सेतू: ताजप (३)

  आर्टस, कॉमर्समध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. औरंगाबादला CEDTI ची प्रवेश परीक्षा दिली, जी ऑबजेक्टीव  टाईप असते, ती तो चांगल्या तर्‍हेने पास झाला. टेक्निकल विषय आवडायचे म्हणून तीन वर्षाच्या डिप्लोमासाठी त्याला आजीकडे औरंगाबादला ठेवलं. आता त्याच्यावर जास्त जबाबदारी होती. एटीकेटी होत वर्ष वाया न जाता प्रथम श्रेणीत डिप्लोमाची परीक्षा पास झाला. आता त्याचा आत्मविश्वास वाढला होता.  पुढे इंजिनियरिंग करायचं त्याचं त्यानेच ठरवलं. इथल्या इंजिनियरींगच्या डायरेक्ट दुसर्‍या वर्षाला ऍडमिशनही मिळाली.  इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षाला असताना कॅम्पस इंटरव्ह्युवमध्ये आर्मीसाठी निवड झाली.एसएसबी बेंगलोरहून इंटरव्ह्युवसाठी बोलावणं आलं एकशेपाच मुलांमधून ज्या चार मुलांची निवड झाली त्यातला एक मुलगा माझा निखिल होता. आता त्याचा आत्मविश्वास आणखीनच वाढला होता. पण विषय राहिल्यामुळे तेव्हा त्याला जाता आलं नाही.त्यानंतर त्याने दोन एसएसबीचे इंटरव्ह्युव अलाहाबादला दिले. ते दोन्ही इंटरव्ह्युव त्याने क्लिअर केले. आयएमए डेहराडूनला गेलाही पण एका महिन्यातच त्याला कळलं की हे क्षेत्र आपल्यासाठी नाही त्यामुळे ते सोडून परत आला.  मग  पुण्यात एमबीएला एडमिशन घेतली.आता एमबीएच्या शेवटच्या वर्षाला आहे. बेंगलोरच्या एका मल्टीनॅशनल कंपनीत सिलेक्शन झालंय मे महिन्यात जॉईन होणार आहे.

सौ परांजपे: ताईंनी जसे शॉर्टटर्म गोल ठेवले तसेच आम्ही पण ठेवले आहेत त्यामुळे आता आम्हाला रौनकसाठी रायटर घ्यावा लागत नाही. 

स्वप्ना: खरं म्हणजे प्रत्येक पालकाने असेच शॉर्टटर्म गोल ठेवायला पाहिजे.मुलगा चवथी -पाचवीत असतानाच पुढे इंजिनियरिंग, मेडिकलला एडमिशन मिळेल की नाही ह्या विचाराने हवालदिल होतात आणि मुलांवर प्रेशर आणतात.  चित्रपटात अवघ्या तीन तासात आपल्याला सगळं 'ऑल वेल' दिसतं पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया सोपी नाही, इंस्टंटही नाही हे आपल्या लक्षात आलंच असेल. मुलांना समजावून घेण्याची एक नवी दृष्टी आमिरखानने दिली त्याबद्दल त्याचे कौतुक आणि अभिनंदनही. एकदा आमिरखानसाठी जोरदार टाळ्या. तुम्ही इथे बसलेल्या पालकांना काय 'मेसेज' द्याल?

मीः खरंतर काही 'मेसेज' देण्याचा अधिकार मला आहे की नाही, माहीत नाही पण ह्या सगळ्या प्रक्रियेतून मी काय शिकले हे सांगते. आपलं मुलं जसं आहे तसं स्वीकारा. पेशन्स ठेवा. आपल्या मुलांवर शंभर टक्के विश्वास ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा मात्र त्यांच्यावर लादू नका.

श्री परांजपेः अगदी हेच मी पण म्हणेन.

सौ परांजपेः आपल्या मुलाचा इंटरेस्ट कशात आहे ते ओळखून ती गोष्ट करायला त्याला प्रोत्साहित करा आणि त्याच्या  इंटरेस्टच्या फील्डमध्ये तो नक्की चमकेल हा विश्वास ठेवा पण त्याकरिता वाट पाहावी लागेल, धीर धरावा लागेल.

पालकांनी टाळ्यांचा कडकडाट केला मी मात्र डोळे टिपत होते.