भाटमळ वाडी .. भाग २ (गोदा)

भाटमळ वाडी .. भाग १ "दुवा क्र. १"
भाटमळ वाडी .. भाग २  (गोदा)

गोदा $$ .. भान हरपून मी मोठ्याने हाक मारली .. मी.. मी.. माझ्या तोंडातून आनंदाच्या भरात पुढचे शब्द येईनात

माहेराची माझी एक जीवाभावाची मैत्रीण गोदा माझ्या पुढे उभी होती, अंगावर नववारी ..आता काळाने कमी झाले असतील पण तरीही तो केसांचा अंबाडा, तो कणखर आवाज ही अजून तसाच होता ..

तेव्हड्यात, राधाक्का $$ असे म्हणत गोदा माझ्या कडे धावतच आली, १५ वर्ष झाली आम्ही भेटून, तो जुना काळ म्हणजे काही मजा औरच होती .. गोदा शेजारच्या राजुदादा बरोबर लग्न करून नाना पवार यांची सून म्हणून आली होती, ती आली आणि एका वर्षात माझे हात ही बाबांनी पिवळे केले .. म्हणजे आमची मैत्री १ वर्षभराची .. पण अजूनही ते दिवस आठवले ना तर अंगावर रोमांच उभा राहतो ..

" पण .. हातात असलेले फुलपाखरू उडाले की मागे उरतात ते रंग,फक्त रंग आणि ते ही फिकट , तसाच हा काळ .. तो ही असाच पटकन निघून गेला आठवणींचे रंग मागे ठेवून "

अर्रर्र टिंग्या .. कोण आलया बघ .. आत्या आलीया तुझी आत्या ! गोधडी आण आतून .. असे गोदाचे मोठ्या आवाजातील शब्द काणी पडल्यावर माझी विचारांची शृंखला पुन्हा खंडीत झाली ..

राधाक्का आज इतक्या दिसांनी .. अन अस अचानक ..? काय तुम्ही पण ? इतकं का परकं करायचं आम्हासनी, येणं तर सोडा पण साध टपाल बिपाल तरी धाडायचं कधी मधी ..

अर्रर्र टिंग्या आण की बिगीबिगी, थांबा हा पाणी देते रांजणातलं .. मला तर तुम्हास्नी पाहून काय करावं आण काय नाय हेच सूचना बघा .. 

टेव्हड्यात टिंग्यान गोधडी हांथरली.. आणि तो बाजूला उभा राहिला ... १४ - १५ वर्षाचा टिंग्या , त्याला कुठली ही आत्या हेच कळले नाही म्हणून हळूच तो माझ्या कडे बघत होता मधून मधून.

राधाक्का काय चाललं हाय तुमचं ?.. आमचं तर बघा हे अस सगळीकडे पसारा अन सारखं हे काम .. अस म्हणत गोदा बोलत होती पण तरीही माझी नजर शेजारील पडक्या वाड्यावर जात होती मधून मधून ..

तुझं कस चाललंय गोदा ? अन नानां ना काय झालंय ? मी विचारले..

राधाक्का काय सांगायचं तुम्हास्नी ३ वरीस झाल्यात म्हातारं अंथरुणाला धरून हाय.. ह्यास्नी अन माइस्नी जाऊन १५ वरीस झाली तेव्हा पासून म्या अन म्हाताऱ्यानं काय काय नाय सोसलं ..पण हा एकुलता एक आधार पण आता तुटतोय ..

अजून मनगटात जोर हाय म्हणून चाललंय पण राधाक्का , " मूठीत कितीही बळ असलं ना तरी ही उणीव वाटते आपल्या मानसाच्या हाताची.. मायेच्या आधाराची .."

आता काय बोलत राहिलीया मी .. बस्सा हा मी च्या करून आणते ..अस म्हणत गोदा उठली ..

अग गोदा राहूदे मला माझं गाव बघायचं आहे .. ते घर ते शेत सगळं पाहायचे आहे ..मग येते मी .. मला चैन पडत नाही ये सगळं आपलं एकदा पाहायचं आहे ..

अहो काय बाकी राहिलं आहे आता, ते पडकं वाडं आणि ती ओसाड शेतं काय पाहायचं त्यास्नी ...थांबा च्या ठेवला आहे .. टिंग्या येईल बरोबर तुमच्या दाखवायला .. आता इतक्या दिसानी आलाय तर १०-५ दीस राहून जायच काय ..गोदा ने आपल्या तालात मला सांगितलं ..

अग मी तर एकाच दिवसा साठी आली आहे .. बरोबर कपडे पण नाहीत माझ्या कडे.. मी गोदास बोलली ..

आता कापडाच काय घेऊन बसलात माझी आहेत की मस पडलेली .. आता काय आईकणार नाही मी तुमचं ..

आता निवांत च्या प्या आणि वस्तीवरणं एक चक्कर मारा .. तो पर्यंत म्या मस्त कोंबडं कापते ..

आता गोदा काही ऐकणार नाही हे मला कळलेच होते ..

नाना, ओ नाना कोण आलया बघा रामा देशमुखाची पोर राधा आलीया राधा ..

कोण ? कंपन स्वरूपातील आवाजाने नानांनी गोदाला पुन्हा विचारले ?

आता काय म्हाताऱ्याला आयकायला कमी येत राधाकका ..

अहो.. राधा, देशमुखाची पोर .. गोदे ने ओरडून नानांना सांगितले.

नाव ऐकल्याबरोबर नानांनी उठण्याचा प्रयत्न केला ..

नाना नमस्कार करते, हा हा उठू नका नाना मी बसते येथे तुमच्या शेजारी. काय झालं आहे नाना ? मी कळत असूनही उगाच प्रश्न विचारला. नानांच उभं आयुष्य कष्ट करण्यातच गेलं होते .. आणि आता ही केविलवाणी अवस्था . बघवत नव्हत नानांकडे.

काय पोरी वय झालं आता , मी काय उडेल बलप हाय आता कधी उडल याचा बी नेम नाय..

मी गोंधळून गप्प बसले. दोन मिनिट दोघेही गप्पच राहिलो.

पोरी का गप्प बसलीयस, चालायचंच  .. " काळाच्या प्रवाहात आयुष्य वाहत जात अन या प्रवाहात शरीर रुपी अंगरख्याची लक्तरं होतात .. म्हातारपण हे आत्म्याच्या उच्छादी पणाला शाप असतं पोरी "

ए टिंग्या इकडं ये .. आत्यास्नी च्या दे येवडा.. अस म्हणत गोदाने गुळाचा चहा टिंग्याजवळ दिला.

काय, नाव काय तुझं ? मी टिंग्याला विचारले .

टिंग्या ..

अरे खरे नाव काय आहे ते सांग ना ..?

युवराज , टिंग्याने सांगितले.

वा ! काय मस्त नाव आहे रे तुझे .. बरं युवराज आता की नाही मला आपली वाडी दाखवण्यास येशील ना तू ?

हो , येईल की वाटल्यास शेजारच्या मण्याला पण घेऊ का आपल्या बरोबर , माझा मैतर आहे .

हो चालेल की .. तू कितवीत आहेस ?

आता आठवीत आहे .. टिंग्या उत्तर देतच मण्याला बोलावयाला पळाला ..

वाडी .. माझे घर.. ते शेत .. मनात आठवणींची सुकलेली पाने पुन्हा आवाज करू लागली ..

आत्या, चल गं .. तुला वाडी दाखवतू मी ..

 पहिलं शाळेत जाऊ .. मण्याने टिंग्या ला सुचविले .

नको आपण पहिल्यांदा ह्या शेजारच्या पडक्या वाड्या कडे जाऊ या ...

आणि मी तिकडे वळले ...

क्रमशः

                    ---------------------- गणेशा