संख्या संकेत कोश १

काही दिवसापूर्वी श्री. शा. हणमंते यांचा संख्या संकेत कोश वाचायला मिळाला. या कोशात शून्यापासून एकशे आठपर्यंत ज्या संख्यांचे संकेत ग्रंथांतून किंवा संभाषणातून उल्लेखले जातात त्यांचा संग्रह केला आहे.पंचप्राण कोणते? सप्तधातू कोणते? नाटकाची सहा अंगे कोणती? छत्तीस यक्षिणी कोणत्या? काळ्या बाजाराचे चाळीस प्रकार कोणते?छप्पन्न भाषा, बाहत्तर रोग, ब्याण्णव मूलतत्त्वे, शहाण्णव क्षत्रियांची कुळे, शंभर कौरव या तऱ्हेची विविध विषयांतील माहिती या कोशात वाचायला मिळते. कोशकर्त्यांनी साडेतीनशेच्यावर विविध विषयांवरील ग्रंथांचे संदर्भ घेऊन पाच हजारांच्यावर संकेतांची माहिती एकत्रित केली आहे. वेद, उपनिषदे, धर्मशास्त्र, भक्तिशास्त्र, पुराणे, योगशास्त्र, वैद्यकशास्त्र, विविध कोश अशा असंख्य ग्रंथांचा अभ्यास करून हा कोश बनवला आहे. विषयांच्या वैविध्यामुळे हा कोश केवळ रोचकच नाही तर बहुश्रुतता वाढवणाराही आहे. यातील मला आवडलेले काही संकेत इथे देत आहे. 
 शून्यकर्ण/शून्यचरण--कर्ण/चरणविहीन (साप व तत्सम ) प्राणी 
 शून्यमस्तक--ज्याचे तीन किंवा चारी पाय पांढऱ्या रंगाचे असून डोक्यावर वा  कानाजवळ   भोवरा वगैरे कोणतेही चिन्ह नसते असा घोडा 
शून्यवेला--मध्यान्ह, मध्यरात्र, संध्याकाळ. या वेळी केलेली कृत्ये निष्फळ ठरतात असे मानतात.

एक तिथी--सूर्योदयापासून कर्मकाल प्राप्त असलेली अखंड वा पूर्ण तिथी

दोन आद्य चोर-- (वेदकालीन) शंखासुर -- याने वेद चोरले होते. दुसरा कफल्ल किंवा कफल्लक. याला ब्रम्हदेवाने वर दिला होता की जो याचे स्मरण करेल त्याला चोरापासून भय नाही. चोरी होऊ नये म्हणून 'आस्तिक आस्तिक काळभैरव कफल्लक' असे याचे स्मरण केले जाते.  
दोन आद्य पुरोहित-- बृहस्पती व शुक्राचार्य
दोन आदर्श दांपत्ये सृष्टीतली--सारस व चक्रवाक
दोन भक्तश्रेष्ठ-- हनुमान व अर्जुन 
दोन आद्य शाहीर --कुश व लव- हे बहुजनमनोद्दीपनार्थ ऋषिसमुदाय, यज्ञमण्डप, राजमार्ग कोठेही रामायण गात. 
दोन खेळ दोन विचारधारांचे सूचक--सोंगट्या -दैववाद
                                     बुद्धिबळ--प्रयत्नवाद 
दोन पुराणकालीन पाकशास्त्रप्रवीण--राजा नळ -- गोड व स्वादिष्ट पदार्थ 
                                     भीम--तिखटमीठाचे पदार्थ. या वरून त्या त्या पाकपदार्थांना नळपाक व भीमपाक अशा संज्ञा मिळाल्या आहेत.
दोन पुरुषोत्तम--मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र, पुराणपुरुषोत्तम श्रीकृष्ण 
दोन पुराणकालीन वार्ताहर--नारद व संजय 
दोन पुराणकालीन प्रतिज्ञा--कचप्रतिज्ञा व भीष्मप्रतिज्ञा 

तीन आद्य आचार्य लेखन(लिपी) कलेचे--ब्रह्मा---डावीकडून उजवीकडे लिहिली जाणारी ब्राम्हीलिपी, खरोष्ठ---उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी खरोष्ठी आणि त्सं-की--वरून खाली लिहिली जाणारी चित्रलिपी. पहिले दोन भारतात झाले व तिसरा चीनमध्ये. ब्रम्हा व खरोष्ठ यांनी आपल्या लिप्या देवलोकापासून प्राप्त केल्या तर त्सं-कीने लिपी पक्षी आदींच्या पदचिह्नावरून बनवली. 
तीन प्रमुख कारणे तंट्याची--कनक, कांता, कृषी.
तीन पुराणकालीन कपटनीतिनिपुण मामा--कंसमामा, शकुनीमामा व जांगीळमामा(घटोत्कचाचा कारभारी) 
तीन पुराणप्रसिद्ध स्वयंवरे--नल-दमयंती, श्रीकृष्ण-रुक्मिणी व सत्यवान-सावित्री. सीता व द्रौपदीची स्वयंवरे नसून समाह्वय  होत कारण स्वयंवरात पण कन्यांच्या वडिलांनी लावले होते, कन्यांनी नव्हे.  त्यांना औपचारीकपणे स्वयंवर म्हटले गेले आहे.
तीन भरत--रामसखा भरत, दुष्यंतपुत्र भरत व जीवनमुक्त जडभरत. हे प्राचीनकाळी आदर्शभूत होऊन गेले. 
त्रिपुटी--एक नसेल तर दुसऱ्या दोहोंची सिद्धी होणार नाही अशा रितीने एकमेकांशी संबद्ध अशा तीन गोष्टींचा समुच्चय.उदा. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान. दृश्य, द्रष्टा, दर्शन. 'अ'कार, 'उ'कार, 'म'कार.  
त्रिवार नमस्कार--कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही अनुषंगांनी केला जाणारा नमस्कार. 

औटवज्र--औट म्हणजे साडेतीन. वज्र, सुदर्शन,पाशुपत व अर्धी भीमाची गदा. 
साडेतीन पीठे--तुळजापूरची भवानी, मातापूरची रेणुका, आंबेजोगाईची योगेश्वरी व अर्धी कोल्हापूरची महालक्ष्मी. काहीजण तुळजापूर, मातापूर(माहूर), कोल्हापूर ही तीन पूर्ण व सप्तशृंगी हे अर्ध पीठ मानतात. 
साडेतीन मात्रा ओमकाराच्या--'अ'कार,'उ'कार,'म'कार या तीन व अर्धमात्रा (ओमकारावरील अर्धचंद्राकृती रेघ व तिच्यावरील बिंदू).त्यापासून पुढे बावन्न मात्रा. ('अ'पासून 'ज्ञ'पर्यंत १६ स्वर व ३६ व्यंजने )होतात. काही पुराणात ओमकाराच्या चार मात्रा मानलेल्या आहेत.  
साडेतीन मुहूर्त--बलिप्रतिपदा, वर्षप्रतिपदा, दसरा हे तीन पूर्ण व अक्षय तृतीया किंवा नागपंचमी अर्धा.
साडेतीन वाद्ये-- वीणा, पखवाज, बासरी व अर्धी मंजिरी. 
साडेतीन शहाणे (पेशवाईतले)--सखाराम बापू बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणीस हे अर्धे शहाणे.  

चतुर्विध अन्न--१) भक्ष्य-- भाकरी, पोळी सारखे चर्वण करून खाण्याचे पदार्थ २)लेह्य--पंचामृत, रायत्यासारखे चाटून खाण्याचे पदार्थ ३)चोष्य--ऊसासारखे चोखून खाण्याचे पदार्थ ४)पेय--दूध,ताक या सारखे पिण्याचे पदार्थ. किंवा १) शुष्क--रसहीन-वडे,पापड इ. २)स्निग्ध--घृतप्रधान-लाडू, शिरा इ. ३)पक्व--उकडलेले, भाजलेले-मोदक, पुरणपोळी इ. ४)विदग्ध--फुलवलेले-फुटाणे, लाह्या, चुरमुरे इ.
चार गोष्टींचा अतिरेक आहारात व्यर्ज --  अती मिरची खाई त्यास मूळव्याधी 
                                         अती गोड खाई त्यास मधुमेह बाधी
                                         अती आंबट,खोकला खास येतो
                                         शिळे खाई तो आळशी, सुस्त होतो. 

पाच--एक शुभसूचक अंक. सर्व धार्मिक ,मांगलिक कार्यात कित्येक गोष्टी पाच या संख्येने करावयाच्या असतात. जसे पुण्याहवाचनात 'पंचपल्लव'म्हणजे शास्त्रात सांगितलेली पाच विशिष्ट वृक्षांची पाने लागतात. शुद्धीसाठी 'पंचगव्य' प्राशन करावयाचे असते. स्त्रीला संतती व्हावी म्हणून तिची ओटी पाच प्रकारच्या फळांनी भरतात. ही ओटी पाच सुवासिनी भरतात.
श्रीकृष्णचरित्रातील युगुलपंचक--१)दोन पिता-वसुदेव, नंद २)दोन माता-देवकी, यशोदा ३) दोन भगिनी-सुभद्रा,द्रौपदी ४)दोन गुरु-श्रीदुर्वास, सांदिपनी ५)दोन शिष्य-अर्जुन, उद्धव. 
पंचमी तिथी--वैदिक धर्मात पंचमीला विशेष महत्त्व आहे. अनेक सण व पर्वे या तिथीला आढळतात. आषाढ शु. पंचमीला वीज पंचमी म्हणतात. या दिवशी निदान वीज चमकली तरी पावसाळा चांगला जाईल अशी समजूत आहे. श्रावण शु. पंचमी- नागपंचमी, भाद्रपद शु. पंचमी-ऋषिपंचमी, अश्विन शु. पंचमी-ललितापंचमी, कार्तिक शु. पंचमी-लाभपंचमी, माघ शु. पंचमी-वसंत पंचमी, फाल्गुन शु. पंचमी-रंगपंचमी इ. 

सहा कर्ण--१)दातृत्वात महारथी कर्ण२) कौरवात विकर्ण ३)क्षेत्रात गोकर्ण ४) राक्षसात कुंभकर्ण ५)घोड्यात श्यामकर्ण आणि ६)देहात अंतःकरण. हे सहा कर्ण वाङ्मयात प्रसिद्ध आहेत.
सहा प्रकार हास्याचे--१) स्मित- गालातल्या गालात २)दात काढून ३)विहसित-बोलत बोलत हसणे ४) अवपहसित-नाक फुगवून हसणे ५) अपहसित-डोळ्यात आसवे आणून हसणे ६)अतिहसित-मोठमोठ्याने टाळ्या वाजवून हसणे. 
सहा नकार -- १)मौन २)विलंब ३)भिवया चढवणे ४)अधोवदन ५)दुसरीकडे निघून जाणे   ६)विषयांतर.  
 
सात --पाच या संख्येप्रमाणे सात ही संख्याही शुभ मानली जाते. हिंदू धर्मात सप्तपदीशिवाय विवाह पूर्ण होत नाही. सात हा अंक हनुमान देवतेला विशेष प्रिय आहे. हनुमान पूजा सात शनिवारी सात धान्यांनी करावयाची असते. इस्लाममध्ये सात स्वर्ग, सात पृथ्वी इ. मानतात. सहा दिवसात परमेश्वराने सर्व सृष्टी निर्माण केली व सातव्या दिवशी विश्रांती घेतली म्हणून सात ही संख्या पूर्णत्वाचे प्रतीक आहे असे ख्रिस्तीधर्मात मानले आहे.  
सात पौराणिक चिरंजीव--१)अश्वत्थामा २)बली ३)व्यास ४)हनुमंत ५)बिभीषण ६)कृप ७)परशुराम 
सात पाताळ--१)अतळ-सुमात्रा २)वितळ-बोर्निओ ३)सुतळ-जावा ४)रसातळ-सेलिबस ५)महातळ-ऑस्ट्रेलिया ६)तळातळ-न्यू गिनी ७)पाताळ-न्यूझीलंड 
सात द्वारे उच्चार न करता मनातील उद्देश सांगण्याची -दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या व एक मुख. डोळे मिचकावणे,कानावर हात ठेवणे, नाक वाकडे करणे इ. प्रकारांनी मनातील उद्देश कळवता येतो.
सात प्रकार शब्दसिद्धीचे--१)सामासिक शब्द-- हिरड-बेहडा २)जोडशब्द--गोरागोमटा  ३)विरोधी शब्द--वोखटे-गोमटे ४)द्विरुक्तिवाचक--झाडणे-पुसणे ५)अकारणवाचक--जाणिजे-नेणिजे ६)साधितशब्द--जवळीक ७)नादानुकारी शब्द--डुळकणे. 
सप्त स्वर--१)षड्ज २)रिषभ ३)गंधार ४)मध्यम ५)पंचम ६)धैवत ७)निषाद. हे गायनशास्त्रातले सात स्वर. यांचेच संक्षिप्त पर्याय सा-रे-ग-म-प-ध-नी हे होत. अहोबल नावाचा गीतशास्त्रज्ञ होऊन गेला. त्यानेच श्रुती व स्वर निश्चित केले असे म्हणतात. सांकेतिक अर्थ--सा--सागरातले प्राणी, २)रेतीतील प्राणी, ३)ग-गगनातील प्राणी ४)म-मनुष्यातील प्राणी, ५)प-मनुष्यामध्ये पराक्रमी, ६)ध-धर्मानुकूल, ७)नी-नित्यानित्य विवेक जाणला आहे तो व सा-साक्षात्कारी. हे सप्त स्वर प्राचीन ऋषींनी कित्येक प्राण्यांच्या आवाजावरून संशोधनपूर्वक निश्चित करून त्यांना दिलेली शास्त्रीय नावे -                    सा-मयूर-षड्ज, रे-वृषभ-रिषभ, ग-अज-गंधार, म-क्रौंच-मध्यम, प-कोकिळा-पंचम,      ध- हय-धैवत, आणि नी-गज-निषाद. 

आठ--पाच, सात या संख्येप्रमाणे भारतीय संस्कृतीत आठ या अंकाचेही फार महत्त्व मानले आहे.'स्वस्तिक' हे आठ दिशांचे प्रतीक म्हणून पवित्र मानले आहे.दुर्गापूजेत अष्टमीचे विशेष महत्त्व मानले आहे.भगवान श्रीकृष्ण हा आठवा अवतार, देवकीचे आठवे अपत्य आणि जन्मही अष्टमीचाच.
अष्टांगे नमनाची--मस्तक, छाती, हात, गुडघे, पाय, दृष्टी, वाणी व मन या आठ अंगांनी करावयाच्या नमस्काराला साष्टांग नमस्कार.
आठ वर्ग भाज्यांचे-१)कंदमुळे २)पालेभाज्या ३)फुलभाज्या ४)फळभाज्या ५)शेंगभाज्या ६)शेंगदाणे भाज्या -ज्यांच्या शेंगांतील ताज्या बियांची भाजी करतात. ७)बीजभाज्या-ज्यांच्या वाळलेल्या बीजांची भाजी करतात. ८)मसाले भाज्या-ज्यांचा पाला, मुळे वा फळे दुसऱ्या भाज्यांना स्वाद आणण्यासाठी वापरतात.

नऊ प्रकार स्वाक्षऱ्यांचे व त्यावरून व्यक्तीचे स्वभावगुण--१)वरून चढत जाणारी-बुद्धिमत्तेने पुढे जाणारी, २)सरळ-सुखवस्तू-कमीतकमी महत्त्वाकांक्षा ३)उतरती-मेंदूविकृत,आत्मविश्वास कमी ४)अक्षर डावीकडे कलत असलेली-वर्चस्व गाजवणारी-कल्पक ५)अक्षर सरळ-धोपटमार्गी-भोळी ६)उजवीकडे कलते अक्षर-आज्ञाधारकाचे ७)वळणदार -विनोदी ८)बारीक अक्षराची -कंजूष आणि अगदी मोठ्या अक्षराची-महत्त्वाकांक्षी.
नवरत्ने-सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या सभेतील--१)धन्वंतरी(वैद्य)२)क्षपणक(फलज्योतिषी) ३)अमरसिंह(कोशकर) ४)शंकू(भूमापनशास्त्र) ५)वेतालभट्ट(मंत्रशास्त्रज्ञ) ६) घटकर्पर(शिल्पशास्त्र) ७)कालिदास (कवी) ८)वराहमिहिर(ज्योतिषी) व ९)वररुची(वैयाकरणी) 
नवरत्ने अकबरकालीन--१)अबुल फजल, २)फैजी ३)राजा तोरडमल ४)तानसेन  ५) स्वत: अकबर ६)बिरबल ७)पन्हा भांड ८)गंगाभट व ९)जगन्नाथ पंडित. 
   असेच काही संकेत पुढल्या भागात.   
                                              वैशाली सामंत.