इचलकरन्जी - काही आठवणी !!!


दोन मनोगतींच्या आग्रहाखातर इचलकरन्जीवर हा लेख...

१९८८-१९९२ मध्ये माझे बाबा इचलकरन्जीमध्ये "डेक्कन को-ऑप स्पिनिंग मिल्स मध्ये होते त्यावेळच्या काही आठवणी.खुपच पुसटसे आठवत आहे पण तरीही मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

महरष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणजे इचलकरन्जी.ता- हातकणंगले जि - कोल्हापूर. पंचगंगेच्या काठावर वसलेले छोटेसे खेडेवजा शहर. जसे टेक्स्टाइलसाठी प्रसिद्ध तसे साखर कारखान्यासाठीही. चिक्कार साखर कारखाने होते जवळपास. ऊसाचे ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर जाताना दिसायचे. आणि त्यामागे लहान लहान मुले,मोठी माणसे धावायची ऊस काढून घ्यायला. साखर कारखान्याच्या बाहेर ऊसाचा रस प्यायला मिळायचा. अजूनही संधी मिळत असेल तर सोडू नका हन.

आम्ही डेक्कनच्या क्वॉर्ट्र्समध्येच राहात होतो.खूप छान कॉलनी होती आमची‌.डेक्कन कंपनीही तिथून जेमतेम ५ मिन. च्या अंतरावर होती. कंपनीचा आवारही खूप मोठा होता. काही स्वतंत्र घरे होती तर काही इमारती होत्या. कॉलनीतले सगळे लोक एकजुटीने राहायचे. सगळे एकमेकांकडे येउन जाऊन असायचे.(पूर्वी किती आपलेपणा असायचा नाही... आताही आहे पण प्रमाण काहिसे कमी झाले आहे हे नक्की). कॉलनीत श्रेषठी काकू म्हणून होत्या ..त्यांच्या घराच्या बाहेर एक अगदी पूरान्या जमान्यातली लोखंडी कॉट होती. त्यावर संध्याकाळी सगळ्या कॉलनीतल्या बायका गप्पा मारत बसायच्या जोपर्यंत प्रत्येकीचे "हे" येईपर्यंत. आम्हा लहान मुलांचा लपंडावाचा खेळ खूप रंगायचा. रंगायचा कसला मला तंगवले होते सगळ्यानी. सारखा डाव माझ्यावरच असायचा. बरेच खेळ खेळलो. दगड- माती, डब्बा एक्स्प्रेस, पकडा पकडी असे आणि खूप खेळ रन्गायचे. बरेच ओळखीचे चेहरे - श्रेषठी काकू ,अंकलीकर काका-काकू , गोखले काका-काकू, मळ्ळीकर काका-काकू , जामदार काका-काकू...

कॉलनीत गणेशोत्सव खूप उत्साहात साजरा व्हायचा. मराठी नाटके यायची १० दिवस. छान चंगळ असायची. मोरुची मावशी नाटक तेवढे छानपैकी आठवते भाजलेल्या शेंगा खात बघितलेले . टांग टिंग टिंगा क  टांग टिंग टिंगा क  टांग टिंग टिंगा .. टुम्म...विजय चव्हाणांच्या भूमिकेला तोड नव्ह्ती.. रम्य ते दिवस...

कॉलनीत एक गेस्ट हाऊसही होते. तिथे त्यावेळचे प्रसिद्द कलाकार यायचे.. माझ्या आठवणीतले म्हणजे सितेची भूमिका करणारी दीपिका... आपला लाडका गोट्या. (जॉय घाणेकर.. आता का येत नाही कुणास ठाऊक... त्याची माई आणि सुमा कुठे आहेत .. नो आयडिया..) आणि मराठी व्हिलेन निळू फुले..एकदम भारदस्त व्यक्तीमत्व होते.. एकदम सिनेमात दिसणार्या भूमिकेपेक्शा सॉलिड वेगळे. 

मी इचलकरन्जीला गंगामाई प्राथमिक शाळेत होते ( त्याआधी एस. डि. ए हायस्कुल मध्ये आळतेला) आणि मग गंगामाई कन्या शाळा सौ. हळदणकर हेडमास्तर होत्या.अजूनही इचलकरन्जीमध्ये माझ्या बाबांचे मामा- मामी राहातात नरसोबाच्या कट्ट्याजवळ गावात. दत्ताच्या आरतीचे मधुर स्वर कानी पडतात. दत्ताची पालखी वाजत गाजत निघते.सगळे कसे चलत चित्रपटासारखे डोळ्यान्समोरून जाते आहे.

गजबजलेला भाग म्हणजे "झेंडा चौक". ह्या चौकात १ रुपयाला भरपूर भेळ मिळायची. तिथेच थोड्या अंतरावर "वनारसे" डॉक्टरांचा दवाखाना होता. अप्सरा,नटराज दुकानेही होती.जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे.हात दुखणार नाहीत लिहून लिहून. तिथेच कुठेतरी कोपर्यावर गोरे बंधू भडंग मिळत होते.

जर कुणी इचलकरन्जीचे असेल तर आता इचलकरन्जी कशी आहे हे मात्र नक्की सांगा