ह्यासोबत
पुढे ते म्हणाले,"अरे हो, ते सांगायचं राहिलं. कागदाची जाडी, विदिन टॉलरेबल लिमिट्स सगळीकडे सारखी आहे. मायक्रोमीटर असतो ना, आपल्या शाळेच्या प्रयोगशाळेत, तो लावून मी किमान तेवीस ठिकाणी त्याची जाडी मोजली, हा लेटेस्ट रिपोर्ट. चहा कुठे आहे, हो? का आपण बाहेर जाऊन घेऊ या?"
त्या दिवशी मात्र ते गेल्यावर राजूनं चारूहास पेडणेकरला फोन लावला. त्याला चढत जाणारं टेन्शन, त्याची निरीक्षणं हे या बाबतीत चारू सोडून तो कुणाशीच शेअर पण करु शकत नव्हता. फोनवरचं त्याचं बोलणं ऐकून पेडणेकर प्रचंड मनापासून गदगदून हसला. राजूचं, त्यानं या केसचं घेतलेलं टेन्शन बाहेर पडत होतं.
"पेडण्या, लेका तुझ्या कृपेनं मी अगदी डॉ. वॉट्सन का वॅटसन त्याच्या रोलमधे जाऊम पडलोय. होम्स वरच्या पिक्चरमधे किंवा संगीत नाटकात बोलणं-गाणं ऐकणारं पात्र असतं ना, त्या रोलमध्ये, सारखं त्या परफॉर्म करणा-या कडं कौतुकभरल्या, अप्रीशिएटिव्ह नजरेनं बघत रहायचं ! च्यायला ! ऑफ कोर्स, इतकं वाईट नाहीये म्हणा सगळं. इट्स क्वाईट इंटरेस्टिंग. पण चारु, जड होतं ना कधी कधी."
"ए वॅटसन्, तुला मजा येतीय ना? बस्. आणि आता होतच आलंय, म्हणतोस ना? आणखी एक- दोन सेशन्स. जर अंदाज घे. मी पण येऊ शकतो पुढच्या आठवडय़ात पण मी एकदम फायनल रीपोर्टलाच येईन, असं म्हणतो. काय बोलतो तू?"
"व्हेन एव्हर, चारु. आत्ता तरी काही अडचण नाही. च्यायला पेडण्या, तुला काही उत्सुकता वाटत नाही का रे?... हे डॉक्युमेंट ओरिजनल निघेल, फेक निघेल, याची?"
"काय आहे ना, राजू - ऍण्टिक गॅलेरियातल्या येणा-या आणि जाणा-या प्रत्येक प्रॉडक्ट आणि आर्टेफॅक्टवर मी असा जीव लावून बसलो, तर धंदा कधी करु? घोडा अगर घास से दोस्ती करेगा, तो खायेगा क्या ? पण एक नक्की आहे. मी मराठी असल्यामुळे असेल किंवा तज्ञ म्हणून साताळकरांसारखा इंटरनॅशनल रेप्यूटचा एक्सपर्ट असल्यामुळे असेल मला ते डॉक्युमेंट खरं-खोटं निघेल, त्यापेक्षाही ही ऍनालसिस फेज् आहे ना, तीच जास्त इंटरेस्टिंग वाटते. आय होप, यू ऍग्री ! त्यासाठी पाच लाख इज् ओके. वुई लर्न."
तिस-या बैठकीला साताळकर खूपच गंभीर दिसत होते. आल्यावर बाकीचं, इकडचं -तिकडचं काही न बोलता ते थेट विषयावर आले आणि राजूला जाणवलं, की ते नेहमीसारखे ऐसपैस बोलत वावरत नाहीयेत. काहीतरी सूक्ष्म ताण त्यांच्यावर दाटून आहे. तो ऐकत राहिला.
"तर आज. गेले तीन दिवस मला बरेच सोर्सेस हुडकावे, व्हेरिफाय करावे लागले आहेत. याचं कारण, गेल्या तीन दिवसांत मी एका महत्वाच्या निकषावर काम करत होतो. ज्याचा परिणाम आपल्या निर्णयावर फार मोठय़ा प्रमाणावर पडणार आहे. हा घटक, म्हणजे शिक्का. द ऑफिशियल सील ऑफ राजाराम. धिस सिंगल एलेमेन्ट, मिस्टर देशपांडे, कॅन बी अ डिसायडर - इन सर्टन केसेस..... टू अ लार्ज एक्स्टेंट".
राजू पूर्ण एकाग्र होऊन ऐकत होता. साताळकरांनी आपल्या बॅगमधून, काही मोठे ताव काढले. वेगवेगळ्या शिक्क्यांचे काही ठसे त्यावर उमटवलेले दिसत होते.
"तुम्हाला ना देशपांडे, बाकी सगळं आहेच पण हे जास्त इंटरेस्टींग वाटेल. ऐतिहासिक शिक्के, मोर्तब, सील्स यांचा अभ्यास. sigillography ज्याला म्हणतात, ते."
त्यांनी काही वेळ बोलणं जुळवण्यासाठी घेतला.
"लुक.. इन अवर केस... घोळ जरा जास्त होता. कारण राजारामचे तीन शिक्के आजवर प्रकाशात आले आहेत.. तीन विशिष्ट कालखंडांमध्ये वापरलेले. हा पहा त्याच्या पहिल्या शिक्क्याचा ठसा. चौकोनी आकार. राजूनं पाहिलं. "श्री राजा । राम छ। त्रपति।" हा मजकूर तो वाचू शकला. साताळकरांनी दुसरा एक ठसा दाखवला. तो वर्तुळाकृती होती. "बघा, वाचता येतंय का."
राजूनं पुन्हा निरखून पाहिलं. "श्री धर्मप्र। द्योतिताशेषव । र्णादाशरथेरिव। राजारामस्य मुद्रे। यंविश्ववंद्या। विराजते।"... मजकूर वाचायलाच त्याला वेळ लागला.
साताळकर सांगत होते. "दुसरा शिक्का आपल्याला हव्या त्या कालखंडात जास्तीत जास्त वापरला गेला आहे. आणि आपल्याही डॉक्युमेंटमधे तोच वापरलेला दिसतो आहे. तिथे ही जुळतंय. तिसरा शिक्का, रामराजे जिंजी मुक्कामाहून परतल्यावर वापरायचे तो ..पण, पण त्याचा आपला संबंध नाही."
राजूनं होकार भरला.."इंटरेस्टिंग. पण मग शिक्का अशा केसेसमध्ये ' डिसायडर' कसा काय ठरतो, सर?"
"आपल्या केसपुरतं बघायचं, तर या तीनातला बरोबर कुठला शिक्का पत्राच्या कालावधीत वापरायचा, हे सर्वसामान्य बनावटकाराला कळणं तसं दुरापास्त म्हणावं लागेल. जरी त्यानं तसंही केलं... तरी बाकी कसोटय़ांवर तो कागद सर्वतोपरी 'पास' होणं अवघड आहे.
"खरं तर नकली कागद तयार करण्यासाठी हा पळापळ, पाठलाग, धामधूम असणारा मराठय़ांचा संघर्षमय कालखंड सर्वथैव योग्य आहे. मोगलांचा ससेमिरा चुकवण्यासाठी, आणि स्वराज्याची ज्योत तेवती ठेवण्यासाठी राजाराम काही निवडक लोकांबरोबर दक्षिणेकडच्या मराठी मुलुखात निघून आला होता. पण महाराष्ट्रातही त्याचा कारभार, पत्र व्यवहार, वतनपत्रं देणं चालू होतं. याच गोष्टीचा फायदा घेऊन काहीतत्कालिन लोकांनी बनावट पत्रांची निर्मिती केलीही होती. तशी बनावट वतनपत्रं उजेडात आलीही आहेत.
पण जेव्हा आपण शिक्के, ठसे हे बघतो, तेव्हा नुसतं विलग स्वरुपात त्यांच्याकडे पहात नाही. बाकी सगळ्या घटकांची, बनवणाऱ्याला माहिती असण्याची शक्यता फार दुरापास्त. दुसरं, शिक्का खरा की बनावट हे ठरवतांना कागदावर तो कसा उमटला आहे, त्यावर खूप अवलंबून असतं. त्या कागदाचा मऊ किंवा खडबडीतपणा, त्या कागदाची तत्कालिन शाई शोषण्याची क्षमता, उमटवतांना दिला गेलेला दाब अशा अनेक गोष्टी त्यात येतात. खरंतर एकच शिक्का दोन ठिकाणी उमटवला, तर या प्रत्येक बाबीत, दरवेळी थोडाफार फरक पडतोच. पडायलाच हवा. बऱ्याच वेळी अस्सल शिक्का 'परफेक्ट' कधीच उमटलेला नसतो. जर जास्त स्पष्ट उमटलेला वाटला. म्हणजे कागदाच्या तुलनेत - तरच काही गोंधळ असण्याची शक्यता अधिक."
.... आलेला चहा त्यांनी स्वतःच दोन मग्जमधे ओतला. "घ्या".. तेच राजूला म्हणाले.
राजूच्या मनात विचार आला. बरंय् असल्या हेवी स्टफला सरावलो आपण. पहिल्या दिवशी म्हणजे झिणझिण्या आल्या असत्या डोक्याला. पण त्यानं पुन्हा लक्ष ऐकण्यावर केंद्रित केलं.
"पणा दोन ठिकाणी वेगळा उमटला, म्हणून केवळ शिक्का बनावट ठरत नाही, ते मी आत्ता म्हणालो त्या सगळ्यामुळं. निर्णायक कसोटी असते, ते एखाद्या पुराव्यानिशी शाबित झालेल्या कागदावरच्या अस्सल शिक्क्यातल्या रेषांचे परस्परसंबंध - म्हणजे त्यातली अंतरं, त्यातले कोन, रेषांची परस्परांमधली अंतरं हे तंतोतंत आपल्या 'टेस्ट' केसशी जुळणे. ही निर्णायक गोष्ट". आणि जवळ जवळ कलाकारांनं दाद घेण्यासाठी पहावं, तशी नजर त्यांनी राजूला दिली. "गेल्या तीन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर आज मी हे निश्चित म्हणू शकतो, की सदर दस्तऐवजावरच्या राजारामाच्या मुद्रेत, शिक्क्यात कोणतीही गफलत नाही. कोणताही घोटाळा नाही."
राजू थक्क होऊन ऐकत होता. पण त्यांचं बोलणं संपलंय, हे लक्षात आल्यावर एक शंका त्यानं
मनात गच्च धरून ठेवली होती, ती विचारली, "सर... धिस् इज सिंपली ग्रेट. पण तुम्ही ते चंदी... का जिंजी पेपर्स ऑथेंटिक नाहीत म्हणाला ते... यापैकीच हे डॉक्युमेंट नाही ना? मागे तुम्ही म्हणाला होता."
साताळकरांनी काही सेकंद त्यांचा रीपोर्ट चाळला. "मी लिहीलंय याच्यात. फारसं प्रमाण न ठेवता राजारामानं दिलेली पत्रं,- 'चंदीचे कागद', ही बहुतांश वतनपत्रं आहेत. एकतर्फी. या डॉक्युमेंटचं तसं नाही. हे द्विपक्षी करारपत्र आहे. त्यात उल्लेख केल्यानुसार मराठय़ांना पैसे मिळालेले सिद्ध झाले आहेत.फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीच्या हिशेबांमधे त्याचा उल्लेख आहे. Diaries of Francois Martin मधेही ते तपशीलआहेत. त्यामुळे हे पत्र 'चंदीचे कागद' म्हणतात, त्यापैकी निश्चितपणे नाही. बाय् द वे - जिंजीचंच मराठीत नाव 'चंदी' आहे."
बोलून दमल्यामुळं की काय, त्यांनी खुणेनंच राजूला आणखी एक ताव दाखवला.
"ही राजाराम काळातली पत्रसमाप्तीची खूण - मोर्तब. म्हणजे शिक्काच, एक प्रकारचा. फक्त तो पत्राच्या शेवटी उमटवला जातो. आपल्या कागदातली मोर्तब देखील सर्व कसोट्यांवर.. मी मगाशी म्हणालो त्याच उतरली आहे. "
राजूच्या अंगावर जवळपास काटा आला होता. घाई करायची नाही, असं पन्नासवेळा आधी मनाशी घोकून देखील, त्याच्या तोंडून नकळत प्रश्न निसटलाच.
"म्हणजे, सर... हे अस्सल आहे. .. बरोबर? वुई आर ऑल मोस्ट कन्क्लुडिंग! बरोबर ना सर ?"
उत्तर देतांना साताळकरांनी काही सेकंद वेळ घेतला. एक मोठा निश्वास टाकून ते म्हणाले,
"जवळजवळ. पण माझ्यातला हिस्टोरिअन, परफेक्शनिस्ट आणि माझ्यातला एक कायम असमाधानी माणूस यांचं द्वंद्व - मला ठाम निष्कर्षाप्रत येऊ देत नाहीये. पण नव्व्याणव टक्के हे अस्सल आहे."
राजूला फारसा बोध झाला नाही. "पण मग.. सर.. व्हॉटस्, द नेक्स्ट प्लान?" म्हणजे .. मला खूप उत्सुकता आहे म्हणून. कागद, शिक्का, भाषा, मोर्तब, फॅक्टस्... सगळंच जुळतंय, तर मग?"
साताळकरांनी हाताची चाळवाचाळव केली.
"बरोबर आहे. आता फारसं काही उरत नाही. एक काम करा ना... आज बुधवार. तुम्ही शनिवारी पेडणेकरांना बोलावून घ्या... सगळे परीक्षणाचे घटक तर अस्सल आहेत या कागदात. पण, बीफोर मेकिंगद स्टेटमेंट, मी ते जरा परस्परसंगतीनं, एकमेकांशी ताडून बघतो. बाय द वे, हा आजचा रिपोर्ट आणि ही माझ्या पाच लाखांची पक्की पावती."
त्यांनी प्रेमानं राजूच्या खांद्यावर हात ठेवला. "तुम्हाला बराच त्रास झाला. खूप ऐकून घेतलंत, मला हुरूप दिलात. येतो मी; आता एकदम शनिवार सकाळ-अकरा वाजता. ठीक?"
(क्रमशः)