू निदान चार शब्द बोलशील तरी."
" खरंय तुमचं. अगदी वेगळा आहे हा गाव. पण तुम्ही इथे कशासाठी आलाय?"
" सांगतो. पण मला आधी सांग, हे मी कोणाला सांगणार आहे?" मी किंचित गमतीने म्हणालो.
" इश्श्य! कोणाला म्हणजे काय? मला....आणखी कोणाला!"
"............." मी काहीच न बोलता मिस्किलपणे तसाच पाहत राहिलो.
" अच्छाऽ ऽ! म्हणजे फिरकी घेताय आमची. आलं लक्षात! सरळ नाव विचारा ना!" तिचे गोबरे गाल फुगवीत आणि टप्पोरे डोळे वटारीत ती म्हणाली.
" आलंय ना लक्षात! मग सांग ना!"
" आम्ही नाई जा! तुम्हीच ओळखा पाहू! काय नाव आहे आमचं!" ही अशी बाजू माझ्यावरच उलटवेल असं वाट नव्हतं. पण मलाही गंमत सुचली.
" ओळखू? अंऽ ऽ ऽ स्वप्ना! स्वप्ना नाव असणार तुझं."
" अय्या, ...काय जादुगार आहात की काय? कसं ओळखलंत नाव तुम्ही माझं? सांगा ना!" हर्षातिरेकाने ती नखशिखान्त थरथरत होती. थक्कच झालो मी. पण तरीही काही तरी सुचलंच.
" त्यात कसलीये जादू. ही जागा, ही बारव, ही मागची कमान, त्या वेली, हे पाणी हे सारं एक स्वप्नच आणि त्यात तू ! ही अशी अचानक अवतरलेली स्वप्नपरी! मग तुझं नाव स्वप्ना!! यापेक्षा आणखी काही वेगळं असू तरी शकेल का."
काहीच न बोलता तिने टाळी देण्यासाठी हात पुढे केला. ती तिची नि:शब्द प्रशंसा मला फार भावली. मग आम्ही दोघे काही वेळ तिथेच पाण्यात पाय सोडून बोलत बसलो. खरं तर बहुतेक सारं मीच बोललो. ती लक्ष देऊन ऐकत होती. मी त्या गावात का आलो हे मी तिला सांगितलं. पण तसाही तेव्हा बराच वेळ झाला होता. अशा लहानशा, शांत गावात सायंकाळची नीरवता लवकरच पसरते. नानासाहेब आणि वहिनी माझी वाट पाहत असतील याची जाणीव झाली. रंगलेल्या गप्पा संपूच नयेत असंच वाटत होतं. पण नाइलाज होता. तो तिलाही समजला आणि म्हणूनच तिने मला निरोप दिला. अर्थात पुन्हा भेटण्याचा शब्द देऊनच.
त्या नंतर ती भेटतच राहिली. न चुकता अगदी रोजच. संध्याकाळी अंधारून यायला लागलं की ती तिथे यायची. अन् मग रात्रीचा पहिला प्रहर सुरू होईतो माझ्याशी बोलत बसायची. मीही भारावल्यासारखा तिची वाट पाहत बसायचो. तिच्या सौंदर्याने मी वेडावलो होतो. तिच्या मधाळ स्वभावाला लोभावलो होतो. मी तिच्या प्रेमात पडलो होतो हे माझं मला जाणवत होतं. तिला तसं ते जाणवून द्यावं असं खूपदा मनांत आलं. पण धीर होत नव्हता. तिच्या मनाचा ठाव लागत नव्हता. तसंही ती स्वत:बद्दल काही बोलत नसे. त्यामुळे तिला तसं काही विचारण्याचा धीर होत नव्हता. ती कायमची माझी व्हावी असं मनोमनी वाटत होतं पण तिच्या बाजूने त्यासाठी हवा असलेला प्रतिसाद दिसत नव्हता.
अशात काही दिवस गेले आणि ज्या कामासाठी मी त्या गावात आलो होतो ते काम संपायला आलं.नानासाहेबांनी ते तडीला लावलं. कागदपत्रांची पूर्तता झाली. तालुक्याला जाऊन महसूल उप-निबंधकासमोर सही-शिक्कामोर्तब करणे इतकेच काय ते उरले. माझ्या जिवाची तगमग सुरू झाली. मी येताना बरोबर कॅमेरा आणला होता. एक आठवण म्हणून वाड्याची, गावातल्या काही ठिकाणाची छायाचित्रे घेतली होती. आज तिचेही एकादे छायाचित्र घ्यावे आणि मनातले काय ते बोलावे असे मनाने घेतले. नेहमीप्रमाणे ती संध्याकाळी आली तेव्हा तर ती खूपच छान दिसत होती. आधी छायाचित्र घ्यावे आणि मगच मनातले सांगावे असे ठरवले. कारण माझा प्रस्ताव, माझे बोलणे तिला आवडेलच, पटेलच याची खात्री वाटत नव्हती. पण माझा विचार तिला पसंत न पडता तर तिने मला छायाचित्र काढू दिले नसते हे मात्र नक्की. तिचा नकार घेऊन जावे लागले तरी तिचे एखादे छायाचित्र तिची आठवण म्हणून मला बरोबर नेता येणार होते. म्हणून मी तसा प्रयत्न केला. तो साधलाही. पण कॅमेर्याच्या फ्लॅशच्या झोताने घाबरून ती जी गेली ते गेलीच. [float=font:brinda;place:top;background:eeeeff;color:52507F;]पुढच्या दोन सायंकाळी मी तिची वाट पाहिली. पण त्या दोन्ही रात्री मी विरह आणि वैफल्याच्या गर्तेत जागून काढल्या.[/float] अखेर परत जाण्याचा दिवस उजाडला. तालुक्याच्या गावापर्यंत नानासाहेब माझ्याबरोबर येणार होते. महसूल कचेरीतील कार्यवाही पूर्ण झाली की ते माघारी गावाकडे परतणार होते आणि मी पुढे पुन्हा माझ्या घराकडे. घरातून निघताना एकदा बारवेकडे जाऊन आलो. काही मधुर क्षणांच्या त्या साक्षीदाराचा जड अंत:करणाने निरोप घेतला. वाड्यातून बाहेर पाडताना नजर सगळीकडे भिरत भिरत होती. कुणाला काय विचारावे ते समजत नव्हते. इतक्या दिवसात मी तिचा ठावठिकाणा का माहिती करून घेतला नाही म्हणून मी स्वत:वरच चिडलो होतो. निघताना काळे काकूंना नमस्कार करावा म्हणून घरात गेलो. त्यांना नमस्कार केल्याशिवाय माझा तिथून पाय निघणार नव्हता. गेले दहा दिवस त्याच माझ्या जेवणा-खाण्याचे पाहत होत्या. मी वाकून नमस्कार केला. काकूंनी दही साखरेचा चमचा पुढे केला. दहीसाखर हाताच्या तळव्यावर घेताना एक विचार मनात आला, काकूंना स्वप्नाबद्दल विचारून पाहावं. त्यांना कदाचित स्वप्नाचा काही ठावठिकाणा माहिती असेलच. पण कसे आणि काय विचारावे ते सुचे ना. मी थोडा घुटमळलेला पाहून त्याच म्हणाल्या,
क्रमशः