'सेझ' समस्येवर आधारित मराठी चित्रपट : 'घात-प्रतिघात'

कालच्या ईसकाळात ही माहिती वाचायला मिळाली. अलीकडेच उद्भवलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रासाठीच्या भूसंपादनावरून निर्माण झालेल्या अर्थ-सामाजिक समस्येवर आधारित 'घात-प्रतिघात' हा मराठी चित्रपट येत आहे. त्याच्याविषयी माहिती इतरांना व्हावी, माहितीची आणि विचारांची देवघेव व्हावी ह्या उद्देशाने ती माहितीवजा बातमी येथे उतरवून ठेवीत आहेः

ईसकाळातली मूळ बातमी : 'घात-प्रतिघात' चित्रपट लवकरच पुण्यात

पुणे, ता. २५ - विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (एसईझेड) शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रकार गेल्या वर्षभरात देशात खूप मोठ्या प्रमाणावर झाला. त्याविरोधात ठिकठिकाणी शेतकऱ्यांची तीव्र आंदोलनेही झाली. याच विषयावरील 'घात-प्रतिघात' हा मराठी चित्रपट लवकरच पुण्यात प्रदर्शित होणार आहे. ......
'जमीन विकायची नाही, तर कसायची' हा संदेश चित्रपटाद्वारे राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा मानस असल्याची माहिती लेखक-दिग्दर्शक राजन प्रभू यांनी आज 'सकाळ'ला दिली. फलटण आणि आसपासच्या परिसरात चित्रपटाला चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभू म्हणाले, ''पैसा आणि सत्ता यांच्या बळावर शेतकऱ्यांची जमीन हडप करण्याचा निश्‍चय अनेक उद्योजकांनी केला होता. त्याविरोधात नंदीग्राम, खराडी यांसह देशाच्या अनेक भागांत शेतकऱ्यांची तीव्र आंदोलने झाली. याच पार्श्‍वभूमीवर हा चित्रपट निर्माण केला आहे. गावातील एक सुशिक्षित तरुण आणि जमीन बळकावू पाहणारा उद्योजक यांच्यातील संघर्षाची ही कथा आहे.''

लेखन-दिग्दर्शनासह पटकथा लेखन आणि गीतलेखन ही जबाबदारीही प्रभू यांनी सांभाळली आहे. प्रामुख्याने जिल्हा आणि तालुका स्तरावरच चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस असून, त्या भागातील शेतकऱ्यांना भूमिहिन होण्यापासून वाचविण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

'युनिक फिल्म्स'च्या बॅनरअंतर्गत सहा-सात व्यक्तींनी एकत्र येऊन चित्रपटाची निर्मिती केली आहे. मिलिंद गवळी, अरुण नलावडे, विजय चव्हाण, कुलदीप पवार, अलका कुबल आणि दक्षा महेन्द्रू असे कलावंत चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. याच विषयावर हिंदीत 'सेझ' या नावाने चित्रपट करण्याचा विचार असल्याचेही प्रभू यांनी नमूद केले.


ह्या चित्रपटाच्या कथेविषयी तुम्हाला काही माहिती आहे काय?

लेखक दिग्दर्शक पटकथाकार गीतकार राजन प्रभू ह्यांच्या इतर कलाकृतींविषयी तुम्हाला माहिती आहे काय?

'फलटणच्या आसपास चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे' ह्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा? चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या चांगला चालत आहे, की चित्रपट पाहून लोक विचारप्रवृत्त होऊन मूळ सामाजिक समस्येवर तोडगा निघायला काही हातभार लागत आहे?

ह्या चित्रपटातली गाणी तुम्ही ऐकलेली आहेत काय?