पुन्हा एकदा नक्षलवाद

१७ जानेवारी २००७

मंडळी,
 
मागे काही दिवसांपूर्वी नक्षलवादावर बऱ्यापैकी चर्चा इथे झाली होती. त्यानंतर भरपूर ठिकाणी नक्षली कारवाया झाल्या - काही तर अंगावर शहारा आणणाऱ्या होत्या. वर्तमानपत्रात आलेल्या सगळ्या बातम्यांची संगतवार नोंद मी जरी ठेवलेली नसली तरी प्रत्येक बातमीच्या वाचनानं आपल्याप्रमाणेच मीही व्यथित होत होतो. आजच्या नागपूर तरूण भारत मध्ये एक सकारात्मक वृत्त वाचलं नि या वृत्ताची सकारात्मकता आणि एका मराठी व्यक्तीचा स्पृहणीय सहभाग या दोन्ही गोष्टींपोटी मनोगतींच्या वाचनासाठी नि पुढील चर्चेसाठी ते इथे उतरवतो आहे.
 
चर्चेत खालील मुद्दे यावेत ही विनंतीः
 
१. नक्षलवादी कारवायांचा खरा आवाका -
२. स्वतःचे अनुभव [असल्यास] -
३. उपाय -
४. सकारात्मक घटना -
५. याशिवाय विषयसंबद्ध असे काहीही.
 
आपला,
कौन्तेय
 
--------------------------------------------------------------------------------------------------
 
नक्षल्यांचा बालेकिल्ला 'मलकानगिरी'त
श्रीनिवास वैद्य
नागपूर, 16 जानेवारी
 
घटना अंगावर शहारे आणणारी आहे. घटना घडून सहा महिने झाले असले तरी, तिची तीव्रता कमी झालेली नाही. माओवादी नक्षलवादी (कम्युनिस्ट) किती निर्दयी असतात, याचे आणखी एक उदाहरण म्हणजे ही घटना आहे. एका नक्षलवादी कमांडरने पोलिस खबऱ्या असल्याचा संशय असलेल्या एका स्थानिक नागरिकाला सर्वांसमक्ष ठार करून त्याचे मांस भक्षण केले आणि परिसरात आपली दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. अशाही स्थितीत तिथल्या नागरिकांना हिंमत देण्याचे काम एक नागपूरकर जिवावर उदार होऊन करीत आहे. ही तमाम मराठी लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. हा जिगरबाज म्हणजे पोलिस अधीक्षक सतीश गजभिये. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी बरीच माहिती उघड केली.
 
ओरिसातील मलकानगिरी जिल्हा माओवादी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजला जातो. जिल्हास्थानापासून सुमारे 45 कि. मी. दूर आणि बालिमेला व बेजिंगवाडा या गावांच्या दरम्यान असलेल्या बंदीगुडा गावातील ही घटना आहे. गेल्या वर्षी 3 ऑगस्ट रोजी नक्षलवादी पाप्युलर दलम्चा कमांडर भगत याने या गावचा मुखिया मुकुंद मधीला सर्वांदेखत उचलून नेले. मुकुंद हा पोलिसांचा खबऱ्या होता असा नक्षलवाद्यांचा संशय होता. नक्षलवाद्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला पुन्हा गावात आणले आणि अत्यंत निर्घृण पध्दतीने ठार करण्यात आले. सर्व गावकऱ्यांसमोर कमांडर भगत याने त्याचे मांस खाल्ले. पोलिस खबऱ्याची काय गत होऊ शकते, हे त्याला गावकऱ्यांना दाखवून द्यायचे होते. नक्षलवाद्यांची तिथे इतकी दहशत बसली की, मुकुंदचे कुटुंबीय बरेच दिवस पोलिसांना सांगत होते की, तो नातलगांच्या गावी गेला आहे म्हणून.
 
नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर काही लोकांनी सांगितले की, कमांडर भगतने ही राक्षसी कृत्य सीपीआय (माओवादी) या संघटनेचा सरचिटणीस गणपती याच्या आदेशाने केले. माओवाद्यांचा संशय होता की मुकुंद पोलिस खबऱ्या आहे आणि त्याच्यामुळेच श्रीरामलु श्रीनिवास या कट्टर माओवाद्याला पोलिस अटक करू शकले. त्याचा हा बदला होता.
 
अशा या जिल्हयाचे पोलिस अधीक्षक आहेत सतीश गजभिजे. गजभिये मूळ नागपूरचे. नागपूरचा हा निधडया छातीचा पोलिस अधिकारी नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ठरत आहे. गजभियेंना तर स्थानिक लोक 'डेअर डेव्हिल एसपी' म्हणूनच ओळखतात. बुंदीगुडा गावात घडलेली ही 'किळसवाणी' घटना पोलिस अधीक्षक गजभिये यांच्यासाठी आव्हान होती. त्यांनी जिवाची पर्वा न करता नक्षलवाद्यांच्या दहशतीने मूक बनलेल्या या गावातील लोकांना हिंमत देण्याचे ठरविले.
 
12 जानेवारी 2008 हा दिवस बुंदीगुडा गावकऱ्यांसाठी अतिशय वेगळा होता. येथील गावकऱ्यांच्या मनातील दहशत दूर व्हावी म्हणून गजभिये यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. येथील लोकांमध्ये त्यांनी आत्मविश्वास जागविला. त्यांच्यातील हिंमतीला साद घातली आणि त्याचे फळ म्हणून 12 तारखेला पोलिसांनी आयोजित केलेल्या 'कम्युनिटी पोलिसिंग प्रोग्रॅम'ला 1500 गावकऱ्यांनी हजेरी लावली. नुसत्या संशयावरून मुडदा पाडणाऱ्या नक्षलवाद्यांच्या दहशतीला भीक न घातला हे गावकरी तिथे जमले होते, यावरून त्यांचा गजभिये व पोलिस खात्यावर किती विश्वास होता, हेच दिसून येते. या लोकांमध्ये महिला आणि मुले देखील होती. तिथे आयोजित विविध खेळांच्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वांनी उत्साहाने भाग घेतला. एक आरोग्य शिबिर देखील आयोजित केले होते. या आधी देखील पोलिसांनी सलिमी व बोंडा गावात असे कार्यक्रम घेऊन नागरिकांच्या हृदयात स्थान मिळविले होते. बुंदीगुडा येथील कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी संजीव अरोरा देखील सहभागी झाले होते. सर्व गावकऱ्यांना सुग्रास जेवण देण्यात आले.
 
एका गावकऱ्याची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती. तो म्हणाला, नक्षलवाद्यांविरुध्द लढा देणाऱ्या साध्याभोळया वनवासींसाठी हा क्षण उत्सवाचा आहे. एकाने सांगितले की, आधीचे नक्षलवादी काही प्रमाणात तरी चांगले होते. त्यांच्यापुढे काहीतरी ध्येय होतं आणि आमच्या समस्यांसाठी लढत होते. आता मात्र हे नक्षलवादी लुटारू आणि खुनी झाले आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुकुंद मधीचे कुटुंबीय देखील सहभागी होते.
 
या कार्यक्रमाची खूप जाहिरात करून देखील सुरुवातीला कार्यक्रमात सहभागी होण्यास येथील नागरिक कचरत होते. पण नंतर मात्र हळूहळू लोक जमा होत गेले. राज्य सरकारला मदत करण्यास तयार झालेल्या गावातील सर्वात ज्येष्ठ नागरिकाला 'भूमिपुत्र' असा किताब देखील प्रदान करण्यात आला.
 
पोलिस अधीक्षक गजभिये यांच्याशी दूरध्वनीने संपर्क साधला असता, ते मात्र आपण खूप काही अपूर्व काम केले आहे, असे अजीबात जाणवू न देता अतिशय साधेपणाने बोलत होते. या अशा घटनांमुळे नक्षलवाद विरोधी अभियानाच्या मनोधैर्यावर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास मात्र त्यांनी व्यक्त केला.
 
या परिसरात पोलिस आणि अधिकारी जाण्यासही धजावत नाहीत. अशा स्थितीत सतीश गजभिये यांनी हा कार्यक्रम आयोजित करून वातावरण बदलत असल्याची जाणीव सर्वांना करून दिली. त्याबद्दल या भागात गजभिये यांचे कौतुक होत आहे. पोलिसांबद्दल आस्था आणि विश्वास जितका वाढत जाईल, तितका नक्षलवाद्यांचा उपद्रव कमी होत जाईल, असे गजभिये यांचे सूत्र आहे आणि त्यासाठी ते तळहातावर प्राण घेऊन कार्यरत आहेत. एक नागपूरकर ओरिसातील सुदूर वनवासी भागात आपल्या कामाचा ठसा उमटवीत आहेत, ही आपल्या सर्वांना निश्चितच अभिमानाची बाब आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------