संख्या संकेत कोश २

श्री. शा. हणमंते यांच्या कोशातले आणखी काही संख्या संकेत--

द्वादश देवासुर संग्राम--प्राचीन काळी देव आणि असुर यांच्यात झालेले संग्राम द्वादश संग्राम म्हणून पुराणात वर्णिले आहेत. १)नारसिंहसंग्राम --नरसिंह व हिरण्याक्ष २)वामनसंग्राम --वामन व बली ३)वाराहसंग्राम --वराह व हिरण्याक्ष ४)अमृतमंथन --देव व दानव ५)  तारकामयसंग्राम --तारकासुर व कार्तिकेय ६)आडिबक युद्ध--वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यात आडी व बक या पक्षीरुपाने झालेला संग्राम ७)त्रैपुरसंग्राम --मयनिर्मित तीन पुरांचा शिवाकडून विध्वंस ८)अंधकवधसंग्राम ९)ध्वजसंग्राम--विप्रचिती व इंद्र १०)वृत्रघात --वृत्रासुर व इंद्र ११ व १२) हालाहल व कोलाहलसंग्राम --सर्व दैत्यवर्ग व आयुपुत्र रजी. 
बारा नारद--१)मुनिनारद२) ज्ञानीनारद ३) तपीनारद ४) योगीनारद ५)ऋषीनारद          ६)वागीशनारद ७)खेचरनारद ८)कलिनारद ९)देवर्षिनारद १०)भूगामीनारद ११)कालज्ञनारद व १२)मित्रनारद असे बारा नारद नावाचे मुनी प्राचीनकाळी होऊन गेले. 

चौदा रत्ने--देव व दानव यांनी समुद्रमंथन करून १४ वस्तू काढल्या त्या अशा--१) लक्ष्मी  २)कौस्तुभ ३)पारिजातक ४)सुरा ५)धन्वंतरी ६)चंद्र ७)कामधेनू ८)ऐरावत ९)रंभादी अप्सरा १०) उच्चै:श्रवा नामक सप्तमुखी अश्व (हा श्वेतवर्ण व उन्नतकर्ण होता) ११)कालकूट विष   १२) शारङ्ग धनुष्य १३)पांचजन्य शंख व १४)अमृत. 

षोडशोपचार पूजेचे --१)आवाहन २)आसन ३)पाद्य ४)अर्घ्य ५)आचमन ६)स्नान -वस्त्र      ७)यज्ञोपवीत ८)गंध ९)पुष्प १०)धूप ११)दीप १२)नैवेद्य १३)नमस्कार १४)प्रदक्षिणा         १५)मंत्रपुष्प व १६)समर्पण.  
सोळा शृंगार --मज्जन, चीर, हार, तिलक, अंजन, कुंडल, नासामौक्तिक, केशपाशरचना, कंचुकी, नूपुर, सुगंध(अंगराग), कंकण, चरणराग(अलक्तक), मेखलारणन(क्षुद्रघंटिका), तांबुल ,करदर्पण(अंगठ्यात घालावयाचा एक अलंकारविशेष. यावर आरसा बसवला असे. त्यात मुखावलोकन करता येत असे.)
सोळा शृंगार  --हिंदी दोहरा --चार चतुष्पद,चार खगपद, चार फूल, फल चार 
                                राधाजी के बदन पर ये सोलह सिंगार            स्पष्टीकरण--चार चतुष्पद--तुरंगवत् (घोड्यासारखा)घुंघट, कुरंगवत् (हरिणीसारखे)डोळे
                           गजगती व सिंहकटी.     
             चार खगपद--कोकिळेसारखा स्वर, भ्रमराकृती भिवया,       
                           शुकचंचुवत् नासिका, मीनखंजनवत् नेत्रांची चंचलता 
             चार फूल  --चंपकवत् कांती, केतकीवत् सुगंध
                           कमलाकृती नाभी, गुलाबवत् गाल  
              चार फल --कपित्थवत् कुच, दाडीमीबीजवत् दंत   
                           आम्रबीजवत् हनुवटी, प्रवालवत् अधर 

सतरा संख्येचे महत्त्व वाजपेय यज्ञप्रसंगी --सोमयागाचा एक प्रकार म्हणजे वाजपेय यज्ञ. स्तोत्रे सतरा, शस्त्रे सतरा, याग सतरा दिवस चालतो. प्रजापतीसाठी सुरेचे सतरा ग्रह असतात. सतरा पशूंचा बळी दिला जातो. यूप सतरा हात उंच असतो. तो सतरा कपड्यांनी गुंडाळलेला असतो. सतरा सोमग्रह असतात. सतरा वस्तूंची दक्षिणा देतात. घोड्यांनी जुंपलेले सतरा रथ असतात व त्यांच्यात शर्यत लागते. वेदीच्या उत्तरभागी बडवण्यासाठी सतरा नगारे असतात.   

अठरा संख्याविशेष ---अ) १)जाती अठरा, २)पोषाख अठरा, ३)धान्ये अठरा, ४)उपधान्ये अठरा, ५)वनस्पती अठरा. ६)ज्योतिषी अठरा, ७)पुराणे अठरा, ८)महापुराणे अठरा,       ९)उपपुराणे अठरा, १०)अतिपुराणे अठरा, ११)स्मृती अठरा, १२)शिल्पशास्त्रप्रवर्तक अठरा,  १३)गीतोक्त योग अठरा, १४)युगे अठरा, १५)तत्त्वे अठरा, १६)महापुराणकर्ते अठरा      १७)सिद्धी अठरा आणि १८)यज्ञात ऋत्विज अठरा. त्यावरून भारताचे प्राचीन काळी अठरा प्रमुख भाग असावेत असा तर्क आहे.  
आ) अठरा ही संख्या ९गुणिले २ अशी असून त्यातील ९ ही संख्या पूर्ण समजली जाते. पूर्णाचेही सत् व असत् असे दोन प्रकार मानल्यामुळे अठरा या संख्येत सर्व काही येते.
अठरा संख्याविशेष (महाभारतांतर्गत)--१) महाभारताची पर्वे अठरा, २) महाभारतांतर्गत श्रीमद्भगवद्गीतेचे अध्याय अठरा, ३) अज्ञातवास समाप्तीत पांडवांच्या मतानुसार आणि दुर्योधनाच्या मतानुसार तिथींमध्ये अठराच दिवसांचे अंतर होते. ४) युद्ध अठरा दिवस चालले. ५) युद्धात उभय पक्षांचे मिळून अठरा अक्षौहिणी सैन्य होते.  एक अक्षौहिणी म्हणजे २१८७० रथ, २१८७० हत्ती, १०९३५० पायदळ सैनिक व ६५६१० घोडे. एकूण दोन लक्ष अठरा हजार सातशे. प्रत्येक अक्षौहिणीतील घटकांच्या म्हणजे रथ,हत्ती वगैरेंच्या संख्या मांडल्या तर त्यांची बेरीज अठराच येते. अक्षौहिणीच काय एका एका चमूची (पलटण)गंमत अशीच आहे. एक चमू म्हणजे २७ रथांचा औरसचौरस म्हणजेच एका ओळीत २७ रथ अशा २७ ओळी. एकूण रथ ७२९.(७+२+९=१८).६) युद्धानंतर अठरा वर्षांनी व्यासांनी महाभारत लिहिले.  ७) पांडवांकडील प्रमुख वीर अठराच होते. ८) युद्धानंतर अठरा वर्षांनी धृतराष्ट्राचे पतन झाले. ९) युद्धारंभी अठराही दिवस युधिष्ठिराने गांधारीचा 'यतो धर्मस्ततो जयः' असा आशीर्वाद घेतला होता. १०) युद्धारंभी श्रीकृष्ण, अर्जुन, धर्म, भीम, नकुल, सहदेव, काशिराज, शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, सात्यकी, द्रुपद, प्रतिविंध्य, सुतसोम, श्रुतकर्मा, शतानीक, शृतसेन व अभिमन्यू या अठरा वीरांनी शंख फुंकून रणगर्जना केली. ११ ) या वीरांची नावे ज्या श्लोकात आली आहेत ते श्लोकही अठराच आहेत. १२) गीतेचा महान संदेश 'तस्मात् युद्धस्व भारत' हा श्लोकही अठरावाच आहे. १३) राजा जनमेजयाने परीक्षिताच्या मृत्यूचा सूड म्हणून पिपीलिका पर्वतावर अठरा दिवसांनी पूर्णाहुती करावयाचा नरयाग आरंभिला. १४) या यज्ञाला अठरा ऋत्विज होते. पण त्यांच्यावर भगवंतांनी मोहिनी घातल्यामुळे यज्ञकार्य बंद पडले. जनमेजयाने सिंचन केलेल्या जलकणांमुळे ते ब्राह्मण मृत झाले. १५) व्यासांनी ती प्रेते मंडपात आणून अठरा हात कृष्ण वस्त्र मध्ये धरून वैशंपायनाकडून जनमेजयास भारत ऐकवले. प्रत्येक पर्वाबरोबर एक एक हात कृष्ण वस्त्र पांढरे होत गेले. संपूर्ण अठरा पर्वे भारत ऐकल्यावर ते अठरा ब्राह्मण जिवंत झाले.        १६) व्यासांनी प्रथम जे भारत रचले त्याला 'जय' अशी संज्ञा आहे. जय या शब्दाची संख्याशास्त्रातून निघणारी संख्या अठराच आहे. १७) आधुनिक कवी मोरोपंत यानीही अठरा संख्या संकेताचा आपल्या आर्याभारतात कटाक्षाने उपयोग केला आहे. आर्याभारताची पद्य संख्या १७१३६ येते. या संख्येची बेरीजही अठराच येते. १८) मोरोपंतांनी आर्याभारता प्रारंभी प्रत्येक आर्येचे आद्याक्षर विशिष्ट योजून 'श्री पांडव सहायो भगवानरविंदाक्षो जयति' असा जयमंत्र साधला आहे.   
                                                             वैशाली सामंत.