स्वप्ना (३)

" का रे? काय झालं? काही हवंय का?

"काकू, एक विचारू? ती स्वप्ना....."

" अगं बाई, तेही कळलं की काय तुला?"  काकूंच्या चेहर्‍यावरचा तजेला मावळला आहे हे माझ्या लक्षात आलं.

" काय कळलं मला? काय आहे ते..... पण मला तर ती......." पण काकूंचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. कुठे तरी तंद्रीत हरवल्या सारख्या त्या बोलत  होत्या.

                  " फार गुणाची नि लाघवी होती रे ती पोर. खोचे मास्तरांची मुलगी ती. मास्तर बदली होऊन इथं आले तेव्हा जागेसाठी सरळ इथे आले. माणूस अगदी सज्जन आणि सरळ होता. वाड्याच्या मागे बारवेजवळ एक सहा खणाची जागा जरा जरा सुस्थितीत होती. नानांनी किरकोळ डागडुजी करून ती त्यांना वापरायला दिली. इतके दिवस मोकळ्याच पडलेल्या वास्तूत आता निदान सांजवात तरी लागेल म्हणून मलाही बरं वाटले. स्वप्ना मास्तरांची थोरली मुलगी. तशी आणखीही एक होती पण अजून ती परकरातही आलेली नव्हती. स्वप्नाला कुणी स्वप्ना म्हणत नसे. मास्तर आणि कावेरी वहिनी, तिची आई, तिला तायडी म्हणत. आणि मग सगळ्यांसाठी ती तायडीच झाली. तायडी नक्षत्रासारखी देखणी होती. मॅट्रिक झाली होती. तेव्हा मुलींना फार शिकवीत नसत. एखादं वर्ष जाऊ देत, छानसा नवरा पाहून तायडीचं लग्न करून देऊ, असं मास्तर म्हणत. तसा एक योग
आलाही. पण तो काळयोग ठरला. तेव्हा गावांत वीज खूप लांबून यायची. घरातले दिवे तर अगदी मिण मिण पेटायचे. पुडे मग गावासाठी स्वतंत्र सब्‌स्टेशन तयार करण्याचं काम बोर्डानं काढलं. त्यासाठी काही माणसं जिल्ह्याच्या सर्कलमधून गावात आली. त्यात तो होता.  माजगांवकर त्याचं नाव. नानांनी पुढच्या चौकालगतची एक खोली त्याला भाड्याने दिली. सडाफटिंग माणूस. आला तसा गेला. पण गेला तो इस्कोट करून गेला. इथे आला तसा त्याची न्‌ तायडीचे ओळख झाली आणि ती जवळिकीढे गेलेत कधी बदलली हे तिचे तिलाही समजले नाही. रोज तो कामावरून आला की एक तर त्याच्या खोलीत नाही तर बारवेच्या खाली पायर्‍यांवर तासन्‌ तास बोलत बसत. तसा त्याने तिला एक दोनदा बाहेर फिरायला नेण्याचाही प्रयत्न केला होता. पण तायडी मास्तरांच्या धाकाने तयार झाली नाही. तायडी त्याच्यात पुरती अडकली होती. अगदी बावरी राधा झाली होती. कावेरी वहिनींनादेखील एम मन वाटायचं, मुलगा चांगला धडधाकट आहे, शिकला सवरलेला आहे, नोकरीही चांगली, बोर्डाची, म्हणजे सरकारी आहे. तायडीला पटला असेल आणि मास्तर परवानगी देतील तर... काय हरकत आहे?....! पण ती वेळ आलीच नाही. एक दिवस तो अचानक नाहीसा झाला. आम्ही सगळेच चाट पडलो. तायडीचे अवस्था तर वणव्यात हरिण सापडावा तशी झाली होती. तिची रया मला बघवे ना. मी नानांना बोर्डाच्या हपीसात चौकशी करा म्हणाले. पण तिथे तर डोंगरच कोसळला अंगावर. खरा कहर तर पुढेच झाला. खोचे मास्तरांच्या साजुक घराला कुणा काळ्याची दृष्टच लागली जणू. रोज मास्तरांची आरडा ओरड आणि स्वप्नाच्या दबक्या आवाजातले किंचाळणे. आळीतही कुजबूज सुरू झाली. घडू नये ते घडले होते. तो मेला तायडीला मास्तरांनी गांव दोडण्याचा निर्णय घेतला. आम्हालाही सामानाची बांधाबांध करून घराची चावे द्यायला इकडे आले तेव्हाच ते जाताहेत हे कळलं. बिचारे कुठे गेले पुन्हा त्यांचं काही कानी पडलं नाही.त्या हळव्या पोरीने हा आघात कसा झेलला असेल ते एक देवालाच ठाऊक. पुढे कधीतरी मास्तर गावात येऊन गेले असं उडत उडत समजलं. पण मास्तर इकडे काही आले नाहीत. खरं तर यायला हवं त्यांनी.  जाऊ देत त्याचं काही वाटलं नाही. पण  स्वप्नाही एकदोनदा वाड्याच्या मागे बारवेकडे दिसली होती म्हणे."

काकूंच्या शेवटच्या वाक्याने कानात प्राण एकवटले. माझ्या हाताने नकळतच जिथे कॅमेरा ठेवला होता ती जागा चाचपली. ’मी काढीन शोधून तिला..मी काढीन शोधून माझ्या सर्वस्वाला, माझ्या स्वप्नाला’ मनात एकच कल्लोळ उसळला.

" काकू, निघतो मी. गाडीची वेळ होत आली."

"अरे, हो रे. खरंच की. मनात एक वाफ दबून राहिली होती. तू विषय काढलास. भानच हरपलं माझं. बरंय! ये तू आता. घरी पोहोचलास की पत्र  टाक." काकूंनी मला निरोप दिला.

                  तालुक्याचे सोपस्कार आटोपून मी परतीच्या प्रवासाला निघालो. प्रवासात मनात स्वप्नाशिवाय दुसरं काही नव्हतंच. लगेचच स्वप्नाचा शोध घ्यावा, मगच घरी जावं, असं अनेकदा मानांत आलं. पण ते शक्य नव्हतं वाड्याचा विक्रीतली एक बर्‍यापैकी मोठी रक्कम रोखीने घेतली होती. ती बॅगेत तळाशी ठेवली होती. ती लगोलग घरी आईच्या स्वाधीन करणे गरजेचे आणि महत्त्वाचे होते.

                        गाडी स्टेशनांत पोहोचली तसा मी आधी तडक माझ्या मित्राच्या फोटो स्टुडिओत गेलो. कमेर्‍यातला रोल त्याच्या स्वाधीन केला आणि त्यावर लगेच प्रक्रिया करून छायाचित्रांच्या प्रतीही लगेचच काढ असे म्हणालो. तिथून घरी आलो. गावाकडे काय काय घडले ते [float=font:brinda;place:top;background:eeeeff;color:52507F;]आईला शक्य तितके सविस्तर, फक्त स्वप्ना वगळून,  सांगितले आणि पुन्हा फोटो स्टुडिओ कडे निघालो. माझी उडालेली धांदल आईच्या नजरेतून सुटली नव्हती.[/float] पण त्या क्षणी ती मला काही विचारणार नव्हती. तसा तिचा स्वभावच होता. माझ्या उडालेल्या धांदलीचे कारण तिने मला नंतरच विचारायला हवे होते. पण ती छायाचित्रे पाहिल्या शिवाय मला काहीही बोलता येणार नव्हते.            

                        मित्राने माझ्या हाती दिलेली छायाचित्रांची चळत मी पुन्हा पुन्हा चाळली. माझ्या चर्येवरची उत्कंठा मावळून एक संभ्रमाची छटा पसरते आहे हे माझ्या मित्राच्या नजरेतून सुटले नाही.

" का रे? काही चुकलं आहे का?"
" नाही, नाही, तसं काही नाही. पण तू सगळे प्रिन्टस्‌ काढलेस ना?"
" भलेऽऽ! म्हणजे काय? अरे प्रिन्टस्‌ मोजून पाहा ना. या वन-ट्वेन्टीच्या रोलमध्ये बाराच प्रिन्टस्‌ निघणार ना?  "
" हो, हो, आहेत, आहेत. बरं चल येतो मी."  मी तिथून काढता पाय घेतला नि घरी आलो. गठ्ठ्यातल्या शेवटाच्या दोन प्रिन्टस्‌ माझ्या  रोजनिशीच्या मागच्या कप्प्यात ठेवून दिल्या.

                                करंबेळकरांकडे फोन झाला. आईने मला तसं आतूनच ओरडून सांगितले. ते छायाचित्र माझ्या हातातच होते. आई कधी मागे येऊन उभी राहिली ते तंद्रीत समजलंच नाही.
" कसला रे फोटो? बघू. "
त्या जुनाट वाड्याच्या मागची बारव. बरवेच्या पायर्‍या जिथे सुरू होतात त्याच्या जरा पुढे वरती ताशीव दगडांची डौलदार कमान. कमानीच्या आतील भिंतीवरून लटकणार्‍या हिरव्याकंच रानवेली. कमानी खाली भिंतीला अलगद टेकून..... .

" आपल्या वाड्याचा का रे फोटो? काय डौलदार कमान आहे नाही? पण,  कमानी खाली कुणी उभं राहिलं असतं ना, तर खूप छान दिसलं असतं."

कमानी खाली कुणीतरी होतं, ते आईला......तिलाच काय कुणालाही दिसणार नव्हतं. पण मला ती आताही दिसत होती. ती तिथेच होती.
स्वप्ना !
                                   

समाप्त.