यिन, यँग अन साताळकर-२

स्वतःची भली मोठी, पण जुन्यातली मर्सिडीज काढून चारुहास पेडणेकर त्या दिवशी जर मुंबईहून राजूला भेटायला आला नसता, तर कदाचित साताळकर हे नाव राजूच्या मेंदूच्या त्याच अगम्य कप्प्यात राहिलं असतं. पण तसं व्हायचं नव्हतं.
अचानक थेट स्टुडिओतच पेडणेकर दाखल झाला, याचं राजूला आश्चर्य वाटलं.
"पेडण्या - सो सड्न ऍन् अपीअरन्स ? फोन नाही, काही नाही ... ये, ये."
"पुणेऱ्या, फोन न करता येऊ नये का आम्ही ? नाय केला फोन. कामात जाम लटकलेलो रे. मूड आला, म्हटलं चला.. पुण्याला जाऊ. आर्टिस् लोक भेटतात का बघू." पेडणेकरनं राजूच्या पाठीत एक प्रेमळ गुद्दा मारत म्हटलं. एक तर 'लटकलेलो..' वगैरे क्रियापदं अर्धी सोडण्याची मुंबईची बोलण्याची पद्धत, राजू अस्सल पुणेरी असल्यामुळं राजूला आवडायची नाही. त्यात सहा इंचाचा पर्सनल झोन ओलांडून गुद्दा वगैरे इतर कोणी मारला असता, तर राजू चांगलाच आक्रसला असता. पण चारु पेडणेकर या मित्राला सगळं माफ होतं. कारण तो साक्षात चारुहास पेडणेकर होता.
विचित्र, जुन्या, पण किंमती वस्तू खरेदी करणं हा खानदानी शौक पेडणेकरनं चांगला फायदेशीर रीतीनं व्यवसायात बदलला होता. खास मुंबईला मोठ्ठया कॅनव्हासवर मिळालेली संधी पुरेपूर वापरण्याचं उद्योजकी भान. त्यामुळे चारुचं कुलाब्यात ' ऍण्टिक गॅलेरिया' हे दुकान कम् कलादालन जोरात चाललं होतं. अगदी सगळ्या बोहरी-पारशी ऍण्टिक डिलर्सच्या नाकावर टिच्चून. अनेक बाहेरदेशीचे आर्ट डीलर्स, ऑक्शनीयर्स, क्रिस्तीज्, सॉथ्बीज् सारखे मोठे लोक अशी मंडळी पेडणेकरच्या नित्य संपर्कात असायची.
एकूण त्याची 'छपाई' जोरात चालली होती. पण राजूला 'पेडण्या' आवडायचा ते या सगळ्यामुळं नाही.चारुहासची स्वतःची अभिरुची, सौंदर्यदृष्टी पण खरंच चांगली होती. राजूनंच फ्रेम करून, एन्लार्ज करून भेट दिलेलं लक्ष्मणचं 'अँटिकच्या दुकानात जाऊन "व्हॉट्स न्यू" विचारणारं गिऱ्हाईक' हे कार्टूनही स्वतःच्याच दुकानात लावण्याइतपत तरलही होता तो. मागे त्याची वेबसाईट डिझाईन करुन देतादेता, ते एकमेकांचे चांगले दोस्त बनले होते.
"पेडण्या, नाटकं नको करु. तू तिकडचं सगळं सोडून आला. ते काही मला भेटायला अन बाकरवडय़ा न्यायला नक्कीच नसणार. काम बोल. त्यात माझी काय मदत होणार असली, तर बघतो. एल्स, थोडावेळ थांब. एवढं डिझाईन पूर्ण करतो - मग कॉफी मारायला जाऊ."
"टेक युअर टाईम, मॅन. मी एक सिगरेट ओढतो तोवर. कॅरी ऑन..."
कॉफी पितांना पेडणेकरनं सांगितलेला प्रकार चांगलाच गंभीर होता. पण राजूला तो इंटरेस्टींग पण वाटला.
"छत्रपती राजारामाचं एक अस्सल करारपत्र माझ्या हाती लागलंय". पेडणेकर सांगत होता.
"ठाण्याची चिटणीस म्हणून फॅमिली आहे.. रुटस् पाँडिचेरीत असणारी. त्यांनी मला ऍसेस् करायला दिलंय, त्यांच्या अडगळीत पडलेलं. आयला राजू, आपण मराठय़ांनी पाँडिचेरी मस्त विकली होती रे या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला ! त्याचंच हे करारपत्र आहे. अमुक हजार पगोडाज् का काहीतरी करन्सी कॅशमधे घेऊन पाँडिचेरीचे सगळे हक्क फ्रेंच कॉलोनयाझर्सना विकणारं. त्याच्यावर राजारामाची मुद्रा... सील आहे आणि प्रल्हाद निराजीनं ते बनवलंय, असं एकूण वाटतंय. कोण रे हा निराजी?"
लक्ष देऊन ऐकणा-या राजूनं खेदानं मान हलवली. "मुंबट लेकाचे... तुम्हाला ना, ऍड गुरु प्रल्हाद कक्कर माहिती असेल... पण प्रल्हाद निराजी नाही ! अरे मोठय़ा राजांपासून पार अखेरपर्यंत स्वराज्य संभाळणारा फार हिकमती मुत्सद्दी होता तो. म्हणजे मला पण जास्त माहिती नाही, पण हे इतकं नक्कीच."
"जाऊ दे रे राजू... तर मी हे विकत घेणार का, म्हणून फ्रान्समधली एक ऍण्टिक डीलिंग फर्म, फ्रेंच गव्हर्मेंटची अर्कायव्हल रेकॉर्डस् सर्व्हिस आणि बर्नार्ड सुलेंन् नावाचा प्रायव्हेट संग्राहक - अशा सगळ्यांना विचारलं. सगळ्यांनाच ते हवंय. यू नो, व्हॉट प्राईस सुलेन हॅज ऑफर्ड?.. पंचाहत्तर हजार ते एक लाख युरोज्. पन्नास लाखापर्यंत रुपये झाले ना बाप ! फक्त ते म्हणतोय की त्याचा अस्सलपणा तपासून, समअथॉरिटी हॅज टू व्हेरीफाय, सर्टिफाय अँड व्हॅलिडेट, की हा अस्सल दस्तऐवजच आहे. फेअर इनफ्!"
त्यानं कॉफीचा एक मोठा घोट घेतला. राजूनं सिगरेट पेटवली.
"पण मी ... मी काय करणार पेडण्या यात ?"
" जास्त काव आणू नको हां, मला. अशी ऍथॉरिटी, असा एक्स्पर्ट मिळाला तर पुण्यातच! हे मी सांगू का तुला ? असल्या संस्था, असे लोक इथेच मिळणार लेका."
एकंदरच सगळं भरताड पचवायला राजूला दोन मोठ्ठे झुरके ओढावे लागले. मग पेडणेकरला नक्की काय पाहिजे, याचा त्याला जरा अंदाज आला. कोण असेल, असं तज्ञ? आपल्या इथे ?
शहरात वारंवार उल्लेख होणारी, माध्यमांमधे 'चमकून' असणारी काही लोकं ही त्याला आठवली. पण ते ज्ञानमार्गी इतिहासवाले नव्हते. कुठल्यातरी मताच्या, विचारसरणीच्या किंवा चक्क स्वतःच्या जातीच्या समर्थनार्थ इतिहास वाकवणारे लोक होते ते. आणखी एक दोन नावं आठवली... ते संपूर्ण भरतकाम- नक्षीकाम असणारे झब्बे वगैरे घालून भाट-शाहीर सदृश भाषणं देत फिरणारे विद्वान होते. या'पडताळून पहाणं' वगैरे कामात त्यांचा तसा उपयोग नव्हता. उत्तर शिवशाही- फ्रेंच कॉलनीज्- आणि एकदम पहिल्या पावसानं झाडाची पानं स्वच्छ व्हावी, तसं लख्ख उत्तर राजूला त्याच्याच मनातून उमगलं.
साताळकर!
"पेडण्या, आहे आपल्याकडे एक मॅन असा. चल, स्टुडिओत जाऊन त्यानं याच विषयावर काहीतरी रीसर्च पेपर लिहीलेला पडलाय् माझ्याकडं - तो वाच आणि काय ते ठरव."
वामकुक्षी उरकून साताळकर राजूच्या स्टुडिओत आले, ते पुन्हा बरोबर चार वाजता. त्याआधी पेडणेकरनं ब-याच गोष्टी उरकल्या होत्या. तो शोधनिबंध त्यानं राजूनं शोधून दिल्यावर पूर्ण वाचला होता.त्यामुळे तर तो प्रभावित झाला होताच, पण दीड-दोनच्या सुमाराला फ्रान्समधे फोन करून त्यानं त्याच्या संभाव्य खरेदीदारांना पडताळणीसाठी साताळकर चालतील का, हे विचारलं होतं. तिघांनाही ते याच विषयातले तज्ञ म्हणून माहिती होते, आणि चालणार होते. खरंतर त्या तिघांनीही त्यांच्याच नावाचा आग्रह धरलेला पाहून तो आणि राजू, जरासे चकितच झाले होते. पुण्यात एका कोप-यात अडीच खोल्यांमधे राहून हा मनुष्य इतका प्रसिद्ध असेल, हे त्यांना जरा नवीनच होतं.
अशा काही खासगी कामाला ते 'हो' म्हणतील का? ही राजूलाच जरा शंका होती. पण पेडणेकरनं त्यांच्याशी फोनवरुन बोलतानांच खूप पारदर्शकपणे त्यांना सगळी परिस्थिती सांगितली होती. आणि बाकी काही नाही, तरी त्यांच्याच संशोधनाच्या विषयातलं इतकं महत्वाचं काहीतरी - त्यांना निदान बघण्याची उत्सुकता असणार, हा त्या दोघांचा अंदाज खरा ठरला.
पंधरा ते वीस मिनिटं, साताळकरांनी ते करारपत्र त्याच्या संरक्षक आवरणातून अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढून नीट न्याहाळलं. एक-दोन सेकंद पण ते भावनावशही झालेले राजूला कळले.
"हे जर अस्सल निघालं... तर मराठय़ांच्या इतिहासात फार मोलाची भर पडेल. मराठय़ांच्याच का, फ्रेंचांच्याही. कारण हे करारपत्र म्हणजे मराठय़ांच्या मुत्सद्देगिरीचा नमुना आहे. पण त्याहीपेक्षा भारतातल्या फ्रेंच वसाहतींची अधिकृत सुरुवात, या करारपत्रानं झालेली आहे. म्हणून ते पत्र महत्वाचं. भले मग ते फ्रान्समधे का राहींना ! आजवर फक्त मारतँ म्हणजे आपल्या उच्चारानं 'मार्टिन' -नावाच्या एका फ्रेंच अधिका-याच्या डाय-यांमधे त्याचा उल्लेख आला होता. हे अस्सल पत्र प्रत्यक्ष मिळाल्यानं, तहाची कलमं,
इतर अनेक गोष्टी प्रकाशात येतील". ते म्हणाले.
राजू आणि पेडणेकर, दोघांनीही त्यांचं बोलणं थांबेपर्यंत तोंडातून अवाक्षर काढलं नव्हतं.

"करारनाम्याची तारीख आहे, २५ जून १६९०. जुळतंय. कारण मारत्याँच्या वृत्तान्तात, त्याचा एक अधिकारी- झेरमँ त्याचं नाव. तो हे पत्र घेऊन आल्याचा उल्लेख याच तारखेच्या आसपास आहे. १६८८ पासूनच फ्रेंच लोक पाँडिचेरी मिळावी म्हणून मराठय़ांच्या मागे होते. म्हणजे, जकातीतून माफी, किल्ल्याला तटबंदी करायला परवानगी अशा मार्गांनी. पण त्यावेळच्या अस्थिर राजकीय वातावरणामुळे ते 'डील' व्हायला १६९० उजाडलं."
राजूनं खूप वेळ मनात दाबून ठेवलेली शंका विचारलीच.
"सर.. हे करारपत्र मराठीत कसं काय?... म्हणजे... फ्रेंचाना काय कळणार, त्यात नक्की काय आहे?"
साताळकरांनी 'बरोबर' अशा अर्थाची एक हालचाल केली. "रास्त प्रश्न, राजू महाराज. पण हिंदुस्थानच्या भूमीवर पहिले सेटलर्स होते पोर्तुगीज. इंग्लीश, फ्रेंच ही मंडळी तुलनेनं नंतर आली. त्यामुळे मराठीतून पहिले सगळे दुभाषे, निर्माण झाले ते पोर्तुगीजमधे. त्यामुळे एकूणच मराठे आणि परकीय लोक, यांच्यातली पहिली बोली भाषा - लिंग्वा फ्रँका - पोर्तुगीज होती, खूप दिवस. त्यामुळे, अशी करारपत्रं त्यांना कळावीत, म्हणून दुभाषे प्रथम ती पोर्तुगीजमधे अनुवादित करत आणि मग इंग्लीश, फ्रेंच त्या /त्या भाषांमधे त्याचा तर्जुमा केला जाई."
पेडणेकरचं व्यावसायिक तर्कशास्त्र एकदम उफाळून आलं. "पण सर, याचा अर्थ, त्या दस्तऐवजाचा फ्रेंच म्हणा, पोर्तुगीज म्हणा, रेकॉर्डसमध्ये त्या भाषेत तर्जुमा मिळायला हवा, असं म्हणायचं का?"
साताळकरांनी नकारार्थी मान हलवली. "असंच काही नाही. काही वेळा हे अनुवाद त्या रेकॉर्डसमध्ये सापडतात, काही वेळा नाही. आता या करारपत्राचा कुठं काय तर्जुमा आहे, आजवर फ्रेंचमधे? पण म्हणून ते अस्सल नसेलच, असं काही नाही. ते पडताळायला इतर अनेक कसोटय़ा असतात."
चारुहास पेडणेकरनं आत्तापर्यंत रोखलेला श्वास सोडला. त्याचा ताणही बऱ्याच अंशी कमी झाला होता. आता तो धंद्याचं बोलू शकत होता. "सो ... सर... हॅविंग कम धिस फार, माझी तुम्हाला अशी विनंती आहे, की हे जे काय परीक्षण असेल, ते त्या त्या कसोटय़ांवर, तुम्ही प्रोफेशनली मला करुन द्याल का - आणि त्यासाठी तुमचे चार्जेस कसे काय असतील?" आतापर्यंत कागदावर खिळलेली नजर, साताळकरांनी पेडणेकरच्या नजरेला भिडवली. त्यांच्या डोळ्यात शांत, पण दृढ असा एक भाव होता. "पेडणेकर साहेब....
तुम्ही याचं पुढं काय करणार आहात, ती किंमत अंदाजे किती असेल. हे सगळं तुम्ही मला मोकळेपणानं सांगितलंत, हे मला खूप आवडलं. इन् फॅक्ट, दॅटस् व्हॉट प्रॉम्प्टेड मी टू कम हिअर. देशपांडय़ांचीही ओळख होतीच. या सगळयाचा विचार करून, मला वाटलं या दस्तऐवजाचा अस्सलपणा तपासण्यासाठी सुमारे सहा, आठ कसोटय़ांवर तो तपासावा लागेल. त्यासाठी, तुम्ही मला पाच लाख रुपये, तेही कामाच्या आधी द्यावेत. डॉक्युमेंट अर्थातच विश्वासानं तुम्हाला इथेच सोडावं लागेल किंवा माझ्याबरोबर थांबावं लागेल, १५ दिवस. वेल्, याचं काही 'अस्सल' करारपत्र करावंसं तुम्हाला वाटत असेल, तर करु आपण."
शेवटच्या वाक्याला तिघेही हसले.
"नाही सर... राजूनं तुमचा संदर्भ दिलाय, हे पुरेसं आहे. पाच लाख आणि पंधरा दिवस इज ऑल्सो ओके. माझ्या बायर्सनाही मी तुमचा संदर्भ दिला होता. तीनही बिडर्सना, तुम्ही केलेलं परीक्षण मान्य असेल, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे काही प्रश्न नाही."
क्षणभर पेडणेकर घुटमळला. "पण सर...मला याचा तुमच्या लेटरहेडवर सविस्तर अधिकृत रिपोर्टलागेल. तो घ्यायला मी येईनच."
साताळकरांचा तात्काळ होकार आला. "हो .. हो, अर्थातच. अच्छा, म्हणजे तुम्ही थांबत नाही, परत जाताय् मुंबईला. देशपांडेमहाराज, दर तीन दिवसांनी एक एक निकषावर घासून यातलं सत्य बाहेर येत जाईल. ते डिस्कस करायला मी तुम्हाला भेटत राहीन. चालेल, की कंटाळाल?"
"नाही, सर". राजू म्हणाला. राजूला खूप आनंद झाला होता. एका मोठय़ा घटनेचा -ऐतिहासिक घटनेचा आणि उलाढालीचा, तो साक्षीदार बनत होता. त्याच्याच चांगल्या ओळखीतली दोन तोलामोलाची माणसं काही देवघेव, काही व्यवहार करत होती. आणि ती दोन्ही माणसं राजूला महत्वाची होती.
साताळकरांबद्दलचा त्याचा आदर तर वाढला होताच, पण चारुहास पेडणेकरची पारदर्शक वृत्ती, झटपट निर्णय घेणं, हे ही त्याला पहायला मिळत होतं, आणि आवडत होतं.
"राजू... आपला बर्जोर आहे ना, कोरेगाव पार्क... त्याला मी सांगून ठेवतो. संध्याकाळी, किंवा फारतर उद्या सकाळी -- तो तुला कॅश देईल. तेवढी सरांपर्यन्त पोहोचती कर. साताळकर सर, एक रीसीट फक्त द्या त्याची, राजूकडं."
साताळकर गेल्यावर त्यांनी आपापल्या सिगरेटी पेटवल्या.
"राजू, एक बरंय - ते तुझ्याबरोबर डिस्कस पण करतायत. यू कॅन ऑल्सो हॅव युअर इन पुट्स. चांगलं झालं ना रे, ठरवून टाकलं? काय म्हणतो तू?"
" काही प्रश्नच नाही. पेडण्या, मी त्यांच्या मागे एकदा घरी गेलो होतो. ही वॉझ् ऑलवेज अंडर मॉनेटरी डिस्ट्रेस अँड डेफिसिट. तू त्यांचा तोही भाग थोडातरी हलका केला आहेसच. ऍम शुअर, ही विल डिलीव्हर."
"वांधा नाही, राजू. आणि काही लागलं तर तू आहेसच. पैशेबिशे सोड. ते आपण त्यांच्यापेक्षाही या फील्ड मधल्या त्यांच्या अधिकाराला दिलेत. फक्त मधून मधून मला एक फोन मारत जाशील?"
 "येस... नक्की करीन. जसा त्यांचा रिपोर्ट येत जाईल. चारु, ऑल द बेस्ट फॉर धिस डील."
पेडणेकर मुंबईला परत निघाला होता.

(क्रमशः)