याँऽयुक नोऽएल (मेरी ख्रिसमस): एक सुंदर फ़्रेंच चित्रपट

पहिले महायुद्ध आणि त्यावरचे अनेक चित्रपट यामुळे तेव्हा लढल्या गेलेल्या बर्‍याचशा लढाया सगळ्यांना माहीत आहे. काही चित्रपट लढाई व्यतिरिक्त सैनिकांच्या समस्या, त्यांची मानसिकता, संघर्ष आदी विषयांचेही सुंदर चित्रण करतात. "नो मॅन्स लँड" पासून "सेविंग प्रायवेट रायन" असो, एक सैनिक आणि त्याच्या पुढील आव्हाने याचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चित्रण केले गेले आहे. यापैकीच आणखी एक पैलू उजेडात आणणार एक फ्रेंच चित्रपट हल्लीच पाहिला. २००६ मध्ये प्रसिद्ध झालेला "याँऽयुक नोऽएल".(Joyeux Noel) किंवा इंग्रजी मध्ये "मेरी ख्रिसमस". युद्धावरील अनेक चित्रपटांच्या पैकी एक असला तरी आपले असे वेगळे पण जपणारा.. नव्हे .. त्या पंक्तीत खचितच उठून दिसणारा हा चित्रपट!

१९१४. पहिले महायुद्ध सुरू झाले होते.  जर्मन सैन्य फ्रांसमधे घुसू लागले. फ्रांस मधील अश्याच एका रणभूमीवर अव्याहत युद्ध चालू होते. दिवस होते डिसेंबरचे. सर्वत्र बर्फ साचला होता. सगळे सैनिक प्राणपणाने झुंज देत होते. प्रत्येकाच्या मनात आपल्या घरची आठवण होतीच पण त्याबद्दल विचार करायला उसंत मात्र नव्हती. युद्ध होता होता तीन तुकड्या समोरा समोर येऊन ठाकतात. एका बाजूला फ्रेंच आणि स्कॉटिश तुकड्या तर दुसर्‍या बाजूला जर्मन्स. तीनही तुकड्या अतिशय थकलेल्या असतात. त्यात जवळ येत असतो ख्रिसमस!!

तसंही मानवी जीवनात सणाचं आणि कुटंबियांचं-मित्रांचं-आप्तेष्टांचं अतूट नातं आहे. मग ती दिवाळी असो वा ख्रिसमस! आपली हि ख्रिसमस इव्ह अशी बराकीत जाणार या विचाराने तीनही तुकड्या थोड्याशा दु:खी असतात. घरच्यांना पाठवलेली पत्रेही फोडून वाचली जात असल्याने ती हि मनापासून लिहिण्याची सोय नसते. त्यात या तुकड्यांमधील बरेच सैनिक हे काही मुळाचे सैनिक नसतात, तर युद्धाने त्यांना सैनिक बनवलेले असते. काही न्हावी असतात, तर काही शिक्षक, काही टॅक्सी ड्रायव्हर असतात तर काही गायक! या युद्धाने मात्र या सार्‍यांसाठी एकच पर्याय ठेवला असतो .. युद्ध!!!

२४ डिसेंबर १९१४ ची रात्र येते. तीनही तुकड्यांच्या बंकर्समध्ये युद्ध करण्याची इच्छा कोणाचीच नसते. त्यामुळे सगळे "होश्शियार!!" असले तरी गोळ्या बंद असतात. ब्रिटिश कँपात एक प्रिस्ट रात्रीच्या मासची तयारी करत असतो, तर जर्मन बराक ख्रिसमस ट्रीने सजवलेली असते. फ्रेंच बराकीतही "जाम" व्यवस्था असते. जसजशी रात्र होते तसतसे जाम छलकू लागतात फ्रेंच सैनिकांना कंठ फुटतो. ते स्थळाचं भान विसरून आनंदगीत गाऊ लागतात. त्यांना स्कॉटिश बॅगपायपर्स साथ देऊ लागतात. समोर जर्मन सावध असले तरी त्यांना हे आनंदाचे चित्कार ऐकू येत असतात.

जर्मन सैनिकांमध्ये एक असतो प्रसिद्ध गायिकेचा प्रियकर आणि स्वतः उत्तम गाणारा असा सैनिक! ती गायिका आपलं राजकीय वजन वापरून एक रात्र त्याच्या सोबत काढायला आली असते. आणि त्यांना गायला जागा करून द्यावी म्हणून बराकीतले ट्री जर्मन सैनिक कुंपणावर ठेवतात. आणि समोरच्या तुकड्या ही पॉसिटिव्ह खूण समजतात. त्या गायकाचा आवाज तीनही तुकड्यांना मंत्रमुग्ध करून सोडतो. जर्मन गाण्याला स्कॉटिश बॅगपायपर साथ करू लागतात आणि काही क्षणातच "नेत्यांनी" रचलेले शत्रुत्व नाहीसे होते. तीनही तुकड्यांचे सैनिक एकत्र जमतात. एकच जल्लोष होतो... "मेरी ख्रिसमस!!!... Joyeux Noel!!!!"..

 

हे सैनिक त्या रात्री  आपली सुख दु:ख मनसोक्त्त शेअर करतात. ती ख्रिसमसची रात्र तीनही देशांचे सैनिक कोणत्याही करारा शिवाय एका विश्वासाच्या एकत्र धाग्यात गुंफून साजरा करतात. अजून एक मला आवडलं ते म्हणजे या चित्रपटातील संवाद तीनही भाषेत आहेत. त्यामुळे चित्रीकरणात विलक्षण सचोटी आली आहे. मला भावला तो या चित्रपटाचा सहजपणा! ज्या परिस्थितीत हा प्रसंग घडतो तो इतक्या प्रभावीपणे चितारला आहे की बस्स!!
"तुझ्या बायकोला लिहिलेलं पत्रं माझ्याकडे दे मी ते पोहचवीन.. कारण तुझं गाव आमच्या ताब्यात आहे" असं जर्मन सैनिकाने सांगावं आणि फ्रेंच सैनिकाने "आमच्या पोस्ट खात्यावर विश्वास नसल्याने पाठवलं नव्हतं" असं म्हणून शत्रू सैनिकाला मात्र ते पत्र विश्वासाने द्यावं हेच कुठेतरी स्पर्शून जातं
"युद्धखोर फ्रेंच नेत्यांपेक्षा मला ते समोरचे साधे जर्मन्स भावले.. माझ्यासारखेच वाटले" असं जेव्हा फ्रेंच सैनिक म्हणतो तेव्हा ते थेट भिडतं नी डोळ्यांतून पाणी कधी येतं कळत नाही.

असो. पुढे त्या सैनिकांच काय होतं? ते एकमेकांशी लढतात का? का एकमेकांना वाचवतात? त्या प्रीस्टला कसे वागवले जाते? या घटनेचे राजकीय पडसाद कसे उमटतात हे मात्र इथे सांगत नाही त्यासाठी चित्रपट पाहा :)

हा चित्रपट सत्यघटनेवर आधारीत आहे. या चित्रपटाला बेस्ट फॉरिन फिल्मचं ऑस्कर नॉमिनेशन होतं. शिवाय कान, बाफ्टा, गोल्डन ग्लोब आदी सोहोळ्यांमध्येही मानाचं स्थान होतं. आज पाहिला आणि तुम्हाला याबद्दल सांगितल्या शिवाय राहवलं नाही. जर शक्य असेल तर हा चित्रपट जरूर पाहा!!!

चित्रपट: याँऽयुक नोऽएल
भाषा: फ्रेंच, जर्मन, स्कॉटिश
दिग्दर्शक : ख्रिश्चन कॅरिऑन

चित्रपटाचे ट्रेलर पाहण्यासाठी इथे टिचकी मारा