माझ्या स्पोर्टस शॉप मध्ये एक हिप्पी कट ठेवलेला तरूण मुलगा आला. त्याची शोधक नजर दुकानभर भिरभिरत होती.
"बोला, काय हवं?????" मी विचारलं.
"तुमच्याकडे खेळाडूंची पोस्टर्स असतात का????" त्याने विचारलं.
"हो, आहेत की. धोणी आहे, सचिन आहे, इशांत, श्रीसंत, भजी... सानिया सुद्धा आहे."
तो विचारात पडला. मग म्हणाला,
"तुमच्याकडे के.पी.एस.गील आहे का?"
"थांबा बघतो, कालच अंडर १९ चा लॉट आला आहे, त्यात बघतो!" मी म्हंटलं.
"अहो त्यात नसेल. "
"क्रिकेटर नाही का तो????" मी विचारलं.
"तुम्हाला गील कोण हेच माहीत नाही असे वाटतं!!"
मला नुकतच हे नाव वाचल्याचं आठवत होतं, पण लक्षात येत नव्हतं.
"नाही बुवा. कोण आहे हा? कोणता खेळ खेळतो?"
"तो काही खेळत नाही. तो हॉकी महासंघाचा अध्यक्ष आहे."
मला एकदम आठवलं. हॉकी संघ कुठेतरी हरला म्हणून सगळे गीलला दुषने देत होते. पण साधारणपणे दुकानात तरूण मुलं सानिया, सचिन, धोणी नेतात. फारतर पेस, भुपती. हॉकीपटू तर नाहीच नाही. अशा परीस्थितीत हॉकीमंडळाच्या अध्यक्षाचा फोटो मागणं न पचन्यासारख होतं.
"अच्छा, आलं लक्षात! पण त्यांचं पोस्टर का म्हणून हवं आहे????" मी विचारलं.
"जाळायला!!!!!"
"काय?? जाळायला???????"
"हो, हॉकीमध्ये आपली हार झाली, आणि ती गील मुळे झाली!!!" तरूण बोलला.
"हॉकीचा वर्ल्डकप होता का????"
तरूणाने चिडून माझ्याकडे बघितलं. "नाही. ज्या ऑलींपिक मध्ये पुर्वी आपण सुवर्णपदक मिळ्वायचो, तिथे पात्रता फेरीत पण आपण हरायला लागलो आहोत. याला कारण गील आहे!!!"
"अच्छा!!! पण तुम्ही खरच फोटो जाळणार आहात का?" माझा अजून विश्वास नव्हता बसत.
"होय.. आमचा पक्ष भारताच्या ह्या पराभवाचा निषेध गील आणि धनराज पिल्लेचा फोटो जाळून करणार आहे." तो म्हणाला.
माझ्या माहितीप्रमाणे पिल्ले निव्रूत्त झाला होता. मी त्याला तसं म्हंटलं.
"मग काय झालं!! असता तर जिंकलो असतो ना??? तो खेळला नाही म्हणून त्याचा पण फोटो आम्ही जाळणार. त्याचा पण फोटो द्या!!"
मी परत पोस्टर्स वरखाली करायला लागलो. १५ मिनिटे मेहनत घेउन मला दोन्ही पोस्टर्स मिळाले नाहीत.
"एक सुद्धा नाही."
"सगळ शहर पालथं घातलं. पण कुठेच पोस्टर्स नाहीत. आता कसं होईल आंदोलन???" तो तरूण हताश झाला.
मला एक कल्पना सुचली.
"हे बघ माझ्या कडे हरभजन चा पगडी घातलेला फोटो आहे. त्याच्या चेहऱ्याला तुम्ही काळे फासा आणि जाळा!!! चेहरा काळा केल्यावर लोकांना तो ओळखू येणार नाही."
त्याने थोडा विचार केला आणि म्हाणाला "खरच की छान आयडीआ!!! पण पिल्ले च काय?? त्याचा फोटो???"
"माझ्याकडे बालाजीचा जुना फोटो आहे. तो पण चालेल की!!! बालाजी आता लोकांना आठवत नाही आणि पिल्लेला लोकं विसरले आहेत!!!" मी सुचवलं
त्याला ती पण कल्पना आवडली. पण मी त्याला एक अट घातली.
"हे बघ, माझ्या कडे हॉकी स्टीक्सचा भरपुर स्टॉक उरला आहे. तुझ्या पक्षाला जर गरज लागली तर तु माझ्या कडून त्या विकत घ्यायच्यास."
"चालेल की..पुढच्या महिन्यातच परप्रांतियांच्या विरोधात आंदोलन आहे. तेव्हा १०० स्टीक्स लागतील. डिस्काउंट तेव्हढा द्या!!!"
"नक्कीच!!!" मी म्हंटलं!!!
तो मुलगा आनंदात निघून गेला, पण नातवासाठी क्रिकेटची बॅट घ्यायला आलेल्या हॉकीपटू आजोबांच्या डोळ्यात पाणी होतं.