....................................
...कविता करण्यासाठी !!
....................................
मी शब्दांच्या किती विनवण्या केल्या
वश झाले नाहीत परंतू
...मग मी त्यांचे पाय मोडले
कविता करण्यासाठी !!
मी अर्थांची मनधरणी बहु केली...
बधले ते नाहीत कधीही ...
मी त्यांनाही झोडझोडले
कविता कऱण्यासाठी !!
मी वृत्तांच्या पुढे कितीदा झुकलो...
पण ती तर ताठर जन्माची...
अखेर त्यांना नमवलेच मी
कविता करण्यासाठी !!
मी मात्रांना खूप घातले वळसे !
डोस दिला मी...दिला ढोसही
अन् मात्रांशी जमवलेच मी
कविता करण्यासाठी !!
मी यमकांना रोज आळवत गेलो
पण त्यांनी ऐकलेच नाही
धरली त्यांची मानगूट मग
कविता करण्यासाठी !!
मी नादाच्या लागलागलो नादी...
म्हटले त्याने, `नाद सोड रे !`
दाखवली मी त्यालाही रग
कविता कऱण्यासाठी !!
मी केली आर्जवे लयीची सत्रा
`नंतर ये,` ती मला म्हणाली
मी केली मग तिचीच फरफट
कविता करण्यासाठी !!
मी गेलो गेयतेकडे विनयाने
तिने भयाने गळा काढला...
तिचे दाबले तिथेच मुस्कट
कविता करण्यासाठी !!
गेलो छंदाकडे, म्हणाला तोही-
`मुक्तच तू आहेस बरा रे...` !!
मी त्याला पकडून ठेवले
कविता करण्यासाठी !!
या साऱ्यांना अशा प्रकारे आता
कायमचे मी गुलाम केले
मजपाशी जखडून ठेवले
कविता कऱण्यासाठी !!
* * * * * *
कवितेसाठी इतुके सारे केले
पण नाही मी जीव ओतला
नाही मी सर्वस्व सांडले
कविता करण्यासाठी !!
आयुष्याची होळी केली नाही
कुठे लावले प्राण पणाला ?
मन दळले ना हृदय कांडले
कविता करण्यासाठी !!
-प्रदीप कुलकर्णी
....................................
रचनाकाल - १ मार्च २००८
....................................