माकडाची जात याची, मूढ कुठला केशवा

आमची प्रेरणा प्रसाद यांची अप्रतिम गझल नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी आणि खोडसाळ यांचे तितकेच अप्रतिम विडंबन नोकरांना खाज सुटली, घर्म फुटला शेटजी

माकडाची जात याची, मूढ कुठला केशवा
जो तुम्हाला वाटला तो हा न इथला केशवा! 

एक कविता चांगली ना सोडली जालावरी
बघ विडंबन पाडण्या बाजार जमला केशवा...

का उभारू पाहतो हे शब्दवैभव , क्लिष्टता?
वेष्टने भारी जरी ही, अर्थ बुडला केशवा...

द्विपदी लाखो कशाला, चार ओळी पाडल्या
वाहवा कंपूत झाली आणि सुटला केशवा!

धन्य आहे या जगी जे वाहवा करती तुझी
होय हो त्यांनीच रे आहे चढवला केशवा!

का जुना हा माल मेल्या नेहमी हाताळतो?
एवढा का कल्पनांचा ओघ अटला केशवा? 

वाचुनी रे क्षुद्र सारी तव विडंबन रोजची
नेत्र थकले, कान किटले, जीव विटला केशवा

वाचकांच्या रोज लाथा अन शिव्या ही रोजच्या
पुस्तके वाटून अपुली आज फसला केशवा

चार लाथा! आठ लाथा !! वाढवा लाथा जरा...
कार्य घरचे आज समजा आणि बुकला केशवा

- केशवसुमार