अनुनादी कविता: सुधीर मोघेंचे रसग्रहण

गेल्या शनिवारच्या लोकसत्ता चतुरंगमधे सुधीर मोघेंचा एक सुंदर लेख आलेला आहे. अनुनाद नावाचा.

ह्या लेखाच्या शेवटाला त्यांनी पंडीत नरेंद्र शर्मांच्या एका गीताचा उल्लेख केलेला आहे.

मधु माँग न मेरे मधुर मीत |
मधु के दिन मेरे गये बीत ||

आणि त्याची तुलना त्यांनी भा. रा. तांब्यांच्या

मधु मागसी माझ्या सख्या परी|
मधुघटची रिकामे पडती घरी ||

ह्या कवितेशी केलेली आहे. पंडीतजींच्या रचनेला सुधीर फडकेंनी संगीत देऊन गायलेलेही आहे. मला तर तो तांब्यांच्या कवितेचा अगदी तंतोतंत अनुवाद वाटला. मोघे मात्र त्याला अनुनाद म्हणत होते. मग ते मूळ गाणे कुठे मिळू शकेल का हा ध्यास लागला. आणि काय आश्चर्य गुगलवर ते गाणे अगदी सहज सापडले. संपूर्ण सापडले. पंडीत नरेंद्र शर्मांच्या कन्यकेच्या ब्लॉगवर. लावण्या शाह ह्यांच्या ब्लॉगवर.

वाचल्यावर मग वाटले की मोघे म्हणतात ते खरेच आहे.

गीत मौलिकच असणार. मात्र प्रत्येक कवीच्या जीवनात सरतेशेवटी येणारी रिक्तत्वाची भावना मात्र अगदी तंतोतंत भा. रा. तांब्यांच्या मधुघटशी मिळती जुळती आहे. मोघ्यांनी इतरही अनेक विख्यात कवींच्या यासारख्याच भावना व्यक्त करणार्‍या काव्यपंक्तीही दिलेल्या आहेत.

मनोगतावर कविता प्रसृत करणार्‍या अनेक कवींना मोघेंचा मूळ लेख आणि लावण्याचा ब्लॉग दोन्हीही वाचावेसे वाटतील असे वाटल्याने ही माहिती इथे देत आहे.