यिन, यँग आणि साताळकर-५

शनिवारी साडेनऊ वाजताच, द्रुतगति महामार्गावरुन भयंकर द्रुतगतीने येऊन पेडणेकर राजूच्या स्टुडिओत पोचला. सातळकरांनी दिलेली रीसीट, त्यांचे दिवसागणिक केलेले रिपोर्टस्. हे सगळं एक नजरटाकून त्यानं बॅगेत कोंबलं.
"धिस् ऑल स्टफ इज ऑल राईट, राजू. उघडच आहे, की ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे.
पण मला ते साताळकरांकडून ऑफिशियली ऐकायचंय. पण ते म्हणाले, तेही बरोबरच आहे. ह्या सगळ्या कसोटय़ांचा, घटकांचा एकमेकांशी मेळ बसला पाहिजे. आय थिंक, ही इज् जस्टीफाईड. तरी भेंडी, अकरा कधी वाजतायत असं झालंय."
अकरा वाजतांना, साताळकरांच्या आधी एक वेगळाच चौदा पंधरा वर्षांचा मुलगा स्टुडिओत येऊन उभा राहिला. पेडणेकर आणि राजू, दोघे ही आपापल्या परीने पण एकाच विषयाच्या विचारात मग्न होते, त्यामुळे तो काय म्हणतोय, हे त्यांना कळायला काही सेकंद लागले.
"राजू देशपांडे साहेबांसाठी साताळकर सरांनी दिलंय." असं एक ब-यापैकी मोठं फुलसाईझ् पाकीट समोर ठेवत तो म्हणाला," पोचल्याची या कागदावर सही द्याल?" त्यानं निरागसपणं विचारलं.
राजू चांगलाच भांबावला होता. साताळकरांचं प्रत्यक्ष न येणं, त्याच्या अंतर्मनाला अभद्र वाटलं होतं. काहीतरी जबरदस्त घोटाळा होत होता. आजारी वगैरे नसतील ना ते ? त्याला एकदा, आणि एकदाच वाटून गेलं. "सर.. कुठायत पण ?" त्यानं कसंबसं विचारलं. मुलाचे 'माहित नाही' हे शब्द त्याला फार लांबवरून आल्यासारखे वाटले.
त्यातल्या त्यात भानावर होता, तो चारूहास पेडणेकर. भांबावून वगैरे न जाता, त्याच्या हालचालीत धोका जाणवलेल्या एखाद्या मांजराची अस्वस्थ सहजताच आली होती. सही करुन, त्या मुलाला वाटेला लावून, पहिलं त्यानं ते पाकीट उघडलं. त्याच्या आत एक पत्र, आणि आणखी एक बंद पाकीट होतं.
"कम ऑन राजू... फेस इट. वाच तरी त्यांनी काय लिहीलंय. घाबरतो काय?" पेडणेकर करवादला.
अत्यंत सुवाच्च अक्षरात, रेघा असणा-या ए फोर लेटरहेडवर पत्र होतं. राजू आणि पेडणेकर ,दोघांनाही उद्देशून.

प्रिय श्री. पेडणेकर आणि सन्मित्र राजू देशपांडे,
यांस स.न.
स्वतः न येता पत्र पाठवण्याचं प्रयोजन इतकंच, की समोर आलो असतो, तर कदाचित इतक्या स्पष्ट, मोकळेपणानं मी तुम्हाला हे काही सांगू शकलो नसतो.
फर्स्ट थिंग्ज फर्स्ट. आपल्या विश्लेषणातला एक अभ्यास घटक, मी मुद्दाम बाजूला ठेवला होता. तो म्हणजे कागदपत्रात वापरलेली शाई. अस्सल मराठा कागदपत्रं, त्यावेळी फक्त काळ्याच शाईत लिहीली जात. आपल्या सदर कागदपत्रातही शाई काळीच आहे. पण ती रुई वगैरे झाडांचा चीक, इतर काही घटक वापरून केलेली मराठेकालीन शाई नाही. अशी शाई कशी तयार केली जाते, ते मला माहित आहे. पण हेतुपुरस्सर हे वैगुण्य आपल्या विश्लेषणातून, परीक्षणातून मी गाळलं. कारण लौकरच कळेल. या करारपत्रातली थोडी
शाई खरवडली आणि x-ray diffraction, Polarised light microscopy किंवा HPLC सारखी तंत्रं वापरून जर तिचं रासायनिक विश्लेषण केलं. तर त्यात अँटाज्... म्हणजेच टीटॅनिअम डायऑक्साईडचं, एका आधुनिक रसायनाचं, विशुद्ध स्वरूप वापरलं गेलं आहे, हे कुणालाही लक्षात येईल. दिसतांना ती मराठेकालीन वाटली, भासली तरीही. भारतात कदाचित् कुणी इतक्या पुढंपर्यन्त जाऊन कुणी इतकं विश्लेषण करणारनाही. पण फ्रान्समध्ये जर कुणी अभ्यासकानं ते केलं, तर विकणारे म्हणून पेडणेकरांची, प्रमाणित करणारा
म्हणून माझी, आणि आपण दोघे भारतीय, म्हणून आपल्या देशाची काय इभ्रत राहील? जे पत्र विश्लेषणासाठी तुम्ही मला दिलंत, ते म्हणजे एक वरच्या दर्जाची केलेली मोठी फसवणूक आहे...
ते पत्र बनावट आहे.
अँटाज हा त्याच्या शाईचा घटक १९१७ मधे विशुद्ध स्वरुपात प्रथम मिळाला. बाकी गोष्टी कितीही अस्सलअसल्या, तरी ही अँटाझयुक्त शाई, राजाराम काळात असणारच नाही.
मग प्रश्न असा पडतो, की मी हे विश्लेषक म्हणून तुम्हाला आमनेसामने का सांगितलं नाही ? उत्तर ऐकून कदाचित तुम्हाला खूप विषण्ण वाटेल.

या बनावट दस्त ऐवजाचा निर्माता, जनक, मीच आहे. मीच ते बनवून चिटणीस कुटुंबियांना विकण्यासाठी दिलं होतं.

एखाद्या कुशल चित्रकारानं आपली सही पेंटिंगखाली करावी, तशी या बनावटपत्रात शाई मात्र मी मुद्दामच या काळातली वापरली. आज पेडणकरांना ते विकून मला भरपूर पैसे कमवता येत होते. पण तरीही तसं न करण्याचाच निर्णय, शेवटी मी घेतला. खूप विचारांती. 

खरोखर - श्रेयस आणि प्रेयस, यिन् आणि यांग, सप्रवृत्ती आणि दुष्टप्रवृत्ती यात निवड करणं किती अवघड आहे.. किंवा काही वेळा आपल्या मनाचा लंबक कोणत्या बाजूला जाऊन स्थिरावेल, हे सांगणं ही फार अवघड गोष्ट आहे. नैराश्य, कडवटपणा मिळालेली दारूण उपेक्षा, संगणक सोडून इतर ज्ञानशाखांबद्दलची समाजातील उदासीनता... या सगळ्यांवर मी एका क्षणी विलक्षण संतापलो होतो. मला या समाजावर माझ्या बुद्धीच्या आधारानं कुरघोडी करुन विजयाचं समाधान आणि हो, त्यातून भरपूर संपत्ती, भरपूर पैसा पण हवा
होता. ज्या क्षणी संशोधनादरम्यान राजारामाची शिक्का मोर्तब असणारे चार दोन अस्सल, कोरे कागद मला मिळाले, तेव्हाच माझा हा विचार पक्का झाला होता. ज्या जगात माझी, माझ्या कामाची उपेक्षा होते, आणि दिवसभर डे-ट्रेडिंग, फॉरवर्ड ट्रेडिंगच्या आकडय़ांवर डोळे लावून बसलेले परजीवी सटोडिये उजळ माथ्यानं पैशाचा माज करतात - त्या जगाला - मला, माझी स्किल्स वापरून केलेली एक 'कलाकृती' बहाल करायची होती.

पण ज्या विश्वासानं राजू देशपांडे पेडणेकरांना घेऊन माझ्याकडे आले, त्याचं काय? ज्या विश्वासानं एका शब्दानंही खळखळ न करता मागताक्षणी पेडणेकरांनी पाच लाखाची व्यवस्था केली, त्याचं काय? आणि फ्रान्समधले तुमचे तीन बाय बायर्स माझ्या नावाला अथॉरिटी म्हणून मान्यता देतायत, त्याचं तरी काय? आणि आजवरच्या सडेतोडपणामुळे, निस्पृहपणामुळं जे काही थोडंफार नाव माझंही घेतलं जातं,त्याचं काय?
माझी फार चलबिचल झाली. देशपांडे, आपली या मागची भेट झाली, तेव्हा मी तुम्हाला एकदा म्हणालो होतो ना, माझ्याच मनात एक द्वंद्व चालू आहे ?
हीच ती सगळी खळबळ होती. एकीकडे आजवर कधी बघितली नाही, आणि पुन्हा कधी बघायला मिळेलसं वाटत नाही, अशी संपत्ती आणि दुसरीकडे - आयुष्याचं प्रयोजनच जणू दानाला लागलेलं. इतकी वर्ष, प्रसिद्धीपासून लांब राहून, व्रतस्थपणे केलेल्या कामाशी, मिळवलेल्या नावाशी बेईमानी. निर्णय घेतांना त्रास तर झालाच. पण कुठल्याशा अदृश्य प्रेरणेनं म्हणा किंवा आजवर बघितलेल्या, मिळालेल्या, अनुभवलेल्या संस्कारांचं बळ म्हणा, मी 'याच' बाजूला राहायचं ठरवलं.. सत्प्रवृत्ती.

आणखी एका रहस्याचाही उलगडा करून, हा पत्रप्रपंच पूर्ण करतो.

सोबतचं बंद पाकीट श्री. पेडणेकरांसाठी. ज्या मूळ, अस्सल करारपत्रावरुन मी हा बनावट दस्तऐवज तयार केला, ते मूळ अस्सल पत्र त्यात आहे. मलाच मागे ते सापडलं होतं. वालादोर - कडलोर भागातल्या फ्रेंच वसाहतींच्या अवशेषांचा अभ्यास करतांना एका म्हाता-या इंडो-फ्रेंच, मिश्र पालक असणा-या माणसाकडे मला ते सापडलं होतं, फक्त कुठलं संग्रहालय, संस्था यांना ते देऊन न टाकता, का कुणास ठाऊक मी ते माझ्याकडेच ठेवलं होतं. त्याची किंमत, पेडणेकरांना वाटते त्याहूनही जास्त मिळेल कदाचित.
माझ्यामुळे पेडणेकरांना बराच त्रास झाला. ही त्याची भरपाई आहे. तुमच्या बायर्सकडून याचे जे पैसे येतील, त्यातले योग्य वाटतील, तितके मला द्यावेत.. पाच लाख तर त्यातले माझ्याकडे आहेतच!

मी खूप दमलो आहे. खूप शोषला गेलोय या यिन-यँग अन् श्रेयस् प्रेयस् मधल्या द्वंद्वाला. थकायला झालंय. या सगळ्या लढाईत शक्तिपात जर जरूर झालाय- पण बुध्दिभेद तर झाला नाही, हे काय कमी आहे? आता काही दिवस हिंडून येतो जरा. मासुलीपट्टण पासून चंद्रनगर पर्यंत पूर्व किना-यावर अजूनही डच-फ्रेंच वसाहतींच्या इतिहासातले कैक मुद्दे, कैक स्थळं दुर्लक्षित आहेत. ती बघून येतो. त्यातूनच मला जरा विश्रांती मिळेल.

देशपांडय़ांना परत आल्यावर भेटेनच. इतका निरलस, निःस्वार्थी मित्र उतारवयात सामोरा येईल,असं वाटलं नव्हतं.

बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असो द्यावे.
लेखनसीमा
रघुनाथ साताळकर
पुणे

(समाप्त)