ह्यासोबत
किती तरी दिवस फक्त ठरवत होते माझ्या माहेराला जायचे म्हणून .. आज तो योग आला होता . रानातल्या वाटेने तशीच चालत वस्तीकडे निघाले.
"वस्ती ..? वस्ती जेथे माणसे राहतात काही ही झाले तरी आपले पाळेमुळे सोडत नाहीत ती वस्ती .. हं, स्वतःशीच मनात खिन्न हसून मी मलाच पुन्हा पुन्हा सांगत होते.
हळूच मागे पाहिले, तर कोणीच नव्हते .. माझ्या सावलीखेरीज, अन ती ही काळीकुट्ट पडली होती कदाचित भूतकाळातील गोष्टींच्या प्रभावामुळे.. पण तरीही उगाच त्या गोष्टींचा पुल बांधताना माझ्याच अस्तित्वाशी ती संबंध सांगत होती.
मंद वाऱ्याची झुळूक, शेतातील ज्वारीची सळसळणारी पाती, मोगऱ्याची फुले, तळ्याकाठची निरव शांतता अन हळूच तिला भेदून उडत जाणारा तो पक्षांचा थवा .. हं सगळ्या कल्पना, आता सगळे वाऱ्यावरती विरून गेल्या सारखे वाटत आहे.पण ..माझं मन आजही त्या पूर्वीच्या पाऊलखुणा शोधतंय...
आज पंधरा वर्षांनंतर येथे आले आहे.. सगळे बदलून गेले आहे . माझं माहेर .. माझं घर .. १९९३ सालच्या भूकंपामध्ये सार सार उध्वस्त झालं .. भाटमळ वाडी मराठवाड्यातील खिल्लारी जवळ फक्त ५ कि.मी. अंतरावर असणारी एक छोटीशी वस्ती असणारी वाडी.
वर्षानुवर्षे सातत्याने जमिनीत पाय रोवून आपल्या अस्तित्वाची पिढ्यान पिढ्या साक्ष देणारे ते वडाचे झाड .. आता तिथे नाहीच आणि पिंपळाच्या झाडावरील मुंजबाने ही आता भीतीने कधीच पळ काढला आहे तेथून. त्या उध्वस्त खुणा मात्र अजून तशाच आहेत .. ते पडके वाडे अजून साक्ष देतायेत त्या संहाराची अन ती ओसाड चावडी हसती आहे माझ्या कडे बघून..
थोडीशी पुढे चालली तर शेजारील झोपडीवजा घराच्या अंगणात आजाराने जायबंदी झालेले आजोबा दिसले..चेहरा ओळखीचा वाटला म्हणून थोडे पुढे गेले अजून ...
नाना $$ मनाने मनातल्या मनात आनंदाने हंबरडा फोडला .. हो आनंदाने ..आनंद मग तो क्षणिक का असेना स्वर्ग सुख देऊन जातो.. पण नानांची केविलवाणी अवस्था पाहून हाच आनंद क्षणभंगुर ठरला ..
" या अंगणात पाऊल टाकलं परत तर तगडं मोडील " हे नानांच वाक्य आठवलं . सरकण डोळ्यासमोरून ते चित्र काळाला भेदून डोळ्यासमोरून निघून गेलं.
तितक्यात शेजारून आवाज आला.. कोण .. ? कोण हाय तिकड ..कुनास्नी शोधून राहिलात... ?
क्रमशः