तुझ असं जाणं.....पुन्हा परत येण....

तुझं जाणं,
मला फारसं रुचत नाही.
तरीही,
तुझी तयारी मी करतेच.
अगदी अठवणीनं,
एकेक गोष्ट आठवुन भरतेच,
काही विसरु नयेस म्हणुन.
पण,
मला मात्र तू आठवणीनं
इथेच विसरतोस.

जाताना तू जातोस अन,
माझ मात्र,
सारं सारं घेऊन जातोस.
मला रिती--
अगदी रिकामी करतोस.
काही, काही उरतच नाही मग.

तुझ्या जाण्या बरोबरच,
माझं घड्याळ बंद पडतं.
ते तिथेच असतं
पण टिकटिक मात्र थांबते,
तुझी वाट पहात.
आलास की पुन्हा धडधडत,
सुरु होतं.

मग मी विचार करते,
मधला काळ कुठे गेला?
युगायुगांसारखा एकेक दिवस ढकलते.
तुझ्यातच स्वत:ला बुडवुन टाकते.
दिसत नाहीस मला,
तरी जाणवतोस.--
मग खुप खुप जाणवत राहातोस.
ऐकु येतोस,
मी मन लावुन ऐकत राहाते.
फक्त पुतळा होऊन.

पण पुतळा रडत नाही,
कोणी कावकावला म्हणुन!
चिडत सुध्दा नाही,
कोणी शीटला म्हणुन!
पण मी मात्र--
कोणाच्याही येण्यानी
रडत राहाते,
चिडते-चिडचिडते सुध्दा.

माझ्यावर? तुझ्यावर? त्यांच्यावर?
की आणखी तिसर्‍याच कोणावर?
असहाय्य, घायाळ होऊन.
अस्वस्थ होते,
सैरभैर होते.
सारे प्रश्न फेर धरतात.
कोणाला हाक मारु?
कोणाला सांगू?
कोणाच्या छातीवर विसावू?
कोण? कोण? कोण?

कोणी नसलंच--
तर प्रश्नच नसतो.
असुन नसलं--
तरच असं होतं.

मनाच्या बेभान अवस्थेत शिरते,
ठरवते,
आपलं असं होता कामा नये.
खंबीरपणे उभी रहा.
पण कुठे?
उभं राहायला जमीन लागतेच.
विश्वासानं पाय ठेवू?
कुठे?
माझी जमीन?
मझ्यापासुन दूर तिकडे.

माझ्या मनात घुमत राहातं
"रेकॉर्डिंगची गरजच नाही,
तुझा आवाज इथे आहे"
आठवतं,--
आठवतच राहातं मग.
मी मग मुकी होते,
बोलताच येत नाही मला,
शब्दच फुटत नाहीत.
मनही बंद पडत.
शरीरच फक्त सुरु असतं

मी आक्रंदत राहाते,--
"फक्त आवाज नाही रे,
माझ सर्वस्व तिथेच आहे"
तुच इथे नाहीस,
मग इथे काय आहे?
'फक्त हे शरीर'
एवढं एकच उत्तर.

माझ्याआकाशात,
नव्हे,
अवकाशात
पुन्हा पुन्हा घुमत राहातं
नुसत शरीर.
रिकामं-रितं,
म्हणुनच अर्थहीन---
चेतना हरवलेलं, प्राण हरवलेलं,
अचेतन--निष्प्रण---

आणी तू येताच पुन्हा,
चक्क श्वास घ्यायला लागत.