सेतू: ताजप (२)

सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका खूपच चांगल्या होत्या.त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी एडमिशन देण्याच आश्वासन तर दिलंच शिवाय मनोविकार  तज्ज्ञांची मदत घ्यायचाही सल्ला दिला. तोपर्यंत आम्हाला अश्या समस्येबाबत मनोविकार तज्ज्ञांची मदत होऊ शकते हे माहीतच नव्हतं. आम्ही मनोविकार तज्ज्ञांकडे गेलो. त्यांनी आम्हाला समुपदेशक अनुपमा गडकरी ह्यांच्याकडे पाठवलं. त्यांनी निखिलच्या सगळ्या टेस्ट केल्या व हा डिसलेक्झिक असल्याचं सांगितलं. पण योग्य व जरा वेगळ्या पद्धतीने शिकवलं तर सुधारणा होऊ शकते हा विश्वास दिला. हे सगळे रिपोर्टस घेऊन मनोव्कार तज्ज्ञाकडे गेलो त्यांनी आम्हाला एमआरआय करायला सांगितलं ही टेस्ट खूपच महाग होती व त्यावर उपाय तज्ञ काही सांगू शकले नाही म्हणून आम्ही न्युरोसर्जनकडे गेलो.आधी तर त्यांना  हसूच आले. समजा काही दोष असेलच तर त्यावर काहीच उपचार नाहीयेत तेव्हा  ही टेस्ट न करण्याचा सल्ला दिला.

श्री परांजपे: रौनक दुसरीत असताना आम्ही त्याचं मुंबईच्या एका संस्थेत टेस्टिंग केलं तेव्हा कळलं. तेव्हा तिथल्या समुपदेशकाने रौनक दहावी होऊच शकणार नाही असं सांगून आम्हाला नाउमेद केलं.

हे कळल्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती?

मी: अनुपमाने आम्हाला व निखीलला खूप छान समजवून सांगितलं होतं त्यावर आम्हाला भरपूर वाचायला दिलं आणि आम्ही ते खूप सहजतेने ऍक्सेप्ट केलं त्यामुळे पुढचं सगळं सोपं झालं. त्याचा आयक्यु 'हाय इंटेलिजिन्स' कॅटेगरीतला निघाला. आपला मुलगा 'ढ' नाहीये ह्याचा  आनंद तर झालाच पण योग्य निदान व त्यावर उपाय सांगितल्यामुळे खूप हायसं वाटलं.

श्री परांजपे: आमच्याही मुलाचा आयक्यु 'हाय इंटेलिजिन्स' कॅटेगरीतला निघाला . आम्ही नेटवर भरपूर वाचन केलं.कश्या पध्दतीने शिकवायचं ह्याची भरपूर माहिती काढली. आम्हीपण चटकन एक्सेप्ट केलं त्यामुळे पुढचा मार्ग सुकर झाला.

 शाळेचा काय अनुभव होता?

मी:आम्ही मुख्याध्यापिकेशिवाय इतर कोणालाच काही सांगितले नव्हते. सुरुवातीला आम्ही दर आठवड्याला अनुपमाकडे जायचो ती काही एक्झरसाइज करून घ्यायची काही मला करून घ्यायला सांगितल्या होत्या त्या मी करून घ्यायची, गणित व विज्ञानाकरिता ट्युशन लावली होती आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे घरातलं वातावरण बदललं होतं त्यामुळे फक्त नववी पास होण्याचं ध्येय जे आम्ही ठरवलं होतं ते साध्य करू शकलो.

श्री परांजपे: आमचा अनुभव अतिशय वाईट होता. अश्या मुलांसाठी परीक्षेपुरता रायटर , परीक्षेसाठी जास्तीचा अर्धा तास, तोंडी परीक्षेवर जास्त भर, स्पेलींगच्या चुकांकडे दुर्लक्ष अश्या बर्‍याच सवलती बोर्डाने दिल्या आहेत पण शाळेवाले ऐकूनच घ्यायला तयार नव्हतं शेवटी हाय कोर्टाची नोटीस दाखवली तेव्हा त्यांनी रायटरची परवानगी दिली. रायटरची परवानगी तर मिळवली होती पण योग्य रायटर मिळायला अडचण यायची.

सौ परांजपे: त्यानंतर आम्ही नागपुराला बदलून आलो. इथल्या शाळेने आम्हाला बारा वाजता रौनकला घरी घेऊन जायची परवानगी दिली. इतर मुलाच्या  वह्या आम्ही घेऊन येतो किंवा झेरॉक्स करून आणतो त्या मी हळूहळू त्याच्याकडून पूर्ण करून घेते. सुरुवातीला छोटे-छोटे स्पेलींग्ज वेगवेगळ्या रंगात लिहून घेतले काही पिक्चर वर्ड बनवले जसे बॅटल - बॅटच चित्र व टीएलई ही अक्षरं  तर काही शब्दांची फोड करून ते शब्द वेगवेगळ्या रंगात लिहून जसे to get her = together अश्या तर्‍हेने काही फ्लॅशकार्ड बनवले होते. आता त्याच्या स्पेलींगचा चुका कमी झाल्या आहेत आता तो पास होतो आणि मुख्य म्हणजे तो आनंदी आही हे आमच्या दृष्टीने जास्त महत्त्वाच आहे.

आता आम्ही शाळेकडून काहीच अपेक्षा करत नाही खरं  तर चाळीस मुलांमध्ये एकाला वेगळं शिकवणं शक्य नाही हे आम्हालाही कळतं त्यामुळे मला जे काही करता येईल ते मी घरी करून घेते. रौनकला आम्ही ह्या समस्येविषयी पूर्ण कल्पना दिली आहे त्यामुळे कुणीही काहीही म्हटले तरी तो हवालदिल होत नाही. त्याला त्याचा काय प्रॉब्लेम आहे, हे व्यवस्थित माहिती आहे आणि आपल्या आई-वडिलांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे हेही त्याला माहिती असल्यामुळे तो आम्हाला खूपच सहकार्य करतो. त्याला  ड्रॉईंग, संगीत ओरिगामीची आवड आहे  ह्या सगळ्यासाठी आम्ही त्याला नेहमीच मदत व प्रोत्साहित करत असतो.

मी आम्ही मात्र अभ्यास-शाळा ह्या सगळ्या व्यापात इतर काही करून घेऊ शकलो नाही. त्याला क्रिकेटच प्रचंड आकर्षण होतं. त्याला 'स्पोर्टस्टार' लावून दिलं होतं. एका बैठकीत एक पूर्ण धडा न वाचू शकणारा मुलगा एका दमात एक अंक वाचून काढायचा. खेळाडूचं पोस्टर्स व्यवस्थित काढून सांभाळून ठेवायचा. नववीत असताना त्याने नॅशनल जीयोग्राफीची परीक्षा दिली होती .आम्हाला त्याने हे सांगितलंच नव्हतं आणि तो त्या परीक्षेत राज्यातून दुसरा आला हीच एकमेव त्याची शालेय जीवनातली उपलब्धी.

 करियरबद्दल काय विचार केला होता?

मी नववीच्या रिझल्ट लागल्यावर पुढच्या गोष्टी ठरवणार होतो. राज्य बोर्डानेसुद्धा सवलती दिल्या आहेत. त्याकरिता बराच खटाटोप करावा चीफ मेडिकल ऑफीसरचं सरटीफिकेट लागतं. पहिल्यांदाच निखिल सगळ्या विषयात पास झाल्यामुळे अनुपमा, आम्ही दोघं व निखीलने एकत्र बसून ठरवलं की सवलत घ्यायची नाही. आता पुढची महत्त्वाची पायरी होती ती म्हणजे दहावी बोर्डाची परीक्षा. ती परीक्षा तो उत्तम तर्‍हेने (आमच्या दृष्टिकोनातून) म्हणजे साठ टक्क्याने पास झाला. आम्ही सगळ्यांना आनंदाने आणि कौतुकाने पेढे वाटले. दु:खी चेहर्‍याने लोक बिचकतच रिझल्ट विचारायचे. मुलाला ९४-९५ टक्के मार्क मिळाल्यावरही काही घरात  सुतकीकळा असते. आम्ही मात्र खूप  मोठी लढाई जिंकल्याच्या आनंदात होतो.बोर्डाच्या परीक्षेची निखिलने खूपच धास्ती घेतलीहोती त्यामुळे परीक्षेच्या आधी ताण कमी करण्याकरता फार थोडे दिवस त्याला काही औषध दिली होती. आता परत बारावी बोर्डाची परीक्षा द्यायला तो काही तयार नव्हता.

क्रमशः