ह्यासोबत
पंतांच्या मुखातून शब्दाऐवजी निखारे बाहेर पडले आणि मुराच्या अंत:करणात धैर्याचा महासागर लाटा उधळीत उठला. त्याने चटकन वाकून पंतांपुढे हात टेकला आणि उठून गंभीरपणे तो म्हणाला, "आबा, मी जातो."
"जा, उकिरड्याचा पांग फिटतो आणि तुम्ही तर माणसे आहात." पंतांनी मुराला निरोप दिला.
काजळी झडताच ज्योत प्रखर व्हावी तद्वतच मुराचे मन उजळले. त्यात आकाशाला गवसणी घालण्याची प्रबलता संचारली. त्याच्या तरुण पायांत हिंमत नाचू लागली. तो बेभान होऊन विद्युत्गतीने वाड्याकडे निघाला. चिखल तुडवावा तसा तो अंधाराला तुडवीत चालत होता.
ओसाड वातावरणाने मुराच्या गावची मोट बांधली होती. आकाश आणि धरणी यांच्यामध्ये असलेली पोकळी अंधाराने भरून काढली होती. घोंगड्याच्या घडीसारख्या काळ्या जमिनी मढ्याप्रमाणे पडल्या होत्या. त्यांच्या पाठीवरून दुष्काळ सरपटत होता. जणू क्रौर्याने सृष्टी तलवारीच्या टोकावर धरली होती आणि उत्पात आरंभला होता, त्या दुष्काळापुढे माणूस पराभूत झाला होता.
उन्मत्त दुष्काळाने पृथ्वीची शोभा नष्ट करण्यासाठी नभांगणातल्या चांदण्यासुद्धा ओरबाडून गिळल्या आहेत आणि आभाळाचे पोट फुटून अंधार खाली गळत आहे असा भास होत होता.
मोकळ्या जागेतील लिंबाखाली लहानमोठी अशी दोनशे माणसे जमून बसली होती. ती मुराची वाट पाहत होती. या निकराच्या समयी मुरा काय सांगतो ते ऐकण्यासाठी ते सर्व उत्सुक झाले होते. तोच मुरा आला. सर्वांनी गंभीर होऊन कान टवकारले. पटकुरे सावरली, नि:श्वास टाकला.
"काय म्हणलंत कुलकर्णी?" बहिरुने सुरवात केली.
"त्यांनी जगाय सांगितलंय." मुरा म्हणाला.
"पन कोरड्या बोलण्यानं जगता येत न्हाय." बळी म्हणला.
"खरं हाय त्ये." मुरा लिंबाच्या मुळीवर बसून म्हणाला. "पन कुळकर्णी आणि आपुन
एकच हाय. मातूर आमी आधी मरणार आनि कुळकर्णी थोड्या उशीराने मरनार एव्हढंच."
"मग आमास्नी धनी कोण?"
"आमीच." मुरा उद्गारला.
"म्हंजी आमी मराय पायजे" किंवडा सावळा ओरडला.
"न्हाय, जगलं पायजे !"
"विठ्ठला, पांडुरंगा, माझी दोन पोरं घडीची सोबती आहेत. त्यांनी कसं जगावं?" कोंडी हात जोडून म्हणाला."
"सार्यांनी जगलं पायजे." मुरा ताडकन उठून म्हणाला. तो घरी जाऊन तलवार घेऊन बाहेर आला.
"पन कसं?"
"केरु, बळी, दौलु, पांडू, सावळा, सादू आनि ज्येला माझ्याबरोबर चालता येत असंल त्येनी एका बाजूवर निघावं."
खवळलेले आग्या मोहोळ घोंगावत उठावे तद्वत दीडशे गडी एका बाजूला निघून उभा राहिला आणि मुरा पुन्हा म्हणाला,
"आमी येईपतुर तुमी मढी पानी पाजून जतन करा. उद्या इथे अन्नाचा ढीग लावतो."
(क्रमश:)