शिवसेना - भूत, वर्तमान आणि भविष्य भाग १

शिवसेना हा पक्ष म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही 'धर्मनिरपेक्ष' शक्तींना love to hate & hate to love ही सुविधा उपलब्ध करून देणारा एक ठळक पक्ष. भाजप हा 'त्या' पक्षांना अस्पृश्य आहे असे म्हणण्याचा प्रघात जरी असला तरी भाजपबरोबर लपून-छपून प्रेमाचे डाव टाकायला या 'पुरोगामी' पक्षांची ना नसते. महाराष्ट्रातला ७८ सालचा पुलोदचा प्रयोग काय, किंवा दिल्लीतला ८९ सालचा व्ही पी सिंग सरकारचा प्रयोग काय, हे त्याची साक्ष द्यायला तयार आहेत. शिवसेनेचे तसे नाही. कुठलाही 'पुरोगामी', 'धर्मनिरपेक्ष' पक्ष शिवसेनेबरोबर कुठल्याही प्रकारची उघड वा छुपी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

आता ही दोन्ही बिरुदे लावणारा शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यात उघडपणे शिवसेनेबरोबर कसा जातो हे विचारू नका. विचारू नका म्हणजे मला विचारू नका! महाराष्ट्रभर पुरोगामी विचारांची ज्योत लावत हिंडणार्‍या त्यांच्या एन डी पाटलांना विचारा. ते आणि जयंत पाटील एकाच पक्षात आहेत ना हेही विचारा. आणि विचारताच आहात, तर रायगड जिल्हा सोडून शेतकरी कामगार पक्ष कुठे दिसतो हेही विचारून घ्या.

तर, शिवसेनेबरोबर जाण्याची हिंमत (चटके सोसत का होईना) भाजप, आणि "फक्त पुण्यासाठी" अशा गर्जना करीत अजित पवार हेच करू शकतात. राजकारणाची आजची पातळी पाहता कुठलाही, अगदी अरुण गवळीचा 'अखिल भारतीय सेना' हा पक्षदेखील, कुणी अस्पृश्य मानीत नाही. किंबहुना राष्ट्रवादी आणि अ भा सेना यांचे अंतर्गत नाते (भाचा सचिन अहिर राष्ट्रवादीत आणि मामा अरुण गवळी अ भा सेनेचे जन्मदाते) सगळ्यांनाच पक्के ठाऊक आहे. मग शिवसेनेनेच हे स्वतःला इतक्या टोकाच्या भूमिकेत कसे काय नेले? शिवसेनेच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेणे आणि त्या प्रवासाच्या आधारे पुढचे दिसणारे काही आडाखे मांडणे असा या लेखाचा हेतू आहे.

शिवसेनेचा जन्म झाला १९६६ साली. त्या काळी महाराष्ट्रात काय परिस्थिती होती?

राज्य जन्माला येऊन सहा वर्षे झाली होती. ६२ सालच्या चीन युद्धामुळे अनेक वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती वा करण्यात आली होती. मुंबईचे आयुष्य तुलनात्मक दृष्ट्या पाहता तेवढेच धकाधकीचे होते. त्यात मराठी माणसाच्या मनात आपल्याला कायम डावलले जातेय अशी भावना निर्माण करायला इतर भाषिक कसोशीने हातभार लावीत होते. तमिळ ब्राह्मण त्यात आघाडीवर होते. त्यांना पन्नाशीच्या दशकापासूनच द्रमुक चळवळीने तामिळनाडूबाहेर हाकलले होते. 'ब्राह्मण तेवढा ठेचावा' असे त्या काळातील सर्व द्रविडी पक्षांचे मुख्य धोरण होते. कर्नाटकी ब्राह्मण असलेल्या जयललिता राजकारणात यायला बराच वेळ होता.

तर हे 'यंडुगुंडू' आपापले मुंडू सावरत मुंबईत आले आणि मराठी माणसाचा पायखेचूपणाचा गुण अंगी न बाणवता त्यांनी आपापल्या जातभाईंना सपाट्याने मुंबईत आणायला सुरुवात केली. त्यात फाळणीमुळे निर्वासितावस्थेत आलेल्या सिंध्यांची आणि पंजाब्यांची भर पडली. पंजाबी मंडळींना चित्रपटव्यवसायामुळे मुंबई स्वातंत्र्याआधीपासूनच चांगली परिचित होती. सिंधी मंडळींना ज्या वसाहती वसवून दिल्या गेल्या त्यात उल्हासनगर ही मुंबईच्या नजिकची वसाहत त्यांच्यातील उद्योजकतेला चांगलीच आव्हान देणारी ठरली.

मुंबई ही पुणे, नाशिक आणि सुरत या तीन शहरांपासून साधारण सारख्याच अंतरावर आहे. मुंबईत गुजराती लोकसंख्या पहिल्यापासूनच लक्षणीय आहे. हा समाज मूळचाच उद्योगप्रिय आहे आणि मुंबईची भाषा मराठीइतकीच गुजरातीही आहे असा एका मोठ्या जनसमूहाचा विश्वास आहे.

मुंबईतला मराठी टक्का असा चौबाजूंनी घेरला जात होता.

या पार्श्वभूमीवर, मराठी माणूस कुठे होता? आपापल्या कोषात गुरफटलेला होता. 'मुंबई ही महाराष्ट्रात आहे, पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही' असे एक टाळीखाऊ वाक्य वसंतदादा पाटलांच्या (वा यशवंतराव चव्हाणांच्या वा वेळप्रसंगी इतरांच्या) नावावर खपवले जाते. वाक्याचा जनक कोणीही असो, ते वाक्य दुर्दैवाने खरे आहे. वाक्य खरे आहे हे दुर्दैव नाही, तर वाक्य तथाकथित संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वी आणि नंतर असे दोन्ही वेळेला खरे आहे हे दुर्दैव.

ही परिस्थिती अर्थातच मराठी माणसाला डाचत होती. पण त्याला तोंड फोडण्यासाठी काही मार्ग दिसत नव्हता. आचार्य अत्रे हे त्या परिस्थितीला सणसणीत उत्तर देऊ शकत होते असे मानण्याचा प्रघात आहे. पण ते त्यांनी केले नाही हे सत्य आहे. साहित्यसाधना, पत्रकारिता, राजकारण, अतिरेकी मद्यपान, विषयलोलुपता या सर्व गोष्टी एकच माणूस सदासर्वकाळ तेवढ्याच ताकदीने करीत राहील हे निसर्गाच्या कुठल्याच नियमांना धरून नव्हते आणि नाही.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक अग्रणी केशव सीताराम ठाकरे यांचे चिरंजीव बाळ ठाकरे हे तेव्हाना व्यंगचित्रकार म्हणून स्थिरस्थावर होत होते. पत्रकारिता, राजकारण, व्यंगचित्रकला हे सर्व व्यवसाय आहेत. आणि कुठल्याही व्यवसायाप्रमाणेच आपल्या व्यवसायाला कुठे ग्राहक मिळतील हे पाहणे त्यांच्या जीवनक्रमाचा अविभाज्य भाग आहे. ही ग्राहक ओळखण्याची कला बाळ ठाकर्‍यांना अवगत होती. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्याच वर्षी त्यांनी 'मार्मिक' साप्ताहिक सुरू केले. तेव्हा खरे तर अत्र्यांचा 'मराठा' चांगलाच जोरात होता. पण ठाकर्‍यांनी अत्र्यांशीही दोन हात केले. 'वरळीचा डुक्कर' अशी अत्र्यांची संभावना केली. त्यांची बोचरी व्यंगचित्रे काढली. अत्र्यांकडे भाषा होती, पण ठाकर्‍यांकडे रेषा होत्या. रेषांनी भाषेवर मात केली.

मार्मिकच्या मधल्या पानावरची व्यंगचित्रे खरोखरीच 'मार्मिक' असत. त्या चित्रांची लोकांना हळूहळू चटक लागू लागली. आणि आपण एका असंतोषाच्या कोठारावर बसलो आहोत याची ठाकर्‍यांना जाणीव झाली. "वाचा आणि स्वस्थ बसा" या सदरात मुंबईत 'यंडूगुंडू' किती कार्यालयांत किती महत्त्वाच्या जागांवर काम करताहेत याची यादी दिली जाई. मग त्या सदराचे नाव "वाचा आणि पेटून उठा" असे झाले. पण पेटून उठणे पुरेसे नव्हते. त्याला काहीतरी दिशा देणे गरजेचे होते. आणि पेटून उठू शकणार्‍या मुंबईकर मराठी माणसांना ती दिशा देऊ शकणारा एकही पक्ष तेव्हा अस्तित्वात नव्हता.

होते तरी कोण कोण? काँग्रेस हा केवळ केंद्रात सत्ताधारी होता आणि महाराष्ट्रात 'मराठा' जातीला धरून होता म्हणून शिरजोर होता. आणि काँग्रेसमध्ये कितीही अंतर्गत लाथाळ्या असल्या तरी कागदोपत्री तो पक्ष एकच होता. फूट पडली ती ६९ साली. त्या एकत्र काँग्रेस पक्षात मुरारजी देसाई, ढेबर आदि गुजराती मंडळींचे चांगलेच प्राबल्य होते. 'हिमालयाच्या रक्षणासाठी धावून गेलेल्या सह्याद्री'चीही या शेठजींपुढे मात्रा चालत नसे. त्यामुळे मुंबईतल्या मराठी माणसांसाठी त्या पक्षातून कुणी आवाज उठवेल ही शक्यता नगण्य होती. मुळात काँग्रेसने मुंबई ही महाराष्ट्रात आहे हे कधीच मानले नव्हते. महाराष्ट्र प्रदेश आणि मुंबई प्रदेश असे लख्ख दोन वेगळे "प्रदेश" काँग्रेसच्या लेखी अस्तित्वात होते. आजही आहेत.

समाजवादी पक्ष जन्मापासूनच स्वतःच्या मुळावर उठलेला होता. पीएसपी आणि एसएसपीतील भांडणे खरेतर मानसिक वाढ खुरटलेल्या तथाकथित प्रौढांची आपापसातील भांडणे. फार तर कीव करण्याचा विषय. पण महाराष्ट्रात तरी एसेम जोशी, ना ग गोरे, मधू दंडवते, मधू लिमये, हमीद दलवाई, नाथ पै (यात जॉर्ज फर्नांडिसांचे नाव घेतले नाही कारण नंतर भाजपबरोबर गेल्याने ते बाटले) या मंडळींना थोर मानण्याची पद्धत आहे. त्यामुळे ही बालवाडीतली भांडणेही बरेच जण गंभीरपणे घेत. अर्थात 'बरेच' म्हणजे निवडणुकीत जिंकण्याइतके पुरेसे नव्हे. त्यामुळे मधू दंडवत्यांचा सन्माननीय अपवाद सोडला तर समाजवादी पक्ष आणि निवडणुकीतले यश हे कायमच एकमेकांचे हाडवैरी राहिले. आणि एकंदरीतच समाजवादी पक्षाला भोंगळ तत्त्वज्ञानाची झूल पहिल्यापासूनच असल्याने 'भारतात कुणीही कुठेही जाऊन स्थायिक व्हावे, त्यावर निर्बंध नसावेत' हीच 'आंतरभारती' भूमिका त्यांना जास्ती भावणारी होती. अर्थात या भूमिकेला काश्मीरचा अपवाद करायलाही ते पुढे असत.

स्वतंत्र पक्ष हा मुंबईतील धनिक-उद्योजकांच्या आधारे उभा राहिलेला एक पक्ष. पण पक्षाला ना जनाधार, ना वैचारिक अधिष्ठान. मुळात हा जनसामान्यांसाठीचा पक्ष नव्हताच. उच्चशिक्षित आणि आंग्लभाषाप्रवीण असे त्यांचे नेतृत्त्व (मिनू मसानी, पिलू मोदी) सर्वसामान्यांना भावेल, पचेल, रुचेल असे बोलण्याच्या परिस्थितीत कधीच नव्हते. तसाही हा पक्ष तोवर मरणासन्न व्हायच्या मार्गाला लागलेला होता. आणि कितीही धट्टाकट्टा असता, तरी त्या पक्षाने 'मराठी माणसा'करता काही केले असते ही शक्यता म्हणजे शुद्ध कल्पनाविलास होता.

तोवर कम्युनिस्ट हे 'संपूर्ण क्रांती'च्या भाबड्या स्वप्नातून जागे होऊन जरी निवडणुकीच्या राजकारणात उतरले असले तरी महाराष्ट्रात काही चोरकप्पे सोडल्यास त्यांचा प्रादुर्भाव झालेला नव्हता. मुंबईत डांगे हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नेटाने सहभागी झालेले असले आणि त्यांचे नाव त्या चळवळीच्या धुरीणांमध्ये घेतले जात असले तरी त्यात डांग्यांचे वैयक्तिक कर्तृत्त्व जास्त होते. ६२ च्या चीन युद्धानंतर मार्क्सवादी वेगळे झाल्याने डांग्यांचे बळ कमी झालेले होते. (अवांतर - चीनच्या विस्तारवादी भूमिकेचे समर्थन करणारे ते 'मार्क्सवादी', आणि रशियाची री ओढणारे ते 'उजवे' या विनोदी संज्ञेचा जन्म त्या युद्धात झाला). तसेही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणे हे 'संकुचितवादाचे' द्योतक असल्याची सर्व साम्यवादी मंडळींची खात्री होती. अख्खा भारत, नव्हे, अख्खे विश्वच एक (आणि मॉस्को/पेकिंग त्याची मक्का) हे त्यांचे गृहितक होते.

शेतकरी कामगार पक्ष हा वैचारिक बैठक आणि जनाधार या दोन्ही निकषांवर दणकट पक्ष मुंबईत नगण्य होता. कारण त्या पक्षाने जरी रायगडपासून मराठवाड्यापर्यंत मजल मारली असली आणि महाराष्ट्रात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान पटकावले असले तरी मुंबईत मराठी माणूस जो होता तो प्रामुख्याने मध्यमवर्गीय (मग त्यात निम्न-मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीय अशा अजून दोन फळ्या पाडल्या तरी). आणि त्या वर्गाला शेकापचे तत्त्वज्ञान पचणे-रुचणे शक्यच नव्हते. महानगरात राहणार्‍या माणसांची मानसिकता वेगळीच होत जाते. मग ते मूळ कुठूनही आलेले असोत. शेकापचे झुणका-खर्डा-भाकरी तत्त्वज्ञान या शहरी वर्गाला पेलणे शक्य नव्हते. आणि तसेही यशवंतरावांनी 'बेरजेचे राजकारण' सुरू करून शेकापला गळती लावायला सुरुवात केलीच होती.

रिपब्लिकन पक्षाचीही तीच अवस्था होती. एकतर बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांच्याकडे त्या तोलामोलाचे नेतृत्त्व उरले नव्हते. शकले व्हायला सुरुवात झालेली होती. आणि यशवंतरावांच्या 'बेरजेच्या राजकारणा'चा गळफास रुपवत्यांसारख्या सक्षम नेत्यांच्या गळ्याभोवती आवळायला सुरुवात झालेली होती. आणि मूळ मुद्दा तोच होता, की रिपब्लिकन पक्षाचे राजकारण महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करता 'पुरोगामी', 'सामाजिक न्यायाला धरून' वगैरे असेलही, पण मुंबईतल्या मराठी माणसांचा विचार करता ते एका जातीपुरतेच मर्यादित होते. आणि ती जातसुद्धा फक्त 'नवबौद्ध' हीच, ज्यांची संख्या मुंबईत नगण्य होती.

थोडक्यात, या असंतुष्ट मराठी माणसांना दिशा दाखवायला एकही सक्षम पक्ष नव्हता. दारूगोळा तयार होता. कोरडा होता. साठत चालला होता. पण ठिणगी टाकणे हे वाघावर बसण्यासारखे होते. बसणे सोपे, उतरणे अतिकठीण. या साठत चाललेल्या भांडारावर ठिणगी टाकण्याचे धाडस शिवसेनेने केले. १९ जून १९६६.

त्या दिवशी उत्साह हा एखाद्या सणासारखा होता. भाषावार प्रांतरचनेमुळे भारतात झाडून सगळ्या भाषिकांना त्यांची त्यांची स्वतंत्र राज्ये मिळाली होती. फक्त मराठी राज्याकरता १०५ बळी द्यावे लागले होते. बेळगाव-निपाणी-बीदर-भालकी-कारवार अजून कर्नाटकातच होते. डांग अजून गुजरातमध्येच होते. नेहरूंपासून खालपर्यंत सर्वजण मराठी माणसाची प्रच्छन्न टिंगल करण्यात विकृत धन्यता मानत होते. शिवाजीमहाराज "लुटारू" होते. "महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे" अशा लाळघोट्या गर्जना नि:संकोचपणे केल्या जात होत्या. या द्वेष्ट्या धोरणापायी चिंतामणराव देशमुखांसारखा कर्तबगार प्रशासक गमवायला लागला तरी भारताच्या पंतप्रधानाला सोयरसुतक नव्हते. अखेर संयुक्त महाराष्ट्र नाईलाजाने द्यावा लागला तेव्हा मंगल कलश आणायला चपळाई करून यशवंतरावच पुढे झाले. शिवाजीमहाराजांनी गागाभट्टांच्या हस्ते औरंगजेबालाच राज्याभिषेक करावा त्यातली गत! ही सर्व साठून राहिलेली खदखद बाहेर काढायला कुणीतरी सरसावले होते म्हणताना लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. घडणारी घटना मुंबईच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करील याची खात्री असलेला आणि राजकारणात नुकताच रांगू लागलेला एक होतकरू तरुण शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसून ती सभा ऐकत होता. त्याचे नाव शरद पवार.

बाळ ठाकरे तेव्हा चाळिशीच्या उंबरठ्यावर होते. प्रबोधनकार ठाकरे वयस्कर झाले होते, पण अजूनही तल्लख होते. कोकणातून आलेल्या आणि गिरणगावात राहणार्‍या कुणब्या-कुळवाड्यांनी शिवसेनेला मुख्य इंधन पुरवले. दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक ही त्यातली ठळक नावे. मनोहर जोशी सहा महिन्यांत दाखल झाले. प्रमोद नवलकर समाजवादी पक्षातून आयात झाले. नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक, आनंद दिघे ही सगळी त्या काळातील धडपडणारी (आणी इतरांना पाडणारी) मुले. सुधीर जोशी हे लोकाधिकार समितीच्या माध्यमातून आले आणि चांगलेच लोकप्रिय झाले. इतके, की आपल्या मामालाही (मनोहर जोशींना) त्यांनी शिवसैनिकांतील लोकप्रियतेमध्ये सरळ मागे टाकले. पुढे मुख्यमंत्री ठरवायची वेळ आल्यावर 'सुधीरभाऊ मुख्यमंत्री होत नाहीत' हे जेव्हा कळले, तेव्हा शिवसेना भवनच्या समोरच शिवसैनिकांनी जो शिमगा करायला घेतला होता, तो शमवायला खुद्द सुधीरभाऊंना उतरावे लागले.

बाळ ठाकर्‍यांकडे प्रभावी वक्तृत्त्व आहे. सभेला गर्दी जमवण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात त्यांचा हात धरू शकेल असे शरद पवार सोडता कोणीही आजच्या घडीला नाही. याची बीजे त्या काळातील त्यांच्या पोटतिडिकीने केलेल्या भाषणांत रोवली गेली. त्या काळात शिवसेनेला ठाकर्‍यांच्या वक्तृत्त्वाखेरीज आणि साळवी-महाडिकांच्या रक्त-घामाखेरीज काय भांडवल होते?

एक भांडवल होते. 'संपूर्ण क्रांती', 'वर्गविरहित समाज', 'श्रमिकांची हुकूमशाही' असली स्वप्ने दाखवून कम्युनिस्टांनी गिरणगावात अनेकांना भुलवले होते. ती भूल आता उतरू लागली होती. वाढत्या महागाईला, बेकारीला आणि दारिद्र्याला असली दिवास्वप्ने ठिगळ लावू शकत नाहीत हे वास्तव जेव्हा कामगारांच्या घरातच उमगू लागले, तेव्हा बाप कम्युनिस्ट आणि मुलगा शिवसेनेत अशी विभागणी अनेक घरांतून झाली. आणि रक्तरंजित हाणामार्‍या अगदी उंबरठ्यापर्यंत पोचल्या. गिरणगावातल्या कम्युनिस्टांवर त्या काळात जे हल्ले झाले, ते चढवणारे बहुतेक 'घरचेच' लोक होते.

एका अर्थाने असे म्हणता येऊ शकेल, की नंतर नक्षलबारीमध्ये जे स्फोट  झाले आणि एका अख्ख्या पिढीचा जो विस्कोट झाला, तो शिवसेनेच्या सेफ्टी व्हॉल्व्हने महाराष्ट्रात तुलनात्मक रीत्या स्वस्तात टळला. या विधानाबद्दल वाद होऊ शकतात याची कल्पना आहे. कॉम्रेड कृष्णा देसाईंचा खून हे निषेधार्हच कृत्य होते आणि त्याबद्दल कायद्याने शिक्षा झाली नसली तरी त्यातला शिवसेनेचा हात बर्‍याच जणांना माहीत आहे. त्याचे कुठल्याही प्रकारचे समर्थन करण्याचा अजिबात उद्देश नाही.

तर डोके भडकावणारी भाषा आणि भडकवून घ्यायला आतुर असलेली डोकी यांचा संगम झाल्यावर जे होते तेच झाले. आजच्या भाषेत म्हणजे शिवसेनेचा 'टेरर' निर्माण झाला. "जय महाराष्ट्र" ही तशी निर्विष वाटणारी आरोळी इतरभाषिकांच्या पोटात गोळा उठवू लागली. "बजाव पुंगी, हटाव लुंगी" ही आरोळी तर पोटातून वर सरकून छातीत धडकी भरवू लागली.

राणे, भुजबळ, नाईक ही मंडळी काही साहित्य-सहकार किंवा रवीकिरण मंडळाची सभासद नव्हती. त्यामुळे भाषेपेक्षा त्यांचे लक्ष अर्थ पोचवण्याकडे जास्त असे. तो अर्थ पोचू लागला. "शिवसेनाप्रमुखांना हात लावला तर मुंबई पेटेल" ही गर्जना करण्यात आली, आणि ७२ साली ठाकर्‍यांना अटक झाल्यावर प्रत्यक्षात आणण्यात आली. शेवटी ठाकर्‍यांना तुरुंगातून शांततेचे आवाहन करावे लागले तेव्हा ती आग शमली. ही घोषणा करणारे आणि प्रत्यक्षात आणणारे होते छगन भुजबळ.

शिवसेना जन्माला येण्यापूर्वीपासूनच बाळाचे लाड करायला 'मार्मिक' तयार होताच. त्यातील व्यंगचित्रांमधून आणि लेखांमधून शिवसेना हा ब्रँड "एस्टॅब्लिश" करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. ठाकर्‍यांना रेषा अवगत होत्याच. आता भाषेवरही मांड बसली. त्या काळातील व्यंगचित्रे आणि त्यातील संवाद आपल्याला सत्तरीच्या दशकातल्या मुंबईत स्मरणयात्रा घडवून आणतात.

कम्युनिस्टांच्या विरोधातल्या टोकाच्या भूमिकेमुळे शिवसेना ही काँग्रेसने तयार केलेले अस्त्र आहे अशी कुजबूज सुरुवातीपासूनच सुरू झाली होती. वसंतराव नाईकांच्या वरदहस्तामुळे शिवसेना फोफावली असे अनेक जणांचे ठाम मत आहे. त्यातील काहीजणांनी कुचेष्टेने 'वसंतसेना' हा शब्दही रुजवायचा खटाटोप करून पाहिला.

एकखांबी तंबू असल्याने, आणि मुळात पाया हाच विचारांपेक्षा भावनेचा असल्याने, तार्किक सुसंगती हे शिवसेनेचे वैशिष्ट्य केव्हाच नव्हते. कानाखाली चार आवाज काढले की सगळे प्रश्न सुटतात हा शिवसेनेचा पायाभूत विचार. त्यामुळे "राजकारण म्हणजे गजकरण" अशी जरी सुरुवातीला आरोळी ठाकर्‍यांनी ठोकली असली तरी लगेच वर्षा-दोन वर्षातच प्रजासमाजवादी पक्षाशी हातमिळवणी करून निवडणुका लढवायला ते उतरले. ती हातमिळवणी जरी नंतर टिकली नाही, तरी निवडणुकीचे राजकारण शिवसेनेच्या जनुकात चांगलेच रोवले गेले. मुंबई महापालिकेवर भगवा फडकावून हेमचंद्र गुप्ते, मनोहर जोशी असे महापौर शिवसेनेने जन्मानंतर दहा वर्षांच्या आतच दिले.

या निवडणुकीच्या राजकारणामुळे का होईना, शिवसेनेने मुंबईत मराठी माणसाने उद्योगशीलता दाखवावी असे प्रतिपादन सुरू केले. 'शिवसेना पुरस्कृत बटाटवडा वा वडापाव' हे त्याचे उदाहरण म्हणता येईल. अर्थात मनोहर जोशी (आणि आत्ता राज ठाकरे, नारायण राणे) सोडता उद्योग-व्यवसायात कुणी फारशी भरारी मारली नाही हेही खरे.